लेख – चांदीच्या किमतीचा जागतिक भडका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सतीश पोतदार

अमेरिकेकडे सध्या सुमारे चेपन्न कोटी औंस चांदीचा साठा असल्याचे सांगितले जाते, जो त्यांच्या नेहमीच्या साठ्यापेक्षा तिप्पट आहे. चीननेदेखील चांदीच्या निर्यातीवर कडक निर्बंध लादले आहेत. जगातील हे दोन मोठे देश जेव्हा चांदीची साठेबाजी करतात आणि निर्यातीवर बंदी घालतात, तेव्हा लंडन आणि न्यूयॉर्कच्या बाजारपेठेत चांदीचा तुटवडा जाणवू लागतो. या कमतरतेमुळे जागतिक स्तरावर चांदीच्या किमतीत भडका उडाला आहे.

भारतात चांदी ही समृद्धीचे प्रतीक मानली जाते. गरीबांचे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱया या पांढऱ्या धातूने आता अशा काही उड्या मारल्या आहेत की, ती सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. एकेकाळी किलोच्या भावात मिळणारी चांदी आता सोन्याच्या पावलावर पाऊल ठेवत महागाईच्या आकाशात गोते खात आहे. चांदीच्या किमतींना जणू पंख फुटले असून, दुसरीकडे सोन्यानेही दीड लाख रुपये प्रति दहा ग्रॅमच्या दिशेने आपली वाटचाल वेगाने सुरू ठेवली आहे. मात्र, चांदीने गेल्या वर्षभरात दिलेली 160 टक्क्यांची दरवाढ ही जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठा धक्का मानली जात आहे.3 लाख रुपये प्रति किलोच्या पुढे जाणारी चांदी आता सर्वसामान्यांसाठी केवळ शोभेची वस्तू उरते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. चांदीच्या दरांचा विचार केला तर गेल्या 12 महिन्यांतील चढउतार थक्क करणारे आहेत. जानेवारी 2025 मध्ये चांदीचे दर प्रति किलो 85913 रुपये इतके होते.

कोणालाही कल्पना नव्हती की, पुढच्या बारा महिन्यांत हा आकडा थेट 2.5 लाखांचा टप्पा ओलांडेल. डिसेंबर 2025 पर्यंत चांदी 2 लाख 47 हजार रुपयांवर पोहोचली आणि आता जानेवारी 2026 मध्ये ती 3 लाख रुपयांच्या पुढे धावत आहे. केवळ परवाच्या एका दिवसात चांदीच्या किमतीत 15 हजार रुपयांची वाढ नोंदवली गेली. ही वाढ एवढी प्रचंड आहे की, मध्यमवर्गीय कुटुंबांना आता लग्नसराईसाठी चांदीची भांडी किंवा दागिने खरेदी करणे अशक्य झाले आहे.

सोन्याच्या बाबतीतही परिस्थिती वेगळी नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलरची घसरण आणि जागतिक बँकांनी सोन्याच्या साठवणुकीवर दिलेला भर यामुळे सोन्याचे दर सातत्याने सुसाट वेगाने आसमान गाठत आहेत. सोने दीड लाखाच्या उंबरठय़ावर उभे असताना चांदीने 160 टक्क्यांची वाढ नोंदवून सोन्यालाही मागे टाकले आहे. या दरवाढीमागे केवळ भारतीय बाजारपेठ नसून, जागतिक भूराजकीय घडामोडी आणि बदलती औद्योगिक समीकरणे कारणीभूत आहेत. चांदीच्या किमती वाढण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे, या धातूचा औद्योगिक वापर. पूर्वी चांदीचा वापर प्रामुख्याने दागिने आणि नाणी बनवण्यासाठी केला जात असे. मात्र, आता चित्र बदलले आहे. जगभरात जशी सौर ऊर्जेची क्रांती होत आहे, तशी चांदीची मागणी प्रचंड वाढली आहे. सौर ऊर्जेचे पॅनेल तयार करण्यासाठी चांदीचा मोठय़ा प्रमाणावर वापर होतो. जसजसे देश कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठण्यासाठी सौर ऊर्जेवर भर देत आहेत, तसतशी या क्षेत्रातील चांदीची भूक वाढत आहे. तसेच बॅटरी तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिकल वाहनांच्या निर्मितीतही चांदीचा वापर अनिवार्य झाला आहे.

