मुद्दा – गोल्डन क्रिसेंट व गोल्डन ट्रँगल

>> हविशेष बेडेकर

संयुक्त राष्ट्र अमली पदार्थ व अपराध कार्यालयाच्या अहवालानुसार हिंदुस्थानला अमली पदार्थांच्या बेकायदेशीर व्यापाराचा धोका उद्भवतो आहे. हिंदुस्थानचा जवळपास 15106 किलोमीटर अतिरिक्त भूभाग पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, बांगलादेश व म्यानमार यांच्याबरोबर जोडलेला आहे. नक्षलवाद, सशस्त्र बंडखोरी व आतंकवादप्रमाणेच अमली पदार्थांच्या बेकायदेशीर व्यवहारांचे भयंकर जाळे हळूहळू तयार होत आहे. त्याबरोबर ओपियम, हॅश व हेरॉइनसारख्या अमली पदार्थांच्या उत्पादनाचा आधारभूत मानल्या जाणाऱया गोल्डन क्रिसेंट व गोल्डन ट्रँगल यांच्या मधोमध हिंदुस्थान आहे.

अफगाणिस्तान, इराण व पाकिस्तान हा प्रदेश गोल्डन क्रिसेंट म्हणून ओळखला जातो. ओपियम या हानिकारक अमली पदार्थाचे सगळ्यात जास्त उत्पादन अफगाणिस्तानात होते. हिंदुस्थानमार्गे चीन व रशियाखेरीज 95 टक्के पुरवठा युरोपीय देशांना बेकायदेशीरपणे केला जातो. बहुतांश तरुणांना याचे आकर्षण असून सिगारेट, पाइप तसेच नाकाद्वारे ओढून याचे सेवन केले जाते व इराण, पाकिस्तानमध्ये मोठय़ा प्रमाणात मागणी आहे.

म्यानमार, लाओस व थायलंड हा प्रदेश गोल्डन ट्रँगल म्हणून ओळखला जातो. येथील रुआक व मेकोंग नद्यांद्वारे अमली पदार्थांची तस्करी केली जाते. अफगाणिस्ताननंतर म्यानमार हा दुसरा सर्वाधिक ओपियम उत्पादक देश आहे. 2006नंतर ओपियम, हॅश व हेरॉइन यांचे कृत्रिम औषधांमध्ये रूपांतर करून शेजारील देशांना मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीर पुरवठा केला जातो आहे. भ्रष्टाचार, गरिबी व तेथील सरकारच्या कमकुवत धोरणामुळे या अमली पदार्थांची तस्करी होणे शक्य होते.

हिंदुस्थानी सुरक्षा आव्हाने

UNODC नुसार 2006 नंतर हिंदुस्थानात कृत्रिम औषधांद्वारे अमली पदार्थांची मागणी वाढली. 1993 व पुलवामा हल्ल्यादरम्यान असे आढळून आले की, ज्या मार्गांद्वारे शस्त्रांची तस्करी केली जाते त्याच मार्गांनी अमली पदार्थ पुरविले जातात. यातून तयार होणारा पैसा आतंकवाद व सशस्त्र बंडखोरीसाठी वापरण्यात येतो. आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक बाब अशी की, हिंदुस्थानातील उत्तर पूर्व भागातील नागरिकांना या अमली पदार्थांच्या सेवनामुळे एडस्सारख्या भीषण रोगाला बळी पडावे लागले आहे. अशामध्ये सरकारचा वेळ आरोग्य संघटना बळकट करण्याऐवजी नागरिकांचे पुनर्वसन करण्यामध्ये जातो.

प्रतिबंधात्मक धोरणे

सर्वप्रथम हिंदुस्थानने Narcotics Drugs and Psychotropic Substances Act, 1985 कायदा अधिक कठोर करणे गरजेचे आहे. खरेदी-विक्री उत्पादनाशिवाय या पैशातून घर, शेती तसेच उद्योगधंदे चालू करणाऱयांची मालमत्ता हस्तगत करून आजन्म कारावासाची शिक्षा असावी. 2019 हिंदुस्थान- बांगलादेश सीमेअंतर्गत Electronic Border Surveillance Project सारखे आधुनिक तंत्रशुद्ध कार्यक्रम पाकिस्तान, चीन, म्यानमार, भूतान, सीमेदरम्यान राबवण्यात यावे. अफगाणिस्तानच्या ओपियम आणि हेरॉइन उत्पादन व तस्करी रोखण्यासाठी फेब्रुवारी 2020 आयोजित Combating Drug Trafficking Conference मध्ये सर्व BIMSTEC सदस्यांनी मान्यता दिली. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे नजीकच्या काळात बे ऑफ बंगालअंतर्गत जवळपास 1200 किलो अमली पदार्थांची समुद्राद्वारे तस्करी रोखण्यात हिंदुस्थानला यश मिळाले.

आपली प्रतिक्रिया द्या