लेख : गणेशोत्सव आणि पर्यावरण

859

>> विलास पंढरी

आपले सर्व सण पर्यावरणपूरकच असतात. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला पार्थिव गणेश करण्याची प्राचीन प्रथा आहे. आपला देश कृषिप्रधान आहे. त्यामुळे शेतकरी जिला काळी आई म्हणतात त्या मातीच्या म्हणजेच पार्थिव गणपतीचे पूजन करावे असे शास्त्रात सांगितले आहे. पूर्वी गणेश मूर्तींची संख्या कमी होती. लोकसंख्या वाढीबरोबर गणेशमूर्तींची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शिवाय पार्थिव गणपती फारसे कुणी बसवत नाही. त्यामुळे पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होत आहे. स्वातंत्र्यलढ्यासाठी सुरू झालेल्या या मंगल उत्सवाची आता सर्वांनीच आरोग्य, देशप्रेम, लोकशिक्षण, पर्यावरण रक्षण, सर्वधर्मसमभाव यासाठी उपयोगी उत्सव म्हणून साजरा करण्याची आवश्यकता आहे.

श्री गणेशाच्या प्रतिष्ठापना विधीमध्ये पार्थिव(मातीच्या) मूर्तीचे आवाहन, स्नान, अभिषेक, वस्त्र, चंदन, फुले, पत्री, नैवेद्य इ. सोळा उपचारांनी पूजा केली जाते. यामध्ये त्याला विविध 21 पत्री अर्पण केल्या जातात. पावसाळ्यात या सर्व पत्री सामान्यतः उपलब्ध असतात आणि त्या प्रत्येक वनस्पतीला काही औषधी गुणधर्मही आहेत. सध्या सर्वत्र जो होतो त्याला गणेशोत्सव म्हणायचे काय? अशी टीका अनेकजण, विशेषतः उत्सवात भाग न घेणारे करतात. खरे तर या उत्सवाला सार्वजनिक रूप छत्रपती शिवाजी राजांनी पुणे येथे दिले असे ही दाखले इतिहासात मिळतात. त्यांच्या काळात, म्हणजे 1630 ते 1680 पर्यंत उत्सव सार्वजनिक पद्धतीने साजरा केला गेला जात असे. त्या मागील त्यांचा उद्देश स्वराज्य संस्कृती लोकांना कळावी व त्यांच्यात देशभक्ती जागवावी हा होता.

सुखकर्ता दुःखहर्ता… ही गणपतीची प्रसिद्ध आरती रामदास स्वामींनी रचली आहे. भाद्रपद शु. 4 ते भाद्रपद शु.14 हा गणेशोत्सवाचा कालावधीत प्रचलीत गणेशोत्सवाच्या पूर्वी श्री समर्थ रामदास स्वामींनी हा उत्सव सुरू केल्याची नोंद इतिहासात आहे. आपल्या दासबोध या ग्रंथाचे लिखाण संपवून 1658 मध्ये समर्थ रामदास नाशिकला कुंभमेळ्याला जाण्याकरिता शिवथरच्या घळीतून बाहेर पडले. तेव्हा महाराष्ट्रावर अफजलखान नावाचे एक विघ्न चालून येत आहे ही बातमी शिष्यांनी त्यांच्या कानावर टाकली. त्यावेळी अष्टविनायकांतला पहिला गणपती ज्याचे नाव वक्रतुंड आहे, त्याची स्तुती करण्यासाठी रचलेली गणपतीची सुप्रसिद्ध असणारी हीच ती आरती. या आरतीच्या पहिल्या चरणात अफजलखानाच्या स्वारीचा उल्लेख आपणांस स्पष्ट आढळतो.

हा सुंदरमठ शिवकालीन शिवथर प्रांतात आहे. याचा उल्लेख छत्रपती शिवाजी महराजांच्या अस्सल मोडी पत्रातही आढळतो. इथेच सन 1675 साली छत्रपती शिवाजी राजे आणि समर्थ रामदास स्वामी दोघांनी मिळून हा गणेशोत्सव भाद्रपद शु.!! 4 ते माघ शु.!! 5 गणेश जयंतीपर्यंत पाच महिने साजरा केला. हा गणपती कोणत्याही मंडळाचा राजा नाही तर हा हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजांचा गणपती आहे. या गणेशोत्सवाचे पहिले वर्गणीदार राजे शिवछत्रपती आहेत. ज्यांनी त्या साली 121 खंडी धान्य या उत्सवाला देणगी दिली. त्याचा उल्लेख इतिहासात सापडतो.

