किस्से आणि बरंच काही- सुरेल मित्र

>> धनंजय साठे

 

मराठी सिनेसृष्टीतली आघाडीची संगीतकार जोडी चिनारमहेश. त्यांच्या कामाचा आलेख पाहता संगीत क्षेत्रातील त्यांचे योगदान वाखाणण्याजोगे आहे.

 

भिन्न आवड व प्रवृत्तीची दोन माणसं एकत्र येऊन उत्तम संगीत निर्माण करू शकतील का? हो करू शकतील आणि हे करून दाखवलंय मराठी सिनेसृष्टीतली आघाडीची संगीतकार जोडी चिनार-महेश यांनी.

भिन्न हा शब्द वापरण्यामागचं गुपित हेच की, लहानपणापासून महेशचा कल हा पाश्चिमात्य संगीताकडे जास्त होता. उदा- बिटल्स, आबा, बोनी एम, इगल्स इत्यादी. यांचं संगीत महेशला अधिक आकर्षित करायचं, तर त्या उलट चिनारचे आई-वडील हिंदुस्थानी शास्त्राrय संगीत शिकलेले आणि त्याची आई तर संगीत विशारद होती. त्यामुळे चिनार 90 च्या दशकातले नदीम-श्रवण, अनु मलिक, बप्पी लाहिरी यांचे संगीत ऐकून मोठा झाला. अनेकदा त्यांच्या स्टुडिओवर आमच्या गप्पा रंगतात. तेव्हा चिनार म्हणाला होता की, जेव्हा तो

कॉलेजमध्ये होता तेव्हा दोघांची छान मैत्री झाली होती. त्याचवेळी त्यांनी ठरवलं होतं की, आपण संगीत क्षेत्रात एकत्र काहीतरी करायचं.

एकमेकांची एकूण संगीताची आवड खूप भिन्न असल्याचं त्यांना उमगलं होतं. पण जसे दोन वेगवेगळ्या नदीचे प्रवाह एकत्र येतात आणि त्यांचा संगम होतो तसंच काहीसं त्यांच्या बाबतीत घडलं. चिनार आणि महेश नावाचे दोन संगीत प्रवाह एकत्र झाले आणि त्यांचा सांगितिक प्रवास सुरू झाला.  पण पुढे येणारी वाट ही किती खडतर आणि बिकट आहे याची या नवोदित जोडीला तसूभरही कल्पना नव्हती. आतासारखा त्या काळात सोशल मीडिया नव्हता. त्यामुळे चक्क यलो पेजेस, टेलिफोन डिरेक्टरीमधून चित्रपटसृष्टीतल्या मंडळींचे नंबर काढून ‘आम्ही संगीतकार आहोत, आम्हाला काम द्या,’ अशा वाक्याने चिनार-महेशची सुरुवात झाली. महेश म्हणाला, त्या वेळी त्यांना तसं कोणी ओळखतही नव्हतं ना त्यांची कोणाशी ओळख होती. त्यामुळे ते कधी महेशच्या घरी बसून तर कधी चिनारच्या घरातल्या लँडलाईनवरून अभिनेत्यापासून तंत्रज्ञ, दिग्दर्शक, निर्माते सगळ्यांना कॉल करून काम मागून मोकळे व्हायचे. असे हे अंधारात बाण सोडत असताना लोकल केबलवाल्याकडून त्यांना काम मिळायला लागलं. कधी एखाद्या बारमध्ये जाऊन स्वतच रचलेल्या शब्दांना चाल देऊन बारच्या मालकासमोर चिनार ती चाल गाऊन दाखवायचा आणि महेश गिटारवर साथ द्यायचा.

असं करता करता ठाणेस्थित असलेले चिनार-महेश कपडय़ांची दुकानं, खेळण्याची दुकानं आणि बाजारपेठेतल्या मंडळींसाठी ठाण्यातल्या लोकल केबलवर जाहिराती बनवू लागले. त्यांचे जिंग्ल्स, त्यातले शब्द व चाल लोकांना आवडू लागली आणि बघता बघता मराठी एकांकिका, मग हळूहळू नाटकांनासुद्धा ही जोडी संगीत द्यायला लागली. त्यांनी दिलेल्या पार्श्वसंगीताचेसुद्धा खूप कौतुक व्हायला लागले. इतके की, रितेश देशमुख निर्मित आणि रवी जाधव दिग्दर्शित ‘बालक पालक’ या चित्रपटाच्या एका खास शोला

बॉलीवूडचे प्रख्यात निर्माते-दिग्दर्शक करण जोहर याने शो संपल्यावर सिनेमाचे कौतुक तर केलेच, पण पार्श्वसंगीत ज्यांनी बनवलंय त्यांची भेट होऊ शकेल का? अशी विचारणा केली. रितेश देशमुखने त्या वेळी पटकन करण जोहरशी चिनार-महेशची ओळख करून दिली. करण जोहरने सिनेमाला साजेसे, अप्रतिम पार्श्वसंगीताचे तोंड भरून कौतुक केले. आज चिनार-महेश दोघेही मान्य करतात की, नवोदित असताना करण जोहरने दिलेली कौतुकाची थाप लाख मोलाची ठरली.

