>> रश्मी वारंग
पर्शियन शब्द नान म्हणजे ब्रेड आणि अफगाणी भाषेत खटाई म्हणजे बिस्कीट. ही बिस्कीट संस्कृती परकीय आक्रमणातून हिंदुस्थानात रुजली. नानकटाई याच मातीत तयार झाली, पण त्यासाठी परकीय मंडळींचा मोठा हातभार लागला. इतर बिस्किटांइतकी नियमितपणे खाल्ली न जाणारी तरी लोकप्रिय अशा नानकटाईची ही गोष्ट.
बिस्किटांच्या वर्गवारीतला राजेशाही पर्याय म्हणजे नानकटाई. बिस्कीट खाणं निषिद्ध असल्यापासून ते बिस्कीट रोजच्या न्याहारीचा भाग बनण्यापर्यंतच्या या प्रवासात नानकटाईला विसरता येत नाही. इतर बिस्किटांइतकी नियमितपणे खाल्ली न जाणारी तरी लोकप्रिय अशा नानकटाईची ही गोष्ट.
नानकटाई या नावापासूनच ती वेगळी ठरते. या नावाचे दोन अर्थ सांगितले जातात. पर्शियन शब्द नान म्हणजे ब्रेड आणि अफगाणी भाषेत खटाई म्हणजे बिस्कीट. या खटाईचे आपण सोयिस्करपणे कटाई केले. याशिवाय नानकटाईमधल्या सहा घटकांचे वर्णन करणारा शब्द म्हणजे खटाई. त्यापासून हे नाव मिळाले असेही म्हणतात. बिस्कीट संस्कृती परकीय आक्रमणातून हिंदुस्थानात रुजली. नानकटाई याच मातीत तयार झाली, पण त्यासाठी परकीय मंडळींचा मोठा हातभार लागला.
हिंदुस्थानामधील मसाल्यांचा जगभरात बोलबाला होऊ लागला होता. त्यामुळे अनेक देश भारताकडे आकृष्ट झाले. 16 व्या शतकाखेरीस डच, फ्रेंच, इंग्रज, पोर्तुगीज मंडळींच्या वखारी भारतभरात पसरल्या. सुरत हे या परकीय मंडळींचे मुख्य केंद्र होते. स्वतसोबत ही परदेशी मंडळी स्वतःची खाद्यसंस्कृती घेऊन आली होती. डच लोकांच्या सुरत येथील वखारीत त्यांनी स्वतःची बेकरी सुरू केली. कालांतराने भारतीय लोक या बेकरीत काम करू लागले. ब्रिटिश बिस्कीटांपेक्षा डचांची बिस्किटस् ‘कोएके’ थोडी वेगळी होती. डच मंडळींची वखार बंद झाली तेव्हा त्यांनी बेकरीही बंद करायचे ठरवले. मात्र बेकरीतील पाच पारशी कर्मचाऱयांनी बेकरी चालूच ठेवायचा निर्णय घेतला. बिस्कीट खाणे आणि धर्म बुडणे यांचा त्याकाळी असलेला परस्परसंबंध पाहता हा निर्णय धाडसी होता. फारमजी पेस्तनजी दोतीवाला यांनी ते आव्हान स्वीकारले. डच बेकरी दोतीवाला बेकरी म्हणून ओळखली जाऊ लागली. डच मंडळी त्यांच्या संस्कृतीप्रमाणे ताडाची सुरा बेकरी उत्पादनात वापरत. भारतीय मंडळी हे कधीच स्वीकारणार नाहीत याची दोतीवाला यांना कल्पना होती. सुरुवातीला गरीब कामगार दोतीवाला यांच्या बेकरीतील पदार्थ खात. पण सर्व थरांतील लोकांपर्यंत आपले बेकरीतील पदार्थ पोहोचले पाहिजे अशी दोतीवाला यांची इच्छा होती. त्यामुळे विविध प्रयोग करत, ताडाची सुरा न वापरता शुद्ध तुपाचा वापर करून दोतीवाला यांनी बिस्कीटस् बनवली. तीच ही नानकटाई!!
आज नानकटाईमध्ये गुलकंद, व्हॅनिलापासून म्हणाल ते स्वाद उपलब्ध आहेत. काजू पिस्त्याच्या पखरणीसह नानकटाई एकदम शाही मामला होऊन जातो. अर्थातच नानकटाईच्या किंमतीमुळे रोजच्या खाण्याचा भाग ती होऊ शकत नाही. पण सणासुदीला वा विशेष प्रसंगी भेट देण्यासाठी ही बिस्कीटस् एकदम बेस्ट.
मधला एक काळ होता जिथे ओव्हन किंवा मायक्रोवेव्ह नसताना नानकटाईचे मिश्रण घेऊन बेकरी बाहेर उभ्या राहिलेल्या स्त्रियांची रांग दिसायची. नानकटाई बनवता येणे ही पाककौशल्याची पावती होती. आज डिझायनर डब्यातून भेटवस्तू म्हणूनही नानकटाई मिरवताना दिसते.
खुसखुशीत नानकटाई म्हणजे स्नॅक्स टाइम खासमखास करणारी आनंदवार्ता. आरोग्यासाठी योग्य नसली तरी एखाद्या व्यक्तीला ती खास आहे हे जाणवून द्यायचंय? खुसखुशीत नानकटाई देऊन तर बघा.
(लेखिका आरजे व स्तंभलेखिका आहेत.)