जागर – विदेशी वृक्षांचे अतिक्रमण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. मधुकर बाचूळकर

स्थानिक परिसंस्थेत देशी व स्थानिक झाडाचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे, मात्र विकासाच्या नावाखाली हल्ली विदेशी वृक्षांचे महत्त्व वाढवत त्यांची लागवड केली जाते. यामुळे स्थानिक परिसंस्थेवर परिणाम होऊन आपली स्थानिक जैवविविधता हळूहळू नष्ट होऊ लागली आहे.

आज आपल्यासमोर सर्वात गंभीर संकट उभे आहे, ते जागतिक तापमानवाढीचे आणि हवामान बदलांचे. अलीकडील काही वर्षांपासून पृथ्वीचे तापमान दरवर्षी सतत वाढत आहे. त्याचे प्रमुख कारण आहे हवेचे प्रदूषण, वाढते औद्योगिकीकरण आणि वाढती वाहन संख्या. यामुळे हवेच्या प्रदूषणात मोठी भर पडत आहे.

नैसर्गिकपणे हवेचे प्रदूषण कमी करण्याची क्षमता फक्त वनस्पती आणि वृक्षांमध्ये आहे. यासाठी आपल्याला वनांची, जंगलांची आवश्यकता आहे. हवेचे शुद्धीकरण व पर्यावरणाचे संतुलन राखण्याचे महत्त्वाचे काम वृक्ष करतात, पण अतिरेकी मानवी हस्तक्षेपांमुळे वनक्षेत्र झपाटय़ाने कमी होत चालले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या राज्यात वन विभागाच्या वतीने वृक्ष लागवड प्रकल्प राबविले जातात, पण या प्रकल्पांत प्रामुख्याने निलगिरी, ऑस्ट्रेलियन बाभूळ, मँजियम, ग्लिरिसिडीया, सुरू, सुबाभूळ, सिल्वर ओक यांसारख्या विदेशी वृक्षांची एकसुरी लागवड करण्यात आली आहे. शहर परिसरांत गुलमोहोर, रेन ट्री, काशिद, पिचकारी, पितमोहोर, निलमोहोर, विदेशी बदाम यांसारख्या विदेशी वृक्षांचीच संख्या सर्वात जास्त आहे. आपला देश वनस्पती आणि वृक्ष विविधतेत अती संपन्न असताना मोठय़ा प्रमाणात विदेशी वृक्षांचीच लागवड का व कशासाठी? असे प्रश्न आता सामान्य जनताही विचारू लागली आहे.

स्थानिक परिसंस्थेत देशी व स्थानिक झाडाचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे, हे हल्ली जनतेला पटू लागले आहे. यामुळेच अलीकडील काही वर्षात जनतेच्या वृक्ष लागवड विचारसरणीत बदल झालेला आहे. आपल्या देशात सुमारे 50 हजार वनस्पती प्रजाती असून यापैकी 40 टक्के प्रजाती विदेशी आहेत. यापैकी काही प्रजाती ब्रिटिश राजवटीत इंग्रजांनी वनस्पती उद्याने तयार करताना हिंदुस्थानात आणल्याच्या नोंदी आहेत, पण स्वातंत्र्य काळानंतरही बहुसंख्य विदेशी वनस्पती हिंदुस्थानात आल्या आहेत, हेच विशेष.

