लेख – क्रिकेट सम्राट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप जोशी  

ब्याण्णव वर्षांचं ‘तडाखेबंद’ समृद्ध जीवन व्यतीत करून सर डोनाल्ड जॉर्ज ब्रॅडमन 25 फेब्रुवारी 2001 रोजी हे जग सोडून गेल्याला दोन दिवसांनी एकवीस वर्षे होतील. या काळात जगभरात अनेक तरुण क्रिकेटपटू जन्माला घेऊन मैदान गाजवायला लागले आहेत. जुन्या-नव्या सर्व क्रिकेटपटूंसाठी आणि समस्त क्रिकेटरसिकांसाठी ब्रॅडमन हे नाव कायमच आदरणीय राहणार. कारण क्रिकेटच्या विश्वातला 29 कसोटी शतकं झळकवण्याचा विक्रम डॉन ब्रॅडमन यांनी केला. कालांतराने 1983 मध्ये आपले सुनील गावसकर यांनी 30 वं शतक करून हा विक्रम पार केला. त्यानंतरच्या शतकांचा विक्रम आपल्याच सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. या परंपरेच्या आरंभाचे मानकरी मात्र डॉन ब्रॅडमन. 27 ऑगस्ट 1908 रोजी ऑस्ट्रेलियातील साऊथ वेल्स भागात त्यांचा जन्म झाला. गोल्फ आणि क्रिकेट या दोन खेळांचं डॉन ब्रॅडमन यांना विलक्षण आकर्षण होतं. क्रिकेटमध्ये पदार्पण करताच डॉनच्या बॅटिंगची चमक दिसू लागली. काऊण्टी क्रिकेटपासून टेस्ट क्रिकेटपर्यंतचा डॉनचा प्रवास वेगाने झाला.

डॉन ब्रॅडमनच्या काळात क्रिकेटचं आता आहे तसं उदंड पीक आलेलं नव्हतं. टेस्ट किंवा कसोटी क्रिकेटचे सामने व्हायचे. तेही अभावानेच व्हायचे. अशा काळात ब्रॅडमनची बॅट तळपली. 20 वर्षांची त्यांची क्रिकेट कारकीर्द संपली तेव्हा ते चाळीशीत होते आणि 18 ऑगस्ट 1948 रोजी इंग्लंडविरुद्धचा शेवटचा कसोटी सामना खेळून ते निवृत्त झाले तेव्हा त्यांच्या खाती अठ्ठावीस शतकांसह 99.94 टक्के सरासरी धावसंख्येची नोंद होती. ती अजूनही कोणी मागे टाकलेली नाही.

ब्रॅडमनच्या नावे क्रिकेटच्या मैदानावरचे अनेक विक्रम आहेत आणि त्यातले कितीतरी आजही मोडलेले नाहीत. निवृत्तीनंतरची तीन दशकं त्यांनी ऑस्ट्रेलियन क्रिकेटला सातत्याने मार्गदर्शन केलं. 1997 मध्ये ब्रॅडमन यांना निवृत्त हाऊन ‘हाफ सेंच्युरी’ झाल्यावरही जनतेत ते कमालीचे लोकप्रिय होते आणि तत्कालिन ऑस्ट्रेलियन प्रधानमंत्री जॉन हॉवर्ड यांनी त्यांचा ‘ग्रेटेस्ट लिव्हिंग ऑस्ट्रलियन’ म्हणून गौरव केला होता.

जॉर्ज आणि एमिली ब्रॅडमन या दांपत्याचं शेंडेफळ म्हणजे डॉन. एक भाऊ आणि तीन बहिणी अशी त्यांची भावंडं. त्यांना आईवडिलांकडून ब्रिटिश वारसा लाभलेला होता. वयाच्या एकवीसाव्या वर्षी डॉनने क्रिकेटसाठीच्या पहिल्या इंग्लंड दौऱ्यात, 1930 मध्ये इंग्लंडमधील पूर्वजांचा वारसा आणि नातेवाईकांचा पत्ता शोधला. इंग्लंडहून ऑस्ट्रेलियात स्थलांतरित झालेल्या कुटुंबांपैकी ब्रॅडमन यांचं एक कुटुंब. दक्षिण ऑस्ट्रेलियात जिथे ब्रॅडमनचा जन्म झाला ती आता तेथील सरकारने म्युझियम म्हणून घोषित केली आहे.

कोणत्याही क्षेत्रातला विक्रमवीर एकाएकी तयार होत नाही. त्यामागे त्या व्यक्तीची जिद्द आणि परिश्रम असतात. ध्यास असतो. डॉन 12 वर्षांचे असताना त्यांचे काका जॉर्ज व्हॅटमॅन खेळत असलेल्या क्रिकेट सामन्याचा ‘स्कोअर’ नोंदण्याचं काम करत होते. नंतर एकदा एक खेळाडू कमी पडतो म्हणून त्यांना संघात घेण्यात आलं. पदार्पणात 37 आणि 29 धावा डॉननी काढल्या. ते पाहून वडिलांनी त्यांना सिडनी क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या पाचव्या ‘ऍशेस’चा सामना पाहण्यासाठी नेलं. तिथेच त्यांनी प्रतिज्ञा केली की, ‘या मैदानावर क्रिकेट खेळायला मिळेपर्यंत माझं समाधान होणार नाही.’ पुढे 1922 मध्ये शाळेतून बाहेर पडल्यावर क्रिकेटची प्रॅक्टिस सुरू झाली, पण मध्येच दोन वर्षे टेनिसच्या प्रेमात पडल्यामुळे क्रिकेट काहीसं बाजूला पडलं. पुन्हा 1925च्या दरम्यान त्यांची दमदार फलंदाजी प्रेक्षकांना दिसू लागली.

डॉन ब्रॅडमन यांनी किती कसोटी खेळल्या, त्यात किती धावा काढल्या, फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये कोणता पराक्रम केला आणि किती शतकं किंवा अर्धशतकं झळकावली हे सारं अनेकदा लिहून आलंय आणि सर्वत्र उपलब्धही आहे, पण 1928 ते 1948 या वीस वर्षांच्या काळात त्यांनी 52 कसोटी सामन्यांमध्ये 29 शतकं केली तर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 117! कसोटीमधल्या त्यांच्या सरासरी धावसंख्येपर्यंत आजही कोणी पोचू शकलेलं नाही.

याची दखल अवघ्या जगाने घेतली. ब्रॅडमनचे पोस्टाचे स्टॅम्प निघाले, नाणी निघाली. त्यांच्या कर्तृत्वाचं दर्शन घडवणारं म्युझियमही त्यांच्या हयातीतच उभं राहिलं. जगातल्या क्रिकेटपटूंना ब्रॅडमन यांची भेट म्हणजे क्रिकेटचा देव भेटण्यासारखं वाटायचं. 25 फेब्रुवारी 2001 राजी त्यांचं देहावसान झालं. पुढे 2008 मध्ये त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रॉयल ऑस्ट्रेलियन मिंट (टाकसाळ) 5 पाऊंडाचं सोन्याचं नाणं प्रस्तृत केले आणि 2009 मध्ये आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये त्यांची स्मृती जतन करण्यात आली. साऱ्या जगाला प्रेरणा देणाऱ्या व्यक्ती त्यांच्या जीवनातच ‘दंतकथा’ बनतात आणि नंतरच्या पिढय़ांनाही स्फूर्ती देतात.

[email protected]