
>> चित्रा क्षीरसागर
गोवा हे स्वतंत्र राज्य असलं तरी सांस्कृतिकदृष्टय़ा ते अनेक अर्थांनी महाराष्ट्राशी जोडलेलं आहे. यात मराठी भाषेशी असलेलं गोक्याचं नातं अभ्यासताना अनेक पदर उलगडतात. गोव्याची सांस्कृतिक आणि धार्मिक भाषा मराठीच होती आणि आजही आहे.
गोव्याला दीर्घ सांस्कृतिक व धार्मिक परंपरा आहे. पेडणे महाल सावंतवाडीच्या भोसले घराण्याकडे होता. छत्रपतींनी गोव्यातील नार्वे येथील शिवमंदिराचा (सप्तकोटीश्वर) जीर्णोद्धार केला होता. त्याचे शिलालेख नार्वे येथील सप्तकोटीश्वर मंदिरात आहेत. गोव्याची सांस्कृतिक आणि धार्मिक भाषा मराठीच होती आणि आजही आहे. मंदिरातील भजने आणि आरत्या आणि कीर्तने ही मराठी भाषेतून केली जातात.
कृष्णदास श्यामा
गौड सारस्वत ब्राह्मण असलेले कृष्णदास श्यामा हे भगवत भक्त होते. 25 एप्रिल 1526 रोजी त्यांनी कृष्णचरित्रकथा मराठी भाषेत लिहिली. भागवत पुराणाच्या दशमस्कंदावरात त्यांनी मराठी भाषेत टीका लिहिली होती.
संत सोहिरोबानाथ आंबिये
संत सोहिरोबानाथ आंबिये हे नाथसंप्रदायातील गहिनीनाथांचे शिष्य होते. ‘अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे’ असा संदेश देणारे संत सोहिरोबानाथ हे मराठीची पताका मोठय़ा दिमाखाने फडकावीत होते. इ. स. 1714 मध्ये त्यांचा जन्म पालये गावात झाला. त्यावेळी हे गाव सावंतवाडी संस्थानच्या भोसले राजांच्या अखत्यारित होते. सोहिरोबांचे मराठीबरोबरच हिंदी संस्कृत आणि कोंकणी या भाषांवर प्रभुत्व होते. सिद्धांत संहिता, पूर्णाक्षरी, अक्षयबोध, महत् अनुभवेश्वरी हे त्यांचे मराठी भाषेतील ग्रंथ योगशास्त्र्ा, भक्ती आणि नाथसंप्रदायातील अद्भुततेचे प्रतीक आहेत.
कृष्णंभट्ट बांदकर
गोव्यातील डोंगरी गावातील आद्य कीर्तनकार, नाटककार कृष्णंभट्ट बांदकर. त्यांचा जीवनकाळ 1844 ते 1902 असा मानला जातो. कृष्णंभट्टांना बालपणापासून अध्यात्माची आवड. तारुण्यात त्यांना विष्णूबुवा नावाचे सद्गुरू भेटले. त्यांनी मराठी भाषेत ‘नटसुभद्राविलास’, ‘शुकरंभासंवाद’, ‘लोपामुद्रा संवाद अहल्योद्धार’ अशी नाटके लिहिली. त्यांनी राममंदिरात त्याचे प्रयोग केले. गोव्यात भजनाची परंपरा आणि भजन सप्ताह सुरू करणारे जगन्नाथबुवा बोरीकर कृष्णंभट्टांना गुरू मानत. त्यांच्या आज्ञेनेच जगन्नाथबुवा बोरीकर महाराजांनी गोव्यात भजनाची परंपरा निर्माण केल्याचा इतिहास आहे.
गोव्याला परंपरेने मिळालेली मराठी भाषेची देणगी म्हणा किंवा खजिना म्हणा जतन करून ठेवायला हवा. त्यासाठी गोव्यातही प्राचीन काळापासून अनेक संस्था कार्यरत होत्या. आजही आहेत. शतक महोत्सवी अशी गोमंत विद्या निकेतन ही संस्था त्यातील एक. कै. अशोक बोरकर यांच्या प्रेरणेने सुरू झालेली काव्यमैफल आता गोमंत विद्यानिकेतनतर्फे घेण्यात येत आहे. विद्यानिकेतनतर्फे दरवर्षी एका साहित्यिकाला पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. गोमंत साहित्य सेवक मंडळ ही संस्था शतकाकडे वाटचाल करीत आहे. माजी केंद्रीय कायदा मंत्री भाई रमाकांत खलप, गोव्याच्या माजी मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर यांनी साहित्य सेवक मंडळाच्या आश्रयदाते म्हणून भरभरून मदत केली आहे.
