प्रासंगिक – परस्परात मैत्रभाव नांदावा

348

>>  प्रा. डॉ. नरेंद्र कुंटे

आज गोकुळाष्टमीचा ‘गोपाळकाला’ म्हणजे श्रीकृष्णजन्म सोहळय़ाचे प्रसाद वाटप केले जाऊन त्यायोगे आपण कृतार्थ होतो. आजच संत ज्ञानेश्वर महाराजांची जयंती आहे. ‘ज्ञानेशो भगवान विष्णुः’ असे म्हटलेही जाते. श्रीज्ञानदेवांनी जन्म घेऊन श्रीकृष्णाने सांगितलेल्या गीतोपदेश श्रीज्ञानेश्वरी ग्रंथाद्वारे स्वमतभाष्यासह प्रकट केला. त्यातही ग्रंथाच्या शेवटी त्यांनी जगातील सर्व मानवजातीचे-प्राणिमात्राचे कल्याण व्हावे हेच ‘पसायदान’ लिहून आपल्या सद्गुरू निवृत्तीनाथांकडे मागणे मागितले. जगात मानवाचे कल्याण करणारी इतकी व्यापक प्रार्थना दुसरी कोणतीही नाही. त्यानिमित्ताने आज आपण त्यांचे मागणे काय होते याचा मागोवा घेऊया. त्यायोगे कल्याणाचा मूलमंत्रच आपल्या मनबुद्धीत जन्म घेईल व आपण त्याचे आचरण करू शकू, असा संकल्प करूया.

विश्वात्मक देवाला प्रार्थना

श्रीज्ञानदेवांनी पसायदानात प्रथम सद्गुरूंशीच आत्मसंवाद केला आहे. कसा म्हणाल? तर ‘आता विश्वात्मके देवे। येणे वाग्यज्ञे तोषावे। तोषोनि मज द्यावे। पसायदान हे।।’ इथे ‘विश्वात्मक देव’ म्हणजे सद्गुरू निवृत्तीनाथ होत. माझ्या निरुपणाने आपण संतुष्ट आहात ना, असे विचारतानाच संतुष्ट होऊन आपण मला ‘पसायदान’ कृपाप्रसाद द्यावा, असे विनवले आहे. अशा सद्गुरू वंदनानंतरच ते त्यांच्याकडे पुढील माझी प्रार्थना फलद्रूप करावी, असे विनवले आहे. ते म्हणतात, ‘जे खळांची व्यंकटी सांडो। तया सत्कर्मे रती वाढो। भूतां परस्परे जडो। मैत्र जीवांचे।। इथे खळजन म्हणजे समाजातील दुष्ट लोक आणि देहातील विषयी इंद्रिये अशा दोघांनाही त्यांनी लोकमनाशी व देहमनाशी वाकडेपणा (संघर्ष) आणू नका, असे विनवले आहे. का? तर त्यांना मनुष्यजीवाचे ‘मैत्रभाव’ ठेवून राहावे, असे विनवले आहे. तरच सामाजिक आणि देह-इंद्रियादी सौख्य राहू शकेल ही त्यामागील त्यांची भूमिका आहे.

सर्वांची इच्छापूर्ती व्हावी

पुढे ते म्हणतात, ‘दुरितांचे तिमिर जावो। विश्वस्वधर्म सूर्ये पाहो। जो जे वांछिल तो ते लाहो। प्राणिजात।।’ म्हणजेच दुःखरूपी अंधकार नाहीसा होऊन स्वधर्मरूपी सूर्य आपल्या कार्यातून प्रकट व्हावा इतकेच नव्हे तर सर्व प्राणिमात्रांची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होऊ दे ही व्यापक हित-कल्याणाची भावना व्यक्त केली आहे. ‘वर्षत सकळ मंगळी। ईश्वर निष्ठांची मांदियाळी। अनवरत भूमंडळी। भेटतु भुतां।।’ मांगल्याचा वर्षाव व्हावा, ईश्वरनिष्ठांचा समूह निर्माण व्हावा, म्हणजे परस्परांतील प्रेम वर्धिष्णु होईल. पुढे तर ते सांगतात की, कल्पतरू, चिंतामणी, अमृत एकत्रितपणे समाजमनात पाहावयास मिळोत. त्यांची प्राप्ती व्हावी.

सज्जनांची सांगती भेटो

कलंक नसलेला चंद्र हवा, उष्णतेचा दाह देणारा सूर्य नको, अशा सज्जनांची संगती प्राप्त होऊ दे. शीतलता आणि सौम्यता अशा सज्जनांची भेट व्हावी. किंबहुना सर्वसुखी। पूर्ण होवोनि तिन्ही लोकी। भजिजो आदि पुरुखी। अखंडित।’ म्हणजेच सर्वत्र सौख्य प्राप्त होऊन ईश्वराला भजावे. सर्वांचे सर्वकल्याण करणारा तोच आहे. (सद्गुरूंना समृद्धाय ज्या मानवत आहे तो ईश्वरापेक्षा वेगळा नाही।।) ‘आणि ग्रंथोपजीविये। विशेषी लोकी इथे। दृष्टादृष्ट विजये। होवावे जी।।’ म्हणजेच भक्तिज्ञानपर ग्रंथोपदेश घेऊन त्याप्रमाणे आचरण करणाऱयांना ईश्वराची भेट (दर्शन) व्हावी. (कारण त्यातच जीवनाची सार्थकता आहे. सन्मार्ग, सद्विचार, सदाचार, सद्भावना, सत्कर्म यामुळेच जग सुखी होणार असल्याने सद्गुरूंच्या कृपाप्रसादाने सारे जग सुखी व्हावे हा केवढा ‘व्यापक’ विचार श्रीज्ञानदेवांनी मांडला आहे. त्यायोगे सद्गुरू निवृत्तीनाथांनी ‘तथास्तु’ म्हटल्याने श्रीज्ञानदेवांनाही संतोष जाहला.

आपली प्रतिक्रिया द्या