
>> वैश्विक
ऐंशी वर्षे पूर्ण झाली की, आपल्याकडे खगोलीय संकल्पनेशी जोडलेली एक प्रथा साजरी केली जाते. त्याला ‘सहस्रचंद्र दर्शन’ असं म्हटलं जातं. याचा अर्थ तोपर्यंतच्या जीवनात त्या व्यक्तीच्या आयुष्यात एक हजार पौर्णिमा येऊन गेल्या! ही कल्पना काव्यमय आणि अकाशाशी नातं जोडणारी आहे. त्याला आता आधुनिकतेची जोड देता येईल. आमच्या वडिलांच्या ‘सहस्रचंद्रदर्शना’च्या वेळी त्या पौर्णिमेला आम्ही एक दुर्बीण आणून त्यांना ‘सहस्राव्या’ पूर्णचंद्राचं दर्शन घडवलं आणि चंद्रासकट त्यांचा फोटोही घेतला.
खरं तर यापलीकडे जाऊन अशा वेळी होणाऱ्या कार्यक्रमात चंद्राबद्दलच्या एक हजार गोष्टी सांगण्याचा छोटासा भाग असेल तर इतर मौजमजेबरोबर थोडी वैज्ञानिक माहिती रंजक पद्धतीने मिळेल. तोही ‘प्रयोग’ मी एके ठिकाणी केला. विज्ञान सोपं करून मनोरंजक पद्धतीने सांगितलं तर लोकांना आवडतं हा आमचा गेल्या चाळीस वर्षांचा अनुभव आहे.
…तर या महिन्यातल्या चांद्र-मालिकेचा समारोप आपण चंद्रावरच्या ‘उद्याच्या’ वस्तीने करणार आहोत. चंद्रावरची माती कशी, चंद्रावर पाणी किती नि कुठे, चंद्रावर सोडलेल्या उपकरणांनी कोणते शोध लावले याची माहिती आपण वेळोवेळी घेतलीच आहे. त्यामुळे चंद्रावर वस्ती करता येईल का याचं कुतूहल माणूस चंद्रावर उतरला त्या दिवसापासून अनेकांच्या मनात आहे. मला आठवतं, पहिल्या चांद्रविजयानंतर काही व्यंगचित्रं, जाहिरात यातून ही कल्पना लगेच मांडली गेली. चंद्रावर उतरलेल्या अंतराळयात्रींना तिथे मुलांसाठीच्या एका औषधाची जाहिरात बघून धक्का बसतो किंवा ‘हॉटेल’चा मालक ‘काय घेणार?’ म्हणत सामोरा येतो अशा विनोदी कल्पना त्यावेळी प्रसिद्ध झाल्या.
आता या गोष्टी ‘स्वप्नवत’ राहिलेल्या नाहीत. एकूणच विराट विश्वाचा आवाका आल्याने चंद्र म्हणजे अगदीच परसामधला उपग्रह ठरला आहे. एखाद्या बंगल्याच्या आऊटहाऊससारखा पृथ्वीला चंद्र. त्यामुळे खगोलीय परिभाषांमध्ये तीन लाख चौऱ्याऐंशी हजार पिंवा चंद्र पृथ्वीजवळच्या कक्षेत असताना आणखीच कमी अंतर असणाऱ्या चंद्रावर वस्ती करणं काळ, काम, वेगाच्या गणिताने काही अवघड नाही, पण प्रश्न आहे तो तिथे जाऊन माणसाला तग धरता येईल का? सुखाने जगता येईल का? अक्षरशः ‘जगणे’ याचीच आधी चिंता करायला हवी. कारण ‘सर सलामत तो पगडी पचास.’ मुळात तिथे जगणंच असह्य असेल तर नुसत्या तंत्रज्ञानात्मक कल्पनाही कविकल्पनाच ठरतील.
अर्थात या सगळय़ाचा विचार चंद्रावर भरारी घेण्याच्या प्रयत्नात असणारे करत नसतील असं थोडंच आहे? त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत. त्यात चांद्रपृष्ठावरची भुसभुशीत काळी माती लक्षात घेता तिथे ‘घर’ कसं उभारायचं? चंद्राच्या दूरच्या भागातील बर्फाचं पाणी करून त्यातून हायड्रोजन मिळवून इंधन तयार करता येईल का? तिथे एखादी गोल ‘कॅप्सूल’सारखी प्रचंड ‘वास्तू’ गरगरत ठेवून कृत्रिम गुरुत्वाकर्षण निर्माण करणं शक्य आहे का? त्यासाठी अणुऊर्जा वापरता येईल का? असे अनेक प्रश्न आहेत.
एवढं सगळं जमलं तरी चंद्रावर सतत होणारे उल्कापात आणि एखादा मोठा अशनी कोसळण्याचा अवकाशी धोका कसा टाळायचा? तो या बंदिस्त ‘वस्ती’वर पडला तर काय करणार? तिथे उतरवलेल्या आणि पुन्हा कक्षेत फिरणाऱ्या रॉकेटला येऊन जुळणाऱ्या यानावरच हा दगडी मारा अंतराळातून झाला तर तिथे गेलेल्यांचं भवितव्य काय? हीसुद्धा कठीण कोडीच आहेत.
माणसाची जिद्द मात्र त्याहून मोठी हे खरं. वैज्ञानिकांना यात वैज्ञानिक प्रगती दिसते तर इलॉन मस्कसारख्या महत्त्वाकांक्षी उद्योजकांना त्यात एक ‘इन्टरप्लॅनेटरी’ बिझनेस दिसतो. लाखो किंवा करोडो डॉलर खर्चून चंद्रावर जाण्याची वजनरहीत अथवा अत्यल्प वजनाची अनुभूती घेण्याची आस जगातल्या हजारो पैसेवाल्यांना आहेच. त्याचंच ‘भांडवल’ करून चांद्रवस्तीचा डाव मांडला जातोय.
तो लगेच यशस्वी आणि ‘कमर्शियल’ होईल असं नाही, पण कोणत्या का निमित्ताने पृथ्वीबाहेर वसाहत करणं माणसाला साध्य झालं तर किमान मंगळापर्यंतचं अवकाश ‘आपलं’ असेल. कारण आपल्या सुदैवाने (की दुर्दैवाने?) सध्या तरी तिथे कोणीच नाही. शिवाय, विज्ञान ‘दैव’ वगैरेपेक्षा प्रयोगातील सफलतेवर भर देतं. कालांतराने हे प्रयोग यशस्वी होतील, पण…
‘…पण’ एवढाच आहे की, निसर्गदत्त अशा पृथ्वी नावाच्या विपुल भूमी, वनश्री, जलसंपदा आणि लाखो प्रजातींनी समृद्ध असलेल्या आपल्या ग्रहाची निगा आपण कशी ‘राखत’ आहोत याचा मागोवा घेतला तर इथल्या सर्वंकष स्पर्धेचे आणि त्यातून उत्पन्न झालेल्या हव्यासाचे ‘वारे’ चंद्रावरही वाहू लागले तर माणसाने चंद्र बिघडवला असे कोणीतरी परग्रहमालावासी केव्हातरी म्हणतील. ती नामुष्की टाळायची तर आंतरराष्ट्रीय करारातून चंद्राचं जतन करण्याची जबाबदारी पृथ्वीवासीयांनी स्वीकारली पाहिजे. तसं घडेल? इथल्या अनुभवावरून तरी वाटत नाही, पण घडलं तर सोन्याहून तेजस्वी ठरेल.




























































