ठसा – चुनी गोस्वामी  

1116

>> प्रवीण कारखानीस

मैदान फुटबॉलचं असो की क्रिकेटचं, आपल्या अद्भुत खेळानं ते गाजवायचंच या जिद्दीनं हे दोन्ही मैदानी आणि मर्दानी खेळ खेळत असताना प्रेक्षकांची वाहवा मिळवलेले देशातले असे एकमेव खेळाडू म्हणजे सुबिमल अर्थात चुनी गोस्वामी! मध्यंतरी त्यांचं कोलकतामधल्या इस्पितळात निधन झालं. पद्मश्री आणि अर्जुन पुरस्काराचे ते मानकरी होते. त्यांचा जन्म पूर्व बंगालमध्ये झालेला असूनही कोलकतामधल्या ईस्ट बंगाल फुटबॉल संघाकडे न वळता ते वयाच्या आठव्या वर्षापासून, वयाच्या तिसाव्या वर्षी फुटबॉल खेळाला रामराम ठोकेपर्यंत ‘मोहन बागान’ याच संघातर्फे खेळत होते. फुटबॉल कारकीर्दीत ते 437 सामने खेळले ज्यात त्यांच्या नावावर तब्बल 264 गोल नोंदवलेले आहेत. 1956 ते 1964 या नऊ वर्षात विविध ठिकाणी झालेल्या फुटबॉलच्या पन्नास आंतरराष्ट्रीय सामन्यात ते भारतीय संघातून खेळले होते. 1956 सालच्या ऑलिम्पिकमध्ये चीनच्या संघाचा पराभव करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. चुनी गोस्वामी हे हिंदुस्थानी फुटबॉल संघाचे कर्णधार असताना 1962 साली जकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत हिंदुस्थानाने अंतिम सामन्यात दक्षिण कोरियावर मात करून ‘सुवर्ण पदक’ मिळवलं होतं तर 1964 साली इस्राएलमधल्या तेल अवीव येथे ‘रौप्य पदक’ मिळवलं होतं.

वयाच्या तिसाव्या वर्षी, 1968 साली फुटबॉलला रामराम ठोकून ते क्रिकेटकडे वळले. क्रिकेटमध्येही ते तितकेच चमकले. कॉलेजमध्ये असताना ते कोलकता विद्यापीठाच्या फुटबॉल आणि क्रिकेट अश्या दोन्ही संघांचे कर्णधार होते! क्रिकेटच्या अनेक आंतरविद्यापीठ सामन्यात ते खेळले होते. ते जसे उत्तम फलंदाज होते तसे उत्कृष्ट मध्यमगती गोलंदाज होते. बारा वर्षांच्या आपल्या क्रिकेट कारकीर्दीत त्यांनी प्रथम दर्जाच्या 46 सामन्यात 28.42 च्या सरासरीनं त्यांनी 1592 धावा काढल्या, 40 झेल टिपले आणि 47 गडी बाद केले.

पश्चिम बंगालचे कर्णधार असताना त्यांच्या संघाला रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात 1969 साली ब्रेबॉर्न स्टेडियमवर मुंबई संघाशी झुंज द्यावी लागली होती, त्यात चुन्नी गोस्वामी यांनी पहिल्या डावात 96 धावा आणि दुस्रया डावात 84 धावा फटकारूनही सामना अनिर्णीत स्थितीत येऊन ठेपल्यानं, गुणांच्या निकषावर अजित वाडेकर यांचा मुंबई संघ रणजी ट्रॉफीचा मानकरी ठरला होता.चुनी गोस्वामी यांना तेव्हा दोन्ही डावात मिलिंद रेगे यांनीच बाद केलं होतं.

वेस्ट इंडीजचा तेव्हाचा जगज्जेता बलवान संघ गारफिल्ड सोबर्सच्या नेतृत्त्वाखाली 1971-72 साली हिंदुस्थानच्या दौर्‍यावर आलेला होता. इंदूरच्या स्टेडियमवर त्या संघाशी दोन हात करायला हनुमंत सिंह यांच्या नेतृत्त्वाखाली पूर्व आणि मध्यभारत संघ उतरला होता. सोबर्सला विश्रांती हवी असल्यानं वेलस्ली हॉलकडे वेस्ट इंडीज संघाचं कर्णधारपद होतं. या सामन्यात चुन्नी गोस्वामी यांच्या भेदक गोलंदाजीनं रोहन कन्हायसारख्या फलंदाजाची गाळण उडाली.चुनी गोस्वामी यांनी आठ बळी घेतले. वेस्ट इंडीज संघाचा दारुण पराभूत झाला. ज्ये… क्रिकेटपटू मुश्ताक अली तो सामना बघत होते. त्यांनी चुन्नी गोस्वामी यांचं विशेष अभिनंदन केलं.

चुनी गोस्वामी हे क्रिकेटमध्ये एखाद्या धुमकेतूसारखे आले, चमकले आणि गेले. काही वर्षे त्यांना स्टेट बँकेनं मोठया अधिकारपदाची नोकरी दिली होती. कोलकताचे नगरपाल ( शेरीफ ) म्हणूनही त्यांची वर्षभरासाठी नियुक्ती झाली होती. फुटबॉल, क्रिकेट या खेळात भरीव कामगिरी केल्यानंतर काही अवधीतच ते पट्टीचे टेनिसपटू झाले होते!

त्यामुळेच, चुनी गोस्वामी यांच्या निधनानं देश एका अव्वल दर्जाच्या आणि अत्यंत लोकप्रिय अश्या अष्टपैलू खेळाडूला मुकला आहे असंच म्हणणं योग्य ठरेल!

आपली प्रतिक्रिया द्या