आभाळमाया – पृथ्वीचा टाहो

>> वैश्विक 

आपली  पृथ्वी काही ‘सांगते’ आहे, पण कोणी ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही. त्यातलं ‘कोणी’ म्हणजे फक्त मानवसमाज. वनस्पती आणि प्राणीमात्रांना आपल्यासारखी विचारशक्ती नाही. सभोवतालच्या परिस्थितीत बदल करण्याचं किंवा बदलत्या निसर्गचक्रानुसार स्वतःमध्ये बदल करण्याचं अत्याधुनिक तंत्रज्ञान त्यांना ठाऊक नाही. तसं तर निसर्गाचे संकेत पशुपक्ष्यांनाही समजतात. उन्हाळय़ाच्या काळात आफ्रिकेत हजारो गुरं संभाव्य उन्हाळय़ाची चाहूल लागताच झुंडीने स्थलांतर करतात. उत्तर ध्रुवीय प्रदेशात अतिशीत वातावरण निर्माण होतं तेव्हा आधीच तिथले अनेक पक्षी पंखांवर आकाश पेलत हजारो किलोमीटरचा प्रवास करून तुलनेने ऊबदार प्रदेशाकडे झेपावतात. त्यात फ्लेमिंगो (सारस) पक्ष्यांपासून ते पाचेक ग्रॅम वजनाच्या चिमुकल्या वॉब्लर पक्ष्याचाही समावेश असतो. आपली गतवर्षीचीच स्थलांतराची जागा अचूक निवडण्याची त्यांची कला निसर्गदत्त असते. जसं काही त्यांच्या मेंदूत नैसर्गिक ‘होकायंत्र’च असतं. ते रस्ता चुकत नाहीत. त्यासाठी त्यांना कोणतंही ‘ऍप’ लागत नाही. ते आपापलेच आणि आपोआप येतात.

मात्र हे नैसर्गिकरीत्या घडतं. फार विचार करून नव्हे. त्यामुळे या जिवांना अनेकदा निसर्गाच्या लहरीला बळीही पडावं लागतं. झाडंझुडपं, वेली तर जमिनीत रुजलेली मुळं सोडून कुठेही ‘धावू’ शकत नाहीत. म्हणून यंदा ‘ग्लोबल वॉर्मिंग’च्या तीव्र झळा अख्ख्या युरोपला बसतायत. ग्रीसमधल्या अथेन्स या प्राचीन नगराच्या बाहेरची जंगलं वणव्यात होरपळतात. तीच स्थिती अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियात आहे. लंडनवासी लोकांना 40 अंशावर गेलेल्या तापमानाची जन्मात सवय नसल्याने आपण इंग्लंडमध्ये आहोत की आफ्रिकेत असा प्रश्न हे परस्परांना विचारतायत आणि ऑस्टीन (अमेरिका) इथले आमचे एक परिचित उन्हाळय़ाने वैतागून दुसरीकडे घर घ्यायचं का, याचा विचार करतायत.

…पण ‘दुसरीकडे’ म्हणजे कुठे? अवघ्या पृथ्वीवर या ना त्या प्रकारे ‘क्लायमेट चेंज’ ऊर्फ वातावरणीय बदलाचा विपरीत परिणाम जाणवतोय. अंटार्क्टिकावरचं बर्फ वेगाने वितळत असल्याने जगभरातील (मुंबईसकट) अनेक सागर किनाऱ्यांवरची शहरं उद्या पाण्याखाली जातील का याची धास्ती आहे आणि फिजीजवळची काही बेटं तर कायमची बुडीत खाती गेली आहेत. आपल्याकडेही किनारपट्टीच्या काही गावांत समुद्र शिरलाय तो परत जायलाच तयार नाही.