आपल्या देशात सुमारे 20 हजारांच्या आसपास विदेशी वनस्पती प्रजाती असून यापैकी बहुतांश प्रजाती तणवर्गीय आहेत. सुमारे 25 टक्के विदेशी वनस्पती प्रजाती अती आक्रमक गुणधर्माच्या आहेत. काही विदेशी वृक्षही अतिआक्रमक गुणांचे आहेत. आक्रमक विदेशी तणांमुळे हिंदुस्थानात दरवर्षी शेती उत्पादनात 30 टक्के इतकी घट होते. यावरून विदेशी वनस्पती आपणासाठी किती घातक आहेत, याची कल्पना येऊ शकेल. घाणेरी किंवा टणटणी, पेंदाळ किंवा जलपर्णी, काँग्रेस गवत किंवा गाजर गवत, पिवळा धोत्रा या विदेशी तणांचा प्रसार अत्यंत वेगाने झाल्याने ही सर्व हिंदुस्थानभर पसरली आहेत. अलीकडील काळात अल्टननथिरा रानमोडी, मिकानीया ही विदेशी तणे संपूर्ण कोकण व पश्चिम घाट परिसरात सर्वत्र पसरलेली आहेत. ही तणे अत्यंत चिवट असल्याने आपल्याकडील चराऊ गवताळ पुरणे या तणांनी व्यापली आहेत.
आपल्या देशात वन विभागाकडून मोठय़ा प्रमाणात लागवड केले जाणारे नीलगिरी, सुरू, सिल्व्हर ओक, ऑस्ट्रेलियन बाभूळ (ऑस्ट्रेलिया), ग्लिरिसिडिया, सुबाभूळ (मध्य अमेरिका), हे सर्व वृक्ष विदेशी आहेत. सन 1960 ते 1980 या कालावधीत नीलगिरी वृक्षांची लागवड हिंदुस्थानात मोठय़ा प्रमाणात करण्यात आली. नीलगिरी वृक्ष लागवडीचे सर्व तोटे लक्षात आल्यानंतर, कर्नाटक उच्च न्यायालयाने सन 2017 मध्ये नीलगिरी वृक्ष लागवडीवर संपूर्ण राज्यभर बंदी घातली आहे. अशी बंदी संपूर्ण देशभर येणे आवश्यक आहे. असंख्य विदेशी तणे, शोभिवंत विदेशी वनस्पती, विदेशी वृक्ष या सर्वांचा आपल्या देशात शिरकाव झाल्यानंतर त्याचा प्रसार संपूर्ण हिंदुस्थानभर झालेला असून त्यांच्या आक्रमक गुणांमुळे आपल्या स्थानिक परिसंस्था विस्कळीत झाल्या आहेत. विदेशी वृक्षांमध्ये प्रामुख्याने गुलमोहोर (मादागास्कर), रेन ट्री (दक्षिण अमेरिका), पिचकारी (अफ्रिका), पीतमोहोर (श्रीलंका), नीलमोहोर (दक्षिण अमेरिका), हे वृक्ष असून हे सर्व त्यांच्या अति आक्रमक गुणधर्मासाठी जगभर प्रसिद्ध आहेत. या विदेशी वृक्षांच्या आक्रमतेमुळे आपली देशी वृक्ष संपदा धोक्यात आली आहे.

आपल्या देशात तसेच आपल्या राज्यात महामार्गाच्या बाजूने अनेक देशी वृक्ष मोठय़ा प्र्रमाणात दिसून येत असत. गेल्या 15-20 वर्षांपासून सर्वत्र रस्ते विकास प्रकल्प राबवताना अनेक वृक्ष तोडण्यात आले. यानंतर केलेल्या वृक्ष लागवडीमध्ये प्रामुख्याने विदेशी वृक्षांचीच मोठय़ा प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. रस्ते विकासानंतर केलेल्या वृक्ष लागवडीमध्य प्रामुख्याने बॉटलब्रश, सिंगापूर चेरी, टाबूबिया, नीलमोहोर, मदागास्कर बदाम या इतर विदेशी वृक्षांचीच मोठय़ा प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. सातवीण, कदम्ब यांसारख्या देशी वृक्षांचीही लागवड करण्यात आली आहे, पण त्यांची संख्या तुलनेने अत्यंत कमी आहे. रस्ते दुभाजकांमध्येही टेकोमा, पिवळी कन्हेर, पावडर पफ, स्कारलेट काॅर्डिया यासारख्या विदेशी झाडाझुडुपं दिसून येतात. रस्त्यांच्या, महामार्गांच्या दोन्ही बाजूस हमखास आढळणारे वड, पिंपळ, उंबर, चिंच, कडुनिंब, करंज यांसारखे देशी वृक्ष मात्र आज रस्ते विकास प्रकल्पामुळे पूर्णपणे कायमचे नामशेष झाले आहेत. पूर्वी ब्रिटिश राजवटीमध्ये हिंदुस्थानात रस्ते व महामार्गांच्या दोन्ही बाजूस फक्त देशी वृक्षांचीच लागवड होती, पण स्वातंत्र्य काळानंतर हिंदुस्थानींच्या राजवटीमध्ये मात्र रस्त्यांच्या कडेने आणि सर्वत्रच विदेशी वृक्षांचीच लागवड मोठय़ा प्रमाणात दिसून येते.

