योगिराज श्री गजानन महाराज

>>  प्रा. शरयू सु. जाखडी

संतकवी श्री दासगणू महाराजकृत ‘श्री गजानन विजय’ हा श्री गजानन महाराजांच्या सर्वांगीण जीवनकार्याचा वेध घेणारा अमृततुल्य ग्रंथ आहे. या ग्रंथाद्वारे समजते की, शेगावात श्री संत गजानन महाराजांच्या रूपाने एक अभूतपूर्व भक्तिपीठ निर्माण झाले. श्री महाराज 23 फेब्रुवारी 1878ला प्रथम शेगावी लोकांना दिसले. महाराजांचे व्यक्तित्व स्वयंभू होते. त्यांच्या काैटुंबिक अस्तित्वाच्या खाणाखुणा सापडत नाहीत. शेगावकर मंडळींनीही महाराजांच्या पूर्वायुष्याबद्दल कोठे चर्चा केल्याचे ऐकिवात नाही. हा अवलिया अचानक निर्मल चैतन्याच्या विश्वगर्भातून परमहंसाच्या रूपात शेगावी अवतीर्ण झाला आणि त्याने शेगावकर भक्त मंडळींच्या मनावर कायमस्वरूपी अधिराज्य केले. तत्कालीन शिष्य व गुरूची एकरूपता सुदृढ आणि सकस होती. त्यामुळे या अवलियाची नाममुद्रा ‘शेगावचा योगिराणा’ अशीच विश्वमनावर उमटली.

‘स्व’ला विसर्जित करूनच हा महात्मा शेगावी प्रगट झाला होता. या सिद्धपुरुषाला देहात पाहतात त्यांची फसगत होण्याची शक्यता असते. त्यांची चपलता महाविद्युल्लतेप्रमाणे होती. वायुवेगाने ते सूक्ष्मपणे कुठेही जात असे सांगतात. त्यांच्या गूढ व्यक्तिमत्त्वाला एकदिशात्व नव्हते.

भक्त साद घालतील त्या सगुण साकार रूपात महाराज प्रगट होत. काही वेळा ते चार-चार दिवस झोपले आहेत असे लोकांना वाटे, पण अशावेळी ते योगनिद्रेत जाऊन अनेक गोष्टींचा वेध घेत. त्यांच्या मुखी सतत ‘गण गण गणात बोते’ हे भजन असे. ते भजन अनेक अर्थाच्या छटा प्रतीत करणारे आहे. कदाचित त्याचा अर्थ असा असेल की, प्रत्येकाच्या मनातील ईश्वर पहा. ईश्वरी अंशाचे बीज जगाच्या कणाकणात आहे. ते तुम्हाला सगळीकडे समत्व बुद्धीने पाहायला शिकवते असा त्या सांकेतिक भजनाचा अर्थ असावा.

भगवद्गीतेतही ‘ईश्वरा सर्वभूतानां हृद्देशे।़र्जुन तिष्ठति’ असेच सांगितले आहे. भगवंताचे उद्गार महाराजांच्या मुखातून यावेत यात नवल नाही. महाराजांनी अध्यात्मावर व्याख्याने किंवा प्रवचने दिली नाहीत; परंतु त्यांच्या प्रत्ययकारी कथांमधून आपोआप समाज प्रबोधन घडत असे. ऊनपावसाच्या खेळात क्षितिजावर इंद्रधनुष्य उमटते त्याप्रमाणे भक्तांच्या काजासाठी साक्षात्काराच्या अनेक कथा प्रकट झालेल्या आपल्याला दिसतील. तरीही हा महात्मा कमलपत्रावरील दवबिंदूप्रमाणे आपल्या मठात राहत होता. भक्तांनी पूजेत हजारो रुपये, दागदागिने महाराजांना अर्पण केले तरी तिथल्या तिथे निःस्पृहपणे त्या द्रव्याचा त्याग करून महाराज तेथून निघून जात. तथापि शिष्यांच्या विलोभनीय प्रेमात मात्र ते विलक्षण गुंतून जात. भगवान श्रीकृष्णाप्रमाणे वेळप्रसंगी व्यवहार बाजूला ठेवून ते भक्तांच्या साह्याला धावून जात. दुःखी भक्ताला ते हृदयाशी धरून आश्वासित करीत. गरीब-श्रीमंत हा भेद त्यांच्या ठिकाणी नव्हता. सर्वांसाठी ते दयेचा सागर होते. गावाच्या केंद्रबिंदूवर असणाऱया चैतन्यसूर्यासारखे प्रकाशमान होऊन साऱयांवर प्रेमाची पाखर करीत. आज तर महाराज विश्वाच्या केंद्रस्थानी असून जगभर पसरलेल्या त्यांच्या भक्तांचे आर्त पुरवीत आहेत. अनेक जण महाराजांच्या उपासनेला लागताच सामाजिक कार्ये सेवाभावाने करू लागले आहेत. आज शेगावच्या मठात या निःस्वार्थ सेवाभावामुळे कधीच काही कमी पडत नाही.

महाराजांच्या शिकवणीत ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ याला महत्त्वाचे स्थान आहे. ते त्यांनी प्रत्यक्ष आचरून दाखवले. महाराज वात्सल्यमूर्ती होते. 125 वर्षांपूर्वीच्या कर्मठ कालखंडातही त्यांनी स्त्रीयांना आदराचे स्थान दिले. स्त्रीयांवर अन्याय करणाऱयांची महाराजांनी कानउघाडणी केली. कर्मठपणाच्या बेडय़ा तोडून स्त्री-पुरुष उच्चनीचता कमी केली. महाराजांना दांभिकता, खोटेपणा, भ्रष्टाचार चालत नसे. परमार्थात खोटेपणा करणाऱयांवर त्यांनी किंचितही दयामाया दाखवली नाही. तत्कालीन सुशिक्षित तरुणांवर महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचा व शब्दांचा प्रभाव होता. संभ्रमित तरुणांसाठी समुपदेशन करून त्यांना आपल्या संस्पृतीचे महत्त्व सांगून त्यांना आत्मविकासाचा मार्ग दाखवला. समोर येणाऱया व्यक्तीचे अंतरंग महाराजांना समजत असे.

अतिंद्रिय ज्ञानामुळे महाराज भक्ताच्या मनाचा वेध घेऊन त्याचे प्रबोधन करून त्याला सन्मार्गाला लावीत. लोकमान्य टिळकांसारख्या प्रखर बुद्धिवादी राजकारणी पुरुषाने महाराजांविषयी आदराचे उद्गार काढले आहेत, एवढेच नव्हे तर त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. स्वतः वेदविद्यासंपन्न योगी असूनही महाराजांनी सामान्यांसाठी भक्तिमार्गाचाच प्रचार केला, भक्तांना विठ्ठलभक्ती सांगितली. असे वाटते की, जेव्हा जेव्हा समाजाची घडी विस्कटते, अज्ञानाचे आवरण पसरते तेव्हा तेव्हा परमेश्वर आदर्श मानवतेचे स्वप्न पुरे करण्यासाठी अशा थोर संतांना भूतलावर अवतार घेण्याची योजना करीत असतो. संत श्री गजानन महाराज हे त्यापैकी एक आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या