समर्थे शिवराजासी आकारामुष्ठी भिक्षा मागो धाडिली!

शिवराज म्हणे समर्थे माझी परीक्षा मांडली!! 

आकारा आकरी खंडी कोठी पाठविली!

हनुमान स्वामी मुष्ठाr लक्षुनिया!!

या उत्सवाला भेट देऊन गणपतीचे दर्शन विजयादशमीच्या दिवशी घेतले असे आनंदवनभुवन या समर्थ रचित काव्यात उल्लेखले आहे. शिवाजी राजांनी या गणेशोत्सवाला सुंदरमठावर जेव्हा भेट दिली त्यावेळी रामदास स्वामी यांनी 18 वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रं महाराजांना प्रसाद भेट दिली आणि महाराजांनी एक पांढरा घोडा समर्थांना दिला. गणपतीची आरती 1658ला समर्थांनी प्रार्थनापूर्वक लिहिल्यानंतर शिवाजी राजांचा राज्याभिषेक होईपर्यंत समर्थ रामदास थांबले, नंतर 1675 ला गणेशोत्सव केला आणि 16 सप्टेंबर 1676 ला सज्जनगडावर वास्तव्याकरिता गेले.

छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर बंद पडलेली सार्वजनिक गणेशपूजा  1718 पासून पेशव्यांनी पुन्हा सुरू केली. ती प्रथा 1818पर्यंत कायम राखली गेली. पण सार्वजनिक गणपती पूजा पेशव्यांच्या पतनानंतर 1818 ते  1892 या काळात बंद राहिली व ती घरोघरी सुरू झाली. वैयक्तिक आणि घरगुती स्वरूपाचा हा धार्मिक उत्सव लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यासाठी एकत्र येऊन लढा देण्यासाठी आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रचार करून व अनेक मंडळांची स्थापना करण्यास प्रोत्साहन देऊन  1893 मध्ये खऱ्या अर्थाने सार्वजनिक केला.

गणेशोत्सव हा आता केवळ धार्मिक उत्सव राहिलेला नाही. तो आता लोकप्रिय सांस्कृतिक आणि जगभर पसरलेल्या गणेशभक्तांमुळे ग्लोबल उत्सव झाला आहे. पण हा मंगल उत्सव साजरा करताना आपण काही नवीन गोष्टीही लक्षात घ्यायला हव्यात. या सणाला असलेली पर्यावरणाची, श्रद्धेची, सहकुटुंब उपासनेची किनारही सर्वांनी लक्षात घ्यायला हवी. हा सण सगळ्यांचा असल्याने इतर धर्माचे लोकही कसे भाग घेतील हे मंडळांनी पाहायला हवे.

आपले सर्व सण पर्यावरणपूरकच असतात. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला पार्थिव गणेश करण्याची प्राचीन प्रथा आहे. आपला देश कृषिप्रधान आहे. त्यामुळे शेतकरी जिला काळी आई म्हणतात त्या मातीच्या म्हणजेच पार्थिव गणपतीचे पूजन करावे असे शास्त्रात सांगितले आहे. पूर्वी गणेश मूर्तींची संख्या कमी होती. लोकसंख्या वाढी बरोबर गणेशमूर्तींची संख्याही मोठया प्रमाणात वाढली आहे. शिवाय पार्थिव गणपती फारसे कुणी बसवत नाही. त्यामुळे पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होत आहे. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे मातीचा गणपती बनवल्यास हा प्रश्न सोपा होईल. तोपर्यंत गणपतीविसर्जन कृत्रिम हौदातच करावे. निर्माल्यही नदीत टाकू नये. त्यावर पाणी शिंपडून म्हणजेच विसर्जित करून खत करण्यासाठी वापरावे. स्वातंत्र्यलढ्यासाठी सुरू झालेल्या या मंगल उत्सवाची आता सर्वांनीच आरोग्य, देशप्रेम, लोकशिक्षण, स्वच्छता अभियान, पर्यावरण रक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्मिती, सर्वधर्मसमभाव यासाठी उपयोगी उत्सव म्हणून साजरा करण्याची आवश्यकता आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या