गेल्या अनेक दशकांपासून आपल्या राज्यातील वन विभागाने सामाजिक वनीकरण प्रकल्प राबवून मोठय़ा प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे. गावांभोवताली असणाऱया मोकळ्या जागेत, गायरानांवर, डोंगर उतारांवर, पडीक जमिनींवर तसेच राखीव वनक्षेत्रात आणि अभयारण्यात असणाऱया ओसाड जमिनींवरही मोठी वृक्ष लागवड केलेली दिसून येते. वनीकरणांसाठी लागवड केल्या जाणाऱया सर्व विदेशी वृक्षांच्या रोपांची निर्मिती प्रामुख्याने वन विभागाच्या रोपवाटिकांमध्येच केली जाते. वनांचे संरक्षण करणे, स्थानिक जैवविविधतेचे, वन्यजिवांचे संरक्षण-संवर्धन करणे, ही सर्व प्रमुख कामे वन विभागाची आहेत, पण आपल्या राज्यातील वन विभागाने मात्र लक्ष्मीतरू, कोनोकार्पस, महोगनी, विदेशी बदाम, ऑस्टेलियन महोगनी, मदागास्कर बदाम यांसारख्या यासारख्या विदेशी वृक्षांचीच रोपे तयार करून फक्त त्यांचीच लागवड करण्यात धन्यता मानली आहे.

नीलगिरी, ऑस्ट्रेलियन बाभूळ यांसारखे बहुतांश विदेशी वृक्ष आपल्याकडील वातावरणात अगदी जोमाने, वेगाने वाढतात, पण जवळपास असणाऱया इतर देशी वृक्षांना ते वाढू देत नाहीत. यामुळे तेथील नैसर्गिक अधिवास नष्ट होतो. विदेशी वृक्षांच्या जवळपास आपले स्थानिक देशी वृक्ष वाढू शकत नाहीत. विदेशी वृक्षांच्या खाली आपल्या देशी रोप व झुडूप वर्गीय वनस्पतीही वाढू शकत नाहीत. गेल्या 40-50 वर्षांपूर्वी सांगोला, पंढरपूर, सोलापूर आणि मराठवाडा विभागात वन विभागाने मोकळ्या पडीक जमिनीवर विदेशी शमी (वेडी बाभूळ) या विदेशी (मेक्सिको) वृक्षांची लागवड केली. हे वृक्ष अत्यंत जोमाने वाढले आणि वेगाने सर्वत्र पसरले. या विदेशी वृक्षांनी, नैसर्गिकपणे वाढलेल्या आपल्या बाभळीच्या झाडांनाही नष्ट करून टाकले.

विदेशी वृक्ष लागवडीचे परिणाम आणि एकसुरी वनीकरणाचे तोटे आता सर्व स्तरांवर स्पष्टपणे जाणवू लागले आहेत. यामुळे यापुढे वन विभागाने विदेशी वृक्षांची एकसुरी लागवड पूर्णपणे बंद करावी. नवीन विदेशी वृक्ष रोपांची व त्यांच्या बी-बियांणांची आयात पूर्णपणे थांबवावी. सर्व शासकीय रोपवाटिकांमध्ये फक्त देशी वृक्षांचीच रोपे तयार करावीत. वनखात्याच्या वृक्ष संशोधन विभागाने तसेच कृषी विद्यापीठाच्या हॉर्टीकल्चर आणि वृक्ष संशोधन विभागातील तज्ञांनी देशी व जंगली वृक्षांबाबतचे लागवड तंत्रज्ञान विकसित करण्याबाबत संशोधन करावे. विदेशी वृक्षांप्रमाणे वेगाने व जोमाने वाढण्याची क्षमता असणाऱया देशी-जंगली वृक्षांचा संशोधनात्मक अभ्यास करावा. हल्ली कर्नाटक राज्यातील वन विभागाच्या रोपवाटिकांमध्ये फक्त देशी व जंगली वृक्ष रोपांचीच निर्मिती केली जाते. तेथील रोपवाटिकांमध्ये 4 ते 5 फूट उंचीची देशी-जंगली वृक्षांची रोपे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मोठय़ा संख्येने उपलब्ध होतात आणि याच वृक्ष रोपांची राज्यभर लागवड केली जाते. अशा प्रकारचे कार्य आपल्या राज्यात वन विभागाकडून अपेक्षित आहे. वन विभागाने यापुढे जंगली वृक्षांच्या रोपवाटिका तयार करून या वृक्षांची राज्यभर सर्वत्र लागवड करून देशी वृक्ष संपदेचा प्रचार-प्रसार करणे आवश्यक आहे.