लेख : गोवा मुक्ती सेनानी

86

>> डॉ. सच्चिदानंद शेवडे ([email protected])

मनोहर आपटे नामक सांगलीतील तरुण लहान वयापासून क्रांतिवीर बाबाराव सावरकर यांच्या सहवासात आला. 1946 मध्ये पूर्व बंगालातील नौखाली येथे जातीय दंगल पेटली म्हणून तिथे जाण्यासाठी आपल्या काही मित्रांना घेऊन निघाला. मुंबईला येऊन तो स्वातंत्र्यवीर सावरकरांना भेटला. त्यांनी नौखालीला जाण्याच्या बेताला खो घातला. ते म्हणाले, ‘‘आधी शिक्षण पूर्ण करा आणि मग राजकीय व सामाजिक कार्याचा विचार करा. शत्रूने निवडलेल्या रणांगणात आपण जायचे नसते, तर आपण आपल्या सोयीनुसार रणांगणे निर्माण करायची आणि शत्रूला तिथे येण्यास भाग पाडायचे असते.’’ हा कानमंत्र घेऊन ती मुले पुन्हा आपल्या गावी परतली. मनोहर आपटे यांचे तरुण रक्त तरीही क्रांतिकार्यासाठी उसळतच होते. त्याचवेळी गोव्यात पोर्तुगीजांच्या दडपशाहीला ऊत आला होता. हिंदुस्थान स्वतंत्र होऊनही गोवा हिंदुस्थानात विलीन झालेला नव्हता. त्याची सल अनेक तरुणांच्या मनात होतीच. मनोहर आपटे त्यापैकीच एक होते. त्यावेळी डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोवा मुक्तीचे रणशिंग फुंकून तिथे सत्याग्रह केला. ते ऐकताच मनोहर निघाला आणि थेट धारगळला येऊन थडकला. तिथे पोर्तुगीज सरकारविरुद्ध जनजागृतीचे त्याचे उद्योग काही फितुरांना सहन झाले नाहीत. त्यांनी सरकारकडे तशी तक्रार केली. त्यामुळे मनोहरला गोवा सोडून बांद्याचा आश्रय घ्यावा लागला. काही दिवसांनी त्यांनी मोहन रानडे हे नाव धारण केले आणि ते गोव्यात परतले. पुढे त्याच नावाने ते ओळखले जाऊ लागले. पोर्तुगीज वसाहतवादी आणि जुलमी राजवटीतून गोवा स्वतंत्र करण्यासाठी उभ्या राहिलेल्या मुक्ती संग्रामातील आझाद गोमंतक दलात ते सामील झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली सशस्त्र क्रांतिवीरांनी अस्नोडा पोलीस चौकीवर हल्ला करून पोलिसांच्या बंदुका व काडतुसे पळवली. त्यानंतर बांदेकरांच्या पाळीवरील खाणीवर हल्ला करून स्फोटके पळवली. त्या स्फोटकांच्या सहाय्याने रेल्वे पूल उडवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. याच काळात एका पोर्तुगीज शाळेवर तिरंगा फडकवण्यात आला. तो कुश्तोदिया फर्नांदिश ऊर्फ किस्तोद नामक पोलीसपाटलाने फाडून जाळला. त्यामुळे संतापलेल्या रानडे, शंभू पालकर आणि दासू चाफाडकर या क्रांतिकारकांनी त्याच्या फोंडा तालुक्यातील वेरे गावात घरात घुसून त्याला गोळ्या घातल्या आणि तिथे मिळालेल्या बंदुका व काडतुसे घेऊन काढता पाय घेतला. बांदेकरांच्या खाणीवरील हल्ल्यात मिळालेल्या स्फोटकांचा वापर करूनच रानडे यांनी सावर्डे ते कार्ले रेल्वे मार्गावरील एक पूल उडवून देण्याचा प्रयत्न केला. पुढे 26 ऑक्टोबर 1955च्या सायंकाळी बेते पोलीस चौकीवर केलेल्या हल्ल्यात हेड कॉन्स्टेबल आणि रानडे यांनी परस्परांवर गोळ्या झाडल्या. घायाळ अवस्थेतही त्यांनी आपल्या साथीदारांना शस्त्रास्त्रs घेऊन निघून जायला सांगितले. रानडे मात्र पकडले गेले. आझाद गोमांतक दलाच्या 31 क्रांतिकारकांवर खटले भरण्यात आले. त्यातील 14 क्रांतिकारक सापडलेच नाहीत. एक जण हुतात्मा झाला. 16 जणांना शिक्षा झाल्या. मोहन रानडे यांना 24 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा तर ठोठावली गेलीच, पण त्यांची रवानगी थेट पोर्तुगालमधील लिस्बन येथील कारागृहात करण्यात आली. त्यावरूनही पोर्तुगाल सरकारचा त्यांच्यावरील राग किती पराकोटीचा होता हे लक्षात येते. पुढे 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा मुक्त झाला, पण तरीही रानडेंचा तुरुंगवास सुरूच राहिला. ते सशस्त्र क्रांतिकारक असल्याने बहुधा स्वतंत्र हिंदुस्थानच्या सरकारकडे त्यांच्या मुक्ततेसाठी वेळ नसावा. नंतर ज्येष्ठ संगीतकार आणि गोवा मुक्ती संग्रामातील एक प्रमुख असलेल्या सुधीर फडके यांनी पुढाकार घेऊन मोहन रानडे विमोचन समिती स्थापन केली. मेक्सिकन दूतावासासह त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आणि 23 जानेवारी 1969 रोजी रानडेंची सुटका झाली. रानडे यांच्या सुटकेसाठी त्यावेळचे विरोधी पक्षनेते अटलबिहारी वाजपेयी यांनीही संसदेत आवाज उठवला होता. तामीळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराई यांनीही रानडे यांच्या सुटकेची मागणी पोप यांच्याकडे केली होती. रानडे मायदेशी परतल्यावर दादरला त्यांचा भव्य सत्कार झाला. तत्पूर्वी शालेय वयात वडिलांबरोबर मी बाबूजींच्या म्हणजे सुधीर फडके यांच्या घरी गेलो होतो. त्यावेळी रानडे तेथे होते. त्यामुळे त्यांच्या दर्शनाचा लाभ मला झाला. त्यांनी दाखवलेली गोळी लागल्याची खूण अद्याप  माझ्या स्मरणात आहे. रानडे यांनी त्यांच्या गोवा मुक्ती संग्रामातील अनुभवांवर ‘सतीचे वाण’ हे आत्मचरित्र लिहिले. तसेच ‘स्ट्रगल अनफिनिश्ड’ हे पुस्तकदेखील त्यांनी लिहिले. त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल गोवा सरकारने ‘गोवा पुरस्कार’ तसेच केंद्र सरकारने ‘पद्मश्री’ देऊन त्यांना गौरविले आहे. मात्र गोवा स्वतंत्र होऊनही पोर्तुगालमध्ये आठ वर्षें तुरुंगवास भोगलेल्या मोहन रानडे यांचे क्रांतिकार्य, त्यांचे गोवा मुक्ती संग्रामातील मोठे योगदान तसे पडद्याआडच राहिले. आता तर हा महान क्रांतिकारक काळाच्या पडद्याआड निघून गेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या