आधुनिक काळातील स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये चांदी ही एक सर्वोत्तम वाहक धातू म्हणून वापरली जाते. पुरवठा मर्यादित असताना उद्योगांकडून येणारी ही मागणी चांदीला महाग करत आहे. सौर ऊर्जा आणि हरित तंत्रज्ञानामुळे चांदीला आता औद्योगिक सोन्याचा दर्जा प्राप्त झाला आहे. सध्याच्या युगातील सर्वात मोठी क्रांती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स होय. हे क्षेत्र सध्या चमकते क्षेत्र मानले जात आहे. एआय तंत्रज्ञानासाठी आवश्यक असलेले सर्व्हर, हाय स्पीड ट्रान्समिशन आणि स्मार्ट ग्रीड पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी चांदीचा वापर मोठय़ा प्रमाणावर होतो. डेटा सेंटरच्या उभारणीत आणि अत्याधुनिक संगणकीय प्रणालींमध्ये चांदीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

एआय उद्योगाच्या विस्तारामुळे चांदीची मागणी भविष्यातही कायम राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. स्मार्ट उपकरणांच्या निर्मितीसाठी लागणारी चांदी सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या साठय़ापेक्षा जास्त मागणीत आहे. यामुळेच गुंतवणूकदारांना ही धातू सोन्यापेक्षा अधिक फायदेशीर वाटू लागली आहे. पुरवठा साखळीतील अडथळे आणि वाढती तांत्रिक गरज यामुळे चांदीचे दर वेगाने वाढत आहेत. जागतिक स्तरावर सध्या प्रचंड अस्थिरता आहे. युद्धाचे ढग आणि आर्थिक मंदीची भीती यामुळे गुंतवणूकदार शेअर बाजारापेक्षा धातू बाजाराला प्राधान्य देत आहेत. अमेरिकेतील केंद्रीय फेडरल बँक आपल्या व्याजदरात सातत्याने कपात करत आहे. जेव्हा व्याजदर कमी होतात, तेव्हा डॉलरची किंमत घटते आणि गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोने आणि चांदीकडे वळतात. अमेरिकेतील मोठे गुंतवणूकदार सध्या चांदीमध्ये गुंतवणूक करणे लाभप्रद समजत आहेत. ही प्रवृत्ती केवळ व्यक्तींपुरती मर्यादित नाही. जगातील मोठय़ा आणि प्रतिष्ठत बँका आता स्वतःचा चांदीचा साठा वाढवण्यावर भर देत आहेत. चलनाच्या चढउतारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी चांदी हा एक सर्वोत्तम पर्याय ठरत आहे. जागतिक स्तरावर म्युचुअल फंड्सनीदेखील चांदीमध्ये मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक सुरू केली आहे. चांदीचा भाव भविष्यात अधिक वाढेल या खात्रीने हे फंड्स मोठय़ा प्रमाणात साठेबाजी करत आहेत, ज्याचा थेट परिणाम किरकोळ बाजारपेठेवर होत आहे. चांदीच्या बाबतीत एक तांत्रिक अडचण अशी आहे की, चांदीचे स्वतंत्र उत्पादन फार कमी होते.

बहुतेक वेळा ती सोने, तांबे किंवा शिसे यांसारख्या इतर धातूंच्या उत्खननात एक उपउत्पादन म्हणून मिळते. गेल्या अनेक वर्षांपासून चांदीच्या मूळ खाणकामात कोणतीही मोठी वाढ झालेली नाही. यामुळे नवीन चांदी बाजारात येण्याचे प्रमाण अत्यंत मर्यादित आहे. दुसरीकडे, अमेरिकेने चांदीचे महत्त्व ओळखून ती अत्यंत संवेदनशील आणि दुर्मिळ धातूंच्या यादीत समाविष्ट केली आहे. अमेरिकेकडे सध्या सुमारे चेपन्न कोटी औंस चांदीचा साठा असल्याचे सांगितले जाते, जो त्यांच्या नेहमीच्या साठ्यापेक्षा तिप्पट आहे. चीननेदेखील चांदीच्या निर्यातीवर कडक निर्बंध लादले आहेत. जगातील हे दोन मोठे देश जेव्हा चांदीची साठेबाजी करतात आणि निर्यातीवर बंदी घालतात, तेव्हा लंडन आणि न्यूयॉर्कच्या बाजारपेठेत चांदीचा तुटवडा जाणवू लागतो. या कमतरतेमुळे जागतिक स्तरावर चांदीच्या किमतीत भडका उडाला आहे.