
गेल्या दोन-तीन दशकांत माणसाने अवकाशात शक्तिशाली दुर्बिणी पाठवल्या. आरशाच्या किंवा इफ्रारेड फोटोग्राफी करणाऱया. आधी ‘हबल’ने इतिहास घडवला. मग हिंदुस्थानी वैज्ञानिक चंद्रशेखर सुब्रमण्यम यांच्या नावे ‘चंद्रा’ आणि आता ‘जेम्स वेब’ अशी ही दुर्बिणींची मालिका. आताही ‘जेम्स वेब’ स्पेस टेलिस्कोप आतापर्यंत आपण विश्वाचा कधीही न पाहिलेला भाग स्पष्टपणे दाखवत आहे. तर ‘जेम्स वेब’ने अतिप्राचीन म्हणजे विश्वजन्माच्या काळातील (सुमारे 13.7 अब्ज प्रकाशवर्षांपूर्वीच्या) काही दीर्घिकांचा, तेजोमेघांचा, कृष्णविवरांचा मागोवा घेतलाय. एकमेकाला ‘खाऊन’ टाकणाऱया कृष्णविवरांचाही शोध लागलाय. त्यात अनेक ‘अमेझिंग’ गोष्टी आढळतात. पूर्वी केवळ ज्या कल्पना होत्या त्यापेक्षाही अंतराळी सत्य अधिक विस्मयकारक दिसतंय. आपल्याकडे एकोणिसाव्या शतकात लिहिलेल्या ‘स्फूर्ती’ कवितेत केशवसुतांनी एक ओळ लिहिली. ‘क्लृप्तीची मग करूनी नौका, व्योमसागरावरी जाऊ; ‘उडु’ रत्ने ती गरीब धरेला तेथुनि फेकूनिया देऊ।’ यातील ‘क्लृप्तीची’ म्हणजे कल्पनाशक्तीची नौका करून अंतराळात जायचं आणि गरीब पृथ्वीसाठी तारकांची ‘रत्नं’ गोळा करायची. अर्थात अथक संशोधनाच्या ‘क्लृप्ती’चीच यानरूपी नौका करून आपण अंतराळात जातो, पण ताऱयांची (उडुगण) रत्नं वगैरे नसतात. जवळ जाण्यापूर्वीच तारे किती महाप्रचंड असतात हे आता एकविसाव्या शतकात विज्ञान स्पष्टपणे सांगून गेलंय, पण संशोधक वृत्तीने ‘व्योमसागरावर’ जाऊन नित्यनवे काही तरी गवसतंय हे खरं.
…तर आपण 2004 मध्ये आपल्या ग्रहमालेतल्या ‘प्लुटो’चं ग्रहपद सबळ वैज्ञानिक कारणांसाठी काढून घेतलं आणि आता आपली सूर्यमाला ‘अष्टग्रही’ झाली. (त्यात सूर्य, चंद्र, राहू, केतू मुळातच येत नाहीत.) आपल्या ग्रहमालेतला एक ग्रह असा कमी झाला असला तरी आपल्या सूर्यसंकुलाबाहेर पसरलेल्या आपल्या विशाल दीर्घिकेत (गॅलॅक्सीमध्ये) सुमारे 1000 अब्ज, होय एवढय़ा मोठय़ा संख्येने म्हणजे एक ‘ट्रिलियन’ ग्रह असण्याचा संशोधकांचा अंदाज आहे. आता असं बघा की, आपल्या सूर्यमालेत आठ ग्रह असा हिशोब केला तर आपल्या आकाशगंगेतील सूर्यासारखे किंवा त्याहून छोटे-मोठे असे जे 200 अब्ज तारे आहेत त्यांच्यापैकी 100 अब्जांनी जरी ग्रहमाला असल्या तरी अब्जावधी ग्रह सापडतील.
त्यातल्या काहींचा पत्ता लागलाय. म्हणजे काही दुरस्थ तारे आणि त्यांच्या ग्रहमाला सापडल्या आहेत. या काहींची संख्या आता 5 हजार झाली आहे. आम्ही खगोल अभ्यासाला 1985 मध्ये सुरुवात केली तेव्हा आपल्या ग्रहमालेचा स्लाइड शोसुद्धा प्रेक्षकांना आश्चर्यकारक वाटला. कारण आपल्या पृथ्वीची धड माहिती आपल्याला नसते तर इतर ग्रहरचनांचे तपशील कुठून ठाऊक असायला, पण तो काळही मागे पडलाय. आता कार्यक्रमात चर्चा होते ते ‘एक्झो’ प्लॅनेट म्हणजे आपल्या सूर्यमालेबाहेरच्या इतर कोणत्या ताऱयांभोवतीच्या ग्रहांची, मग त्यात ‘वसाहतयोग्य’ ग्रह (हॅबिटेबल झोनमधील) किती, यावर माहिती दिली जाते. मतमतांतरं व्यक्त होतात.
पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला 365 दिवस लागतात. तरी तिची गती सेकंदाला 30 किलोमीटर एवढी प्रचंड आहे. मग तो ‘जनक’ ताऱयाभोवती एका दिवसात फिरणारा आणि गुरूपेक्षाही मोठय़ा आकाराचा ग्रह किती वेगात फिरत असेल हे चकीत करणारं नाही? काही ‘एक्झो’ ग्रह पृथ्वीपासून 33 ते 150 किंवा त्याहूनही दूर अंतरावर आढळलेत. पूर्वी आम्हाला कन्या राशीतल्या 51 पेगॅसी (किंवा ययाती तारकासमूह) ग्रहाबद्दल केवढं अप्रुप वाटायचं. आता कालेय (ड्रको) तारका समूहात पृथ्वीपेक्षा 70 टक्के मोठा आणि चांगले 25 टक्के पाणी असलेला तसेच जीवनाला योग्य असं तापमान वगैरे असलेला ग्रह एका ताऱयाभोवती आढळला आहे. तो एका खुज्या ताऱयाभोवती पृथ्वीच्या 11 दिवसांत फिरतो म्हणे. हॉलीवूड, बॉलीवूडच्या सिनेमांपेक्षाही हे वैज्ञानिक वास्तव विस्मयकारी आहे. त्याचा शोध सातत्याने घेणारे संशोधक महान आहेत. त्यांच्या अविरत प्रयत्नांतून आणि अथक परिश्रमातून ‘विश्वरूप’ आपल्यापुढे दिवसेंदिवस अधिकाधिक उलगडतंय. व्योमसागराली ही सफर अशीच अव्याहत सुरू राहणार असून तीच आधुनिक ‘स्फूर्ती’गाथा ठरणार आहे.