
>> समीर गायकवाड
‘हजारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले’ असं म्हणत आयुष्याशी बंड पुकारणाऱया मिर्झा गालिबचं आणि शायरीचं नातं अतूट. त्याची प्रत्येक रचना समकालिन वाटावी इतके गहिवर त्यात अनुभवता येतात. अशा विलक्षण आयुष्य जगणाऱया गालिबचा हा जिंदादिल जीवनपट.
उर्दू साहित्याच्या दुनियेत मिर्जा गालिबचं स्थान अनन्यसाधारण आहे. मुघल साम्राज्याचा शेवटचा सम्राट बहादुरशहा जफर यांचा उर्दू शायरीत गुरू असलेल्या गालिबने उर्दू शायरीत नवे वारे आणले. एकोणिसाव्या शतकात मुघल साम्राज्य जेव्हा लयाला जात होते, तेव्हा गालिब उत्तर हिंदुस्थानात होता आणि १८५७ चं बंड झालं तेव्हा तो दिल्लीत होता. बंडखोरांना मदत केल्याच्या आरोपावरून कंपनी सरकारने त्याचं निवृत्ती वेतन बंद केलं होतं. ते सुरू करण्यासाठी त्याला भरपूर पायपीट करावी लागली आणि कलकत्त्याला चकरा माराव्या लागल्या होत्या. त्याच्या कवितेला प्रेमभावनेखेरीज, सामाजिक जाणिवा, देवाच्या अस्तित्वाबद्दल संशय असे अनेक पैलू आहेत. मुख्य म्हणजे त्याचं आयुष्य अत्यंत खळबळजनक होतं. परिणामी त्याचं आयुष्य कलाकृतीचा विषय आहे. लहानपणचा गालिब, तारुण्यातील गालिब, नाव कमावलेला गालिब, कर्जाने बेजार झालेला गालिब, शेवटी निवृत्तीवेतनासाठी हताश झालेला गालिब अशी विविध रूपं त्याच्या आयुष्यपटात आढळतात.
२७ डिसेंबर १७९७ रोजी आग्रा येथे जन्मलेला असदुल्ला बेग खान म्हणजेच गालिब. गालिब हे त्याचे उपनाम–‘तखल्लुस’जरी असलं तरी त्याच्या शायरीत असद असाही उल्लेख आढळतो. १८१२ साली गालिब दिल्लीत आला तेव्हापासून बहुतेक काळ गालिबचा मुक्काम दिल्लीतच राहिला. दिल्लीतच त्याची शायरी फुलली, बहरली. दिल्लीतच त्याला मानसन्मान मिळाले, दिल्लीतच त्याची बदनामीही झाली, दिल्लीतच त्याला तुरुंगवास सहन करावा लागला आणि दिल्लीतच १५ फेब्रुवारी १८६९ रोजी तो मरण पावला. गालिबची प्रतिभा बालपणातच दिसू लागली होती. मीर तकी मीर यांनी बालगालिबची शायरी बघून याला योग्य उस्ताद मिळाला तर हा फार मोठा शायर होईल, नाहीतर बाकी हा बाराखडीच लिहीत राहील, असे म्हटले होते. समकालीन शायरांविषयीची मीरची तुच्छता ध्यानात घेता हे महत्त्वाचे आहे. याची उतराई म्हणून की काय, गालिबने म्हटले आहे,
‘रेख्ते के तुम्ही नहीं उस्ताद गालिब
कहते है अगले जमाने में कोई मीर भी था…’
(उर्दू शायरीचा तूच एक उस्ताद नाहीस,गालिब. तुझ्याआधी ‘मीर’नावाचा कुणी एक होऊन गेला असे ऐकिवात आहे)
गालिबच्या तरुणपणीही मीर तकी मीरचंच प्रस्थ होतं. एकदा रस्त्यात तरुण गालिब आणि वयोवृद्ध मीर समोरासमोर आले. मीरच्या प्रौढ व अनुभवी नजरेने गालिबमधील ताकद ओळखली. हळूहळू विविध मुशायऱयांतून गालिबचं नाव गाजायला लागलं. गालिब त्याच्या काळाच्या बराच पुढे होता. ज्याकाळी एखाद्या उर्दू कवीने अल्लाहच्या अस्तित्वाबद्दल शंका घेणं शक्य नव्हतं, त्याकाळी गालिब रमजानच्या काळात मद्यपान करत असे. ही बंडखोरी त्याच्या काव्यात अनेकदा उतरली आहे.