गोमंतक साहित्य सेवक मंडळातर्फे अखिल गोमंतक मराठी साहित्य संमेलन घेण्यात येते. गोमंतक साहित्य सेवक मंडळाने आजवर 27 गोमंतक मराठी साहित्य संमेलने घेतली. राम शेवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेले 67 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साहित्य सेवक मंडळाने घेतले होते. मंडळातर्फे कवितालेखन, कथालेखन, नाटय़लेखन कार्यशाळांचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. मंडळाने 1972 मध्ये ‘गोमंत शारदा’ हा गोव्यातील मराठी कवितांचा प्रातिनिधिक संग्रह प्रसिद्ध केला आहे.
कोकण मराठी परिषद या संस्थेतर्फे कर्नाटक, महाराष्ट्रातही प्रसिद्धी पावलेले शेकोटी साहित्य संमेलन भरविण्यात येते. आतापर्यंत अशी 16 शेकोटी साहित्य संमेलने झाली आहेत. शिक्षकांना पुरस्कार, ज्येष्ठ गोमंतकीय साहित्यिकाला कवी कालिदास पुरस्कार देण्यात येतो. संस्था माजी केंद्रीय कायदा मंत्री भाई रमाकांत खलप आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ. सोमनाथ कोमरपंत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करीत आहे. सध्या सागर जावडेकर अध्यक्ष, सचिव चित्रा क्षीरसागर तर कोषाध्यक्ष अजित नार्वेकर आहेत.
दै. ‘गोमंतक’चे तत्कालीन संपादक नारायण आठवले यांनी गोव्यात मराठीचे स्थान अबाधित राखण्यासाठी व मराठीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शशिकांत नार्वेकर, नारायण आठवले प्रभाकर भुसारी आदींच्या सहकार्याने 1987 साली गोमंतक मराठी अकादमी ही संस्था सुरू करून स्वतः झोळी घेऊन फिरले होते.
गोमंतक मराठी अकादमीच्या मराठी भवनची भव्य वास्तू उभारण्यासाठी लोकांकडून निधी जमा करण्यात आला. उद्योगपतींनी मदत केली. शशिकलाताई काकोडकर यांनी मदत केली. या गोमंतक मराठी अकादमीने गोव्यात 56 मराठी संस्कार केंद्रे सुरू केली, युवा मराठी साहित्य संमेलने सुरू केली. गोमंतक मराठी अकादमीने मराठी नाटय़ स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, व्याख्याने, कथा-कविता स्पर्धा, मराठी पुस्तकांसाठी अनुदान, पुस्तक पुरस्कार, चर्चासत्रे आदी कार्यक्रम आयोजित केले आहेत.
सरकारने 12 ऑगस्ट 2014 रोजी प्राचार्य अनिल सामंत यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र सरकारी गोवा मराठी अकादमी स्थापन केली. या अकादमीतर्फे गोव्यात महामराठी साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशनार्थ लेखकांना अनुदान, मराठी मेळावे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत मराठी भाषेचे प्रेम वृद्धिंगत व्हावे, यासाठी विविध उपक्रम व योजना सुरू करण्यात आल्या. पुस्तक प्रकाशन, कविसंमेलन, महिलांसाठी कार्यक्रम, स्वतंत्र महिला संमेलन युवकांसाठी कार्यक्रम गोवा मराठी अकादमी घेत आहे. गोवा मराठी अकादमीने साहित्य पुरस्कार योजनाही राबवली आहे. सरकारची सेंट्रल लायब्ररी, कोलकाता येथील राजाराम मोहन रॉय ग्रंथालय, गोवा सरकारचे शिक्षण संचालनालयदेखील मराठी भाषेतील पुस्तके खरेदी करीत असते. इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा ही सरकारी संस्था मराठी साहित्याच्या संवर्धनासाठी काम करते. माधवी देसाई यांच्या प्रेरणेने फोंडा येथे श्री शारदा ग्रंथप्रसारक मंडळाची स्थापना करण्यात आली. मंडळाने 15 संमेलने घेतली आहेत. चित्रा प्रकाश आणि प्रकाश रामचंद्र क्षीरसागर संचालक असलेली ताळगाव येथील माधव राघव प्रकाशन संस्था. या संस्थेतर्फे मराठी भाषेच्या जतन व संवर्धनसाठी लिहिणाऱया हातांचा उत्सव, पुस्तकांवर चर्चासत्रे, कविसंमेलने व अखिल गोवा स्तरावरील मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
‘गोमंतक’, ‘नवप्रभा’ आणि ‘बेळगाव तरुण भारत’ची गोवा आवृत्ती, दै. ‘पुढारी’, दै. ‘लोकमत’, ‘हेराल्ड’, ‘गोवन वार्ता’, ‘गोवा टाइम्स’ ही दैनिके प्रकाशित होतात. दै. ‘गोवा दूत’ या वृत्तपत्राचे प्रकाशन सध्या बंद आहे.
(लेखिका गोव्यातील साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या आहेत.)





























