सागरी पाण्याची ही ‘घुसखोरी’, जगभरच्याच वनकाननांमध्ये चाललेलं अग्नितांडव, चीनपासून इंडोनेशियापर्यंत बिनसलेली हवा, आपल्याकडे दिल्लीतला प्रदूषणाचा कहर या सगळय़ा गोष्टींनी पृथ्वीवर संभाव्य उत्पाताची शक्यता आहे याचे भयप्रद संकेत मिळत असतानाही पृथ्वीचा हा ‘टाहो’ ऐकायला स्वतःला ‘बुद्धिमान’ म्हणवणारा माणूस तयार नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट. ‘आभाळमाया’मध्ये पृथ्वीचा विचारही अनिवार्य आहे, कारण पृथ्वी हा विराट विश्वातल्या एका ग्रहमालेतील ताऱ्यापासून तिसऱ्या क्रमांकावर फिरणारा ग्रह आहे. त्यामुळे पृथ्वीवरचे पर्यावरणीय बदल काही अंशी सौरज्वाला (सोलार फ्लेअर) वगैरे गोष्टींवरही अवलंबून असतात. या वर्षी सौर ज्वालांच्या उद्रेकामुळे पृथ्वीवरचं चुंबकीय क्षेत्र विचलित होत असून प्रचंड उष्णतेबरोबरच आपले कृत्रिम उपग्रह, आपली संपर्क साधनं यांनाही फटका बसत आहे. परंतु विचार करायला वेळ आहे कुणाला? जगभरचं सत्ताकेंद्री, मत्ताकेंद्री राजकारण आणि परस्परांवर कुरघोडी करण्याची देशोदेशींची सुप्त नीती यामुळे ‘वसुंधरा परिषदे’त कितीही आणाभाका घेतल्या तरी त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रामाणिकपणा किती दाखवतात हासुद्धा संशोधनाचा विषय आहे.

या सगळय़ा अरिष्टाची चाहूल ज्या एका सुबुद्ध, संवेदनाशील आणि मानवतेसह एकूणच पृथ्वीवासीय वनस्पती, प्राणी यांचा विचार करणाऱ्या एका ध्येयवेडय़ा रसायन तज्ञाला लागली होती. जेम्स लव्हलॉक हे त्यांचं नाव. गेल्या 26 जुलै रोजी वयाची बरोबर 103 वर्षे पूर्ण करून वैचारिक समृद्धीने जगलेला आणि भरकटणाऱ्या मानवजातीला सावध करण्याचा सतत प्रयत्न करणारा शतायुषी आवाज थांबला. 26 जुलै 1919 रोजी जेम्स यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. पर्यावरण बदलांवर प्रदूषणाच्या संभाव्य परिणामांबद्दल त्यानी जे सुमारे साठ वर्षांपूर्वी सांगितलं ते आज प्रत्यक्ष जाणवतंय. तेव्हा त्याना तथाकथित ‘शहाण्या’ लोकांनी वेडय़ात काढलं. पण जेम्स लव्हलॉक यांचं हे ‘वेड’ रचनात्मक आणि मानवजातीला नि पर्यायाने समग्र पृथ्वीला वाचवण्याचं होतं. पृथ्वीचा टाहो या माणसाला आयुष्यभर ऐकू येत होता. त्यांच्या एकूण संशोधनावर केव्हा तरी सविस्तर लिहायला हवं. मात्र त्यांना अभिवादन करताना, अंतराळातला आपल्याला विनासायास मिळालेला निळा, हिरवा आणि अप्रतिम वातावरण असलेला ग्रह टिकवण्याची, संभाव्य विनाशापासून वाचवण्याची जबाबदारी सर्वच पृथ्वीवासीय माणसांची आहे. जगातले सर्व सन्मान त्यांच्यापुढे खुजे ठरले असते, असं जोन्स लव्हलॉक यांच्याबद्दल म्हटले गेले. पृथ्वीचा टाहो ऐकून रचनात्मक कृती करणं हाच त्यांचा सर्वोच्च सन्मान ठरेल.

[email protected]