
>> स्पायडरमॅन
काही दिवसांपूर्वीच व्हॉट्स अॅपच्या नव्या पॉलिसी धोरणाविरुद्ध वादळ उठले होते. यूजर्सच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागल्यानंतर आणि अनेक यूजर्सनी व्हॉटस्ऍपला रामराम ठोकायला सुरुवात केल्यानंतर फेसबुकला शहाणपण आले आणि त्यांनी आपल्या मालकीच्या व्हॉट्स अॅपच्या यूजर्स पॉलिसीला मागे घेतले. हा वाद शमतो न शमतो तोवरच गुगलने नवीन नियम बनवले असून ते यूजर्सनी स्वीकारणे बंधनकारक आहे. अन्यथा तुमचे गुगल ई-मेल खाते बंद होणार आहे, असा मेसेज सोशल मीडियावर फिरत आहे. मात्र गुगलचा वापर करणाऱयांना चिंता करण्याचे बिलकूल कारण नाही. सोशल मीडियावर फिरणारा हा मेसेज अर्धवट खरा आणि अर्धवट खोटा असा आहे. गुगलने नक्कीच आपल्या धोरणात काही बदल केले आहेत जे ग्राहकांना स्वीकारणे अनिवार्य आहे. मात्र सध्या तरी हे धोरण फक्त ब्रिटनसाठीच आहे आणि हे धोरण उलट काही प्रमाणात गुगलच्या जी मेल वापरकर्त्यांना फायदेशीर असेच आहे. या नव्या धोरणामुळे आपला नक्की कोणता ‘पर्सनल डाटा’ गुगलशी शेअर करायचा हे ठरवण्याचा अधिकार जी मेल वापरकर्त्याला मिळणार आहे. मुख्य म्हणजे गुगलने जारी केलेले नवे बदल न स्वीकारल्यास कोणत्याही यूजरचे खाते बंद होणार नाही. मात्र हे नवे बदल न स्वीकारणाऱया यूजर्सला जी मेलचे काही खास फीचर्स, जसे की, ‘असिस्टंट रिमाइंडर, ऑटोमॅटिक ई-मेल फिल्टरिंग फीचर आणि स्मार्ट कंपोज’ वापरता येणार नाहीत. हे फीचर्स अत्यंत उपयुक्त असून यूजर्सचा त्याला मिळणारा प्रतिसाददेखील मोठा आहे. तसेही गुगलने आपल्या Gmail, Google Photos आणि Google Drive या सेवांसाठी नवे धोरण आखलेले असून त्यासंदर्भात आपल्या यूजर्सना यापूर्वीच माहिती दिलेली आहे. या सेवा सुरळीत चालू ठेवण्यासाठी या धोरणाचा स्वीकार करणे आवश्यक असणार आहे.




























