विजू माने दिग्दर्शित ‘शर्यत’ हा त्यांचा पहिला चित्रपट. त्या वर्षीच्या जवळपास सर्व पारितोषिक सोहळ्यांमध्ये उत्कृष्ट संगीत या विभागात चिनार-महेश यांचं नाव झळकलं होतं. पारितोषिक नाही मिळालं. पण त्यांचं नाव निर्माते मंडळी आणि एकूण मराठी चित्रपटसृष्टीत सुपरिचित होऊ लागलं होतं. त्यानंतर मोठी चर्चा झाली ते रवी जाधव दिग्दर्शित ‘टाईमपास’ या चित्रपटाची. ‘मला वेड लागले प्रेमाचे…’ आणि ‘ही पोळी साजूक तुपातली…’ या गाण्यांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आणि चिनार-महेश या जोडीने खऱया अर्थाने मराठी सिनेसृष्टीत आपला ठसा उमटवला. एकीकडे हळुवार प्रेमगीत तर दुसरीकडे त्याच सिनेमातलं ‘ही पोळी साजूक तुपातली’सारखे रांगडे ढिंचॅक गाणं. या चित्रपटाद्वारे चिनार-महेशने चाकोरीबद्ध न राहता वेगवेगळ्या शैली हाताळण्याचं आपलं कौशल्य दाखवून दिलं. मग घोडदौड सुरू झाली आणि बघता बघता ‘टाईमपास-2’, ‘यंटम’, ‘मस्का’, ‘धर्मवीर’ असे अनेक चित्रपट आपल्या उत्तम संगीताने सजवून ते एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.

चिनार-महेश माझे उत्तम मित्र आहेतच, पण ‘मस्का’ चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम पण करण्याचा योग जुळून आला. ‘मस्का’चा मी कार्यकारी निर्माता होतो. त्यामुळे ‘मस्का’च्या सर्व गाण्यांच्या रेकॉर्डिंग्जमध्ये मला त्यांना जवळून बघण्याचा, समजून घेण्याचा वाव मिळाला. कुठलं गाणं कोणी गायचं यावर खूप विचारपूर्वक निर्णय घेतले गेले. पाश्चात्य संगीताच्या ठेक्यावर असलेले टायटल साँग सुप्रसिद्ध संगीतकार, गायक व निर्माते अवधूत गुप्ते यांनी गायलं. ते गाणं ऊर्जा देणाऱया आवाजात गायलं जावं यावर आमचं एकमत होतं. अजून एक ‘मस्का’मधलं सुप्रसिद्ध गाणं म्हणजे ‘बया…’ अख्ख्या चित्रपटाची गोष्टच जणू एका गाण्यात सामावली होती. गीतकार मंगेश कांगणेने ते उत्तम मांडलं होतं. प्रश्न होता भारूड शैलीत हे गाणं कोण गाऊ शकेल. भारूड संस्कृतीचे अभ्यासक डॉ. गणेश चंदनशिवे यांनी हे शिवधनुष्य अतिशय समर्थपणे पेललं. आपल्या अप्रतिम गायनाने डॉ. चंदनशिवे यांनी ‘बया’ या गाण्याला उत्तम न्याय दिला. आता प्रश्न होता शेवटच्या प्रेमगीताचा. त्या गाण्यासाठी ऋषिकेश रानडे आणि महालक्ष्मी अय्यर या गायकांची निवड झाली.

‘मस्का’च्या टायटल साँगसाठी चिनार-महेशच्या स्टुडिओमध्ये अवधूत गुप्ते आणि अपेक्षा दांडेकर आले होते. अवधूत गुप्ते यांना भूक लागली होती. त्यामुळे रेकॉर्डिंगच्या आधी गरमागरम वडापाव आणि चहा असा बेत आम्ही केला. सहसा रेकार्डिंगआधी गायक वडापाव खात नाहीत. पण अवधूतचा आवाज असा काही अप्रतिम लागला की गाणं ऐकल्यावरच तुम्हाला समजेल. हसतखेळत त्या गाण्याचं रेकॉर्डिंग पार पडलं होतं.

‘धर्मवीर’ चित्रपटातील त्यांनी संगीतबद्ध केलेलं देवीचं गाणं मनावर कोरलं गेलं आहे. आज मागे वळून बघताना चिनार-महेशच्या मनात कोणाबद्दल कसल्याही प्रकारचा राग नाही. ते नेहमी म्हणतात की, त्यांना बरेच निर्माते बोलवायचे आणि बसवून ठेवायचे, खोटी आश्वासनं द्यायचे. त्यांनी केलेली अनेक चांगली गाणी कधी बाहेरच आली नाहीत. अनेक सिनेमे प्रदर्शित झाले नाहीत. अशा अनेक गोष्टी घडूनही चिनार-महेश यांची आपल्या कामावरची श्रद्धा मात्र अढळ आहे. त्यांना आलेल्या अनुभवातून ते शिकत गेले आणि आज अनेक होतकरू संगीत दिग्दर्शक, गायक, गायिकांना ते संधी देत आहेत, तर अशा या माझ्या सुरेल मित्रांना माझ्या दिलखुलास शुभेच्छा!

z [email protected]

(लेखक fिक्रएटिव्ह हेड, अभिनेते आणि गायक आहेत.)