
>>अभिजीत पेंढारकर
काळोखी आषाढ महिन्यातील दिवसांना निरोप देत सण, उत्सव, व्रत वैकल्यांच्या श्रावण महिन्याचं स्वागत केलं जातं. 29 जुलै पासून श्रावण महिना सुरू होत आहे. त्यापूर्वी आषाढ महिन्यातील या दीप अमावस्याही साजरी केली जाते. घरात सुख, समृद्धी, मांगल्य नांदावं म्हणून घरातील सारे चांदी, पितळेचे दीवे, दीप, निरंजन घासून पुसून स्वच्छ केले जातात व संध्याकाळी त्याची पूजा केली जाते. मात्र याबरोबरच गेल्या काही वर्षांत ही अमावस्या गटारी अमावस्या म्हणूनही साजरी केली जाते. श्रावण महिन्यात मांसाहार निषिद्ध मानणारे साग्रसंगीत मांसाहार मेजवानीचा व मद्याचा आस्वाद घेतात. परंपरा पाळताना त्यातली गंमत अनुभवणे हीदेखील आपली संस्कृतीच आहे.
नमस्कार…
आज मी माझी करुण कहाणी तुमच्यासमोर मांडणार आहे.
मित्रांनो, मला ओळखलंत? कसं ओळखणार? अजून माझ्या आगमनाला चार दिवस बाकी आहेत. एवढे दिवस आधीपासून तयारी करायला मी गणशोत्सव आहे, की नवरात्र की दिवाळी? मी आहे साधी अमावास्या. हां, आता श्रावणाच्या आधी येत असल्यामुळे मला आमच्या इतर अमावास्या भगिनींमध्ये जास्त महत्त्व आहे, एवढंच. आता तरी तुम्हाला नक्कीच ओळख पटली असेल. हो, मीच ती तुमची लाडकी ‘गटारी’ अमावास्या.
अगदी चार दिवसांनी आपली भेट होणार असली, तरी माझ्या स्वागताचे फ्लेक्स चौकाचौकांत लागलेले नाहीत. लागणारही नाहीत. 31 डिसेंबरची रात्र आणि मी, यात क्रियाकर्मांच्या दृष्टीने फारसा फरक नसला, तरी त्या विदेशी बयेचे (पक्षी: रात्रीचे) फ्लेक्स, बॅनर्स गल्लोगल्ली लागतात. प्रत्येक हॉटेल, पब, बार, रिसॉर्टच्या बाहेर तिच्या आगमनाची थाटामाटात वर्दी दिली जाते. वेगवेगळ्या पाटर्य़ा आयोजित केल्या जातात, भरमसाट तिकिटं विकली जातात. मी मात्र तेवढीच महत्त्वाची असूनही फारशी चर्चेत न येणारी, दुर्लक्षित.
‘काय मग, थर्टी फर्स्टला कुठे,’ हे जेवढय़ा उत्साहानं विचारलं जातं, तसं ‘काय मग, यंदा गटारी कुठे?’ असं काही विचारलं जात नाही. माझ्या निमित्ताने मोठमोठे पब्ज बार, रिसॉर्ट इथे भल्यामोठय़ा पाटर्य़ांचं आयोजन केलं जात नाही की दिव्यांचा झगमगाट होत नाही. मी आपली दबक्या, चोरपावलांनी यावं तशीच प्रत्येकाच्या आयुष्यात येते.
अर्थात, माझ्या स्वागताची पूर्वतयारी जोरात होत नसली तरी आदल्या दिवशी मात्र माझ्याविषयीच्या चर्चेला उधाण येतं. कोण कधी, कुठे, कसं भेटणार याचे प्लॅन्स रंगतात. कोंबडीचा बळी द्यायचा की बोकडाची आहुती पडणार, याविषयी गप्पा रंगू लागतात. प्रत्येक जण आपापली पसंती सांगतं. निमित्त माझं असलं, तरी चोचले मात्र प्रत्येकाचे पुरवले जातात, माझे सोडून. मला काय हवंय, मला काय आवडतं, याची दखलही कुणी घेत नाही. कुणाला त्याविषयी साधी चौकशीही करावीशी वाटत नाही.
31 डिसेंबरच्या रात्रीत आणि माझ्यात एक महत्त्वाचा फरक म्हणजे, ती रात्र संपल्यानंतर नवीन इंग्रजी वर्ष सुरू होतं. नव्या वर्षाचे उत्साहानं स्वागत, नवे संकल्प, नवी आव्हानं, नवी दिशा वगैरे वगैरे शब्दांचे बुडबुडे काढले जातात. प्रत्येकाला या दिवसाची उत्सुकता असते. माझ्या दुसऱया दिवशी श्रावण महिना सुरू होतो. त्याची उत्सुकता असते, तरी फक्त सवाष्णींना आणि लग्नोत्सुक मुलींना. बाकी कुणाला श्रावणाशी फारसं काही देणंघेणं नसतं. म्हणजे, कडक श्रावण पाळायचा, म्हणून मला जास्त महत्त्व दिलं जात असलं, तरी श्रावणाचं काही कुणी उत्साहात स्वागत करत नसतं. 31 डिसेंबरचं ग्लॅमर जसं मला लाभत नाही, तसंच एक जानेवारीचं कौतुक श्रावण शुद्ध प्रतिपदेच्या काही वाटय़ाला येत नाही. बिचारी नुसती परंपरेची पालखी खांद्यावर नाचवत संस्कृतीचा रथ कसाबसा ओढत राहाते.
खरं तर दीप अमावास्या ही माझी मूळ ओळख असल्याचं जुनीजाणती मंडळी सांगतात. या दिवशी दिवे उजळून त्यांची पूजा केली जाते. इतर वेळी दिव्यांचा वापर करून देवांची पूजा करतात, पण हा दिवस खऱया अर्थानं दिव्यांचीच पूजा करण्याचा. अर्थात, बदलत्या काळानुसार दिवे उजळण्यापेक्षा दिवे लावण्यावर भर दिला गेला हे खरंच. तर अशा या आषाढी किंवा दीप अमावास्येची परंपरा नाहीशी होऊन ‘गटारी’ असं एक भडक आणि उथळ नाव माझ्या कपाळी चिकटलं याची मला प्रचंड खंत वाटते. अगदी कौटुंबिक चित्रपटातल्या नायिकेसारखं धाय मोकलून रडावंसं वाटतं. त्याचबरोबर आपली दखल तरी घेतली जाईल की नाही याची खंत वाटते. त्यामुळे रडायचा बेत मी रद्द करते. निदान पुढच्या महिन्यात मद्याचा महापूर रोखला जाणारेय तो माझ्यामुळे, असं मानून स्वतःचं समाधान करून घेते.
तर, अशी ही माझी व्यथा. वाढदिवसाच्या निमित्तानं तुमच्या सगळय़ांसमोर माझी व्यथा मांडता आली, मोकळं होता आलं याचाच आनंद आहे.
चला, तसंही ते पाडगांवकर का कोणसे, त्यांनी म्हटलंच आहे…
‘सांगा, कसं जगायचं,
कण्हत कण्हत की गाणी म्हणत, तुम्हीच ठरवा!
पेला अर्धा सरला आहे,
पेला अर्धा उरला आहे, असंही म्हणता येतं’
माझ्या मते पेला अर्धाच उरला असेल, तर तो पुन्हा पूर्ण भरून घ्यावा, म्हणजे टेन्शन नाही. चला, बडबड खूप झाली. आता कामाकडे वळूया. लवकरच पार्टी करूया!





























