गालिबचे वैवाहिक जीवन ही एक शोकांतिकाच होती. त्याची पत्नी उमराव ही कर्मकांडांत अडकलेली देववादी स्त्री होती. तिच्यापासून गालिबला सात मुले झाली, पण त्यातले एकही मूल जगले नाही. गालिबच्या पत्नीने अनेक अपत्यांना जन्म दिला. मात्र त्याचं एकही अपत्य जगत नव्हतं. तेव्हा माणसाच्या काही सगळ्याच इच्छा पूर्ण होत नाहीत हे उमजून असलेला गालिब लिहितो-‘हजारों ख्वाहिशे ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले’ या पातळीचं सत्य लिहिल्यानंतरही गालिब स्वतःच्या आयुष्यातून पुत्राच्या इच्छेला बाहेर काढत नाही आणि तो सतत मूल जगण्याची वाट पाहत राहतो. संसारात सुखाला पारखा झालेल्या गालिबने आपली शायरी, आपले मित्र आणि शराब यांचा सहारा घेतल्याचे दिसते. त्याच्या आयुष्यात इतरही काही प्रेमप्रकरणे झाली. त्याच्या काव्यात डोमनी म्हणजे नाचगाणे करणारी मुलगी डोकावत राहते. पाचवीला पूजलेली आर्थिक चणचण, एकही अपत्य न जगणं, प्रेयसीचं निधन अशा नैराश्याच्या फेऱयात अडकलेला गालिब लिहितो,
‘कैदे हयात, बन्देगम, अस्ल में दोनों एक हैं
मौत से पहले आदमी गम से नजात पाए क्यों?’
कुठेही कोणताही मुशायरा असो, गालिबचे शेर असल्याशिवाय त्यात ‘जान’ येत नाही. तरीही मराठी आणि उर्दू यांचं सख्य पाहता गालिब यांची शायरी महाराष्ट्रात फारशी झिरपलेली नाही.
गालिब एक विलक्षण आयुष्य जगला. एकाचवेळी भौतिक सुखापासून अलिप्त राहण्याचा शेर लिहिणारा गालिब स्वतः मात्र त्याच भौतिकतेत चाचपडत राहिला. राग, लोभ, मद, मत्सर, ईर्षा, लालसा या सगळ्या मानवी भावना त्याने येथेच्छ भोगल्या. अंतिम सत्य सांगणारे शेर लिहिणारा आणि बरोबर विरोधाभासी आयुष्य जगलेला असा कलंदर, मिश्कील आणि जिंदादिल गालिब अशी त्याची अनेक रूपे आहेत. आयुष्यात गालिबला वाटलेला राग, प्रेम, मत्सर, लोभ वेगळ्या संदर्भात त्याने काव्यात व्यक्त केला त्यामुळे कलाकार म्हणून परमेश्वराच्या दारापाशी पोहोचलेला गालिब जसा गुणदोषांपासून मोकळा होत नाहीत तसाच वैचारिक पातळीवर मोठा झालेला तो लेखकही प्रसिद्धीच्या इच्छेपासून मुक्त होत नाही. मानवी भावनांची गुंतागुंत, मनात उठलेलं विचारांचं काहूर कायम गालिबच्या मनात उठत राहिलं.
गालिबचे आयुष्य ही एक विसंगतीचीच कहाणी म्हणावी लागेल. एकीकडे ऐयाश आणि विलासी जीवन जगणारा गालिब दुसरीकडे आयुष्यभर पैशाच्या चणचणीतच राहिला. त्याला सरकारकडून एक कसलेसे अर्धे पेन्शन वारसाहक्काने मिळाले होते. ते पूर्ण मिळावे म्हणून इंग्रज दरबारी खेटे घालणे आणि वेळीप्रसंगी इंग्रजी अधिकाऱयांचा लाळघोटेपणा करणे यात गालिबचे बरेच दिवस गेले. पण या पेन्शनच्या कारणाने गालिबला बऱयाच ठिकाणी फिरावे लागले. त्यातून त्याचे अनुभवविश्व अधिक समृद्ध झाल्याचे जाणवते.
ग़ालिबच्या शायरीचं एक वैशिष्टय़ म्हणजे स्वतःवर आणि स्वतःच्या परिस्थितीवर हसण्याची त्याची वृत्ती. आपण आख्ख्या दिल्लीत मशहूर आहोत, याचा त्याला सार्थ अभिमान होता, पण आपण का मशहूर आहोत, याची त्याला पुरेपूर जाणीवही असावी.
कोणत्याही गोष्टीचे लगेच उदात्तीकरण करणे हे समाजाच्या उथळपणाचे लक्षण आहे. गालिब अशा उथळपणावर सतत वक्रोक्तिने बोलत राहिला. खुज्या, किडक्या समाजाची अवहेलना करणारा गालिब आपल्यापुढे उभा राहातो तो एक सच्चा, जिंदादिल माणूस म्हणून. एक हाडामांसाचा, तुमच्या-आमच्यासारखा माणूस. एक बेफिक्र शायर. ‘हजारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकलें…’, ‘निकलना खुल्दसे आदमका सुनते आये हैं लेकिन….’, ‘बहोत बेआबरु होकर तेरे कूचेंसे हम निकले…’असं म्हणणारा गालिब दंतकथा वाटू लागतो. आणि मग त्यानेच म्हटलेले
‘हुई मुद्दत के गालिब मर गया पर याद आता है
वो हर इक बात पर कहना के यूं होता, तो क्या होता…’
हेच खरे असावे असे वाटू लागते…





























































