आभाळमाया – संपात बिंदूंची गोष्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आज गुढीपाडवा. आपला मराठी नववर्ष दिन. चैत्र मासारंभ म्हणजे वसंत ऋतूचीही सुरुवात, परंतु अवकाशातील सूर्य-पृथ्वीच्या ‘नात्या’मुळे 21 मार्चला वसंत संपाद बिंदू किंवा व्हर्नल-इक्विनॉक्सच्या जागी सूर्य असेल. याचा अर्थ सूर्याचं उत्तरायण. 21 डिसेंबरला सुरू होऊन तीन महिने झाले आणि आता तो पृथ्वीच्या उत्तर गोलार्धावर ‘अधिकृत’पणे तळपणार आहे. 21 तारखेला सूर्य बरोबर विषुववृत्तावर असेल. गेले काही महिने म्हणजे 21 सप्टेंबरपासून हळूहळू लहान होत गेलेला आणि 21 डिसेंबरला सर्वात मोठी काळोखी रात्र असलेला काळ 22 डिसेंबरपासून संपला. 21 डिसेंबरला शरद संपात किंवा विन्टर इक्विनॉक्स असं नाव आहे. आपल्याकडे त्याला अनिष्टंभ बिंदू म्हणतात. तर 21 जून रोजी सूर्य पृथ्वीच्या उत्तर गोलार्धावर सर्वात – शेवटच्या बिंदूपाशी पोचतो तो विष्टंभ बिंदू किंवा समर सॉल्टेइस असं म्हटलं जातं.

एवढा वेळ आपण सूर्य पृथ्वीच्या दक्षिणोत्तर गोलार्धावर कसा ‘फिरतो’ असे उल्लेख केले, परंतु स्थिर सूर्य फिरत नाही. सूर्याभोवती फिरते ती पृथ्वी. हाच आपला ग्रह स्वतःभोवतीही फिरून दिवस-रात्रीचा ‘खेळ’ करतो. पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या गरगरण्यातून एखाद्या फिरत्या भोवऱयासारखी तिची अवस्था होते आणि त्यातूनच काहीशी थरथरणारी ‘परांचन’ गतीही उत्पन्न होते. त्यामुळे ना धुवतारा ‘अढळ’ राहतो ना संताप बिंदू स्थिर असतो. हे वसंत आणि शरद संपात बिंदू दरवर्षी 50.2 कोनीय सेकंद किंवा दर 72 वर्षांनी 1 अंश ‘मागे’ जातात.

सहाजिकच नक्षत्रचक्रात पिंचित बदल होतो. पाश्चात्य ‘कॅलेन्डर’नुसार वसंत संपात बिंदू जिथे असेल तिथूनच ते राइम्पिक्राचा आरंभ करतात आणि पुढच्या प्रत्येक 30 अंशांना मेष, वृषभ ते मीन अशी 12 नावं देतात. मात्र आपल्याकडच्या पंचांगात, प्राचीन काळापासून नक्षत्रांचाही विचार केला गेला. राशी आपल्याकडे नंतर आल्या असंही म्हटलं जातं. त्यामुळे एका राशीत सुमारे अडीच नक्षत्र असा आपला हिशेब असतो. अनिष्टंभ बिंदूला आयन चलन लक्षात घेऊन उत्तरायण ठरवताना ‘संक्रांत’ करायची तर तेव्हा सूर्य मकर राशीच्या पार्श्वभूमीवर आता दिसत नाही. पूर्वी तो असणार, पण 72 वर्षांनी संपात बिंदू एक अंश मागे गेला या स्पष्ट गणिताने तो आता तिथे नाही. पण सण परंपरेने ठरतात. त्यामुळे आपण 14 (किंवा क्वचित 15) जानेवारीलाच संक्रांत साजरी करतो. तेव्हा सूर्य मकर राशीच्याच पार्श्वभूमीवर दिसतो.

आपल्या पद्धतीने बारा राशींचे आकारही संपात चलन झालं तरी बदलत नाहीत. पाश्चात्यांच्या राशीचक्रात आकार बदल घडतो. आता आजचा गुढीपाडवा हा आपल्या कालगणनेनुसार चैत्र-वैशाख वसंतऋतु मानला जातो.

21 मार्चनंतरचा दृश्य फरक आपल्याला जागवायला लागला आहे तो ‘दिवसा’चा कालावधी वाढत चालला आहे. त्यावरून. आस्तेकदम सूर्य आपल्या उत्तर गोलार्धावरील शहरांच्या ‘डोक्यावर’ क्रमाक्रमाने येईल. आपल्या महाराष्ट्रात साधारण 15 ते 20 अंशांचा प्रदेश येत असल्याने मुंबईत सूर्य बरोबर माथ्यावर येतो. तो 16 मेच्या आसपास. दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील शहरांवर तो काही दिवस आधी तर विदर्भात सर्वात शेवटी माध्यान्हीला बरोबर माथ्यावर असेल.

आता याच निमित्ताने थोडं ध्रुव ताऱ्याच्या ‘अढळ’ पदाविषयी. खगोलाचा अभ्यास नसेल तर कोणीही ‘धुव’ ताऱयाला ‘अढळ’च म्हणेल. प्रत्यक्षातही अनेक पिठ्या तो ‘तिथेच’ असल्याचं सांगतील आणि ते खरंही असेल. याचं कारण म्हणजे पृथ्वीच्या परांचन गतीमुळेच पृथ्वीचा उत्तर-ध्रुवबिंदू अवकाशातील ज्या ताऱ्याकडे सध्या रोखला गेला आहे तो आताचा ध्रुवतारा. पृथ्वीच्या उत्तर धुवावरून डोक्यावर दिसतो. म्हणूनच त्याला ‘ध्रुव’ तारा म्हणतात. मुंबईतून ध्रुवतारा क्षितिजापासून 19 अंश उंच दिसतो. दक्षिणकडे कन्याकुमारीला गेलो तर तो अगदी क्षितिजापाशी म्हणजे आठ अंश उंचीवर दिसेल. जसजसं उत्तरेकडे जाऊ तसतसा ध्रुवतारा क्षितिजापासूनच्या उंचीचा अंश वाढेल.

सूर्य ‘डोक्यावर’ येण्याचा पृथ्वीवरचा भाग, पृथ्वीच्या विषुव धुवाच्या साडेतेवीस अंश दक्षिणेला आणि साडेतेवीस अंश उत्तरेला संपतो. याचा अर्थ हिंदुस्थानात उज्जैन आणि त्याच्या पट्ट्यातील साडेतेवीस उत्तर अंशांवरची ठिकाणं सूर्य विशिष्ट तारखेला दुपारी माथ्यावर येण्याची असतात. तीच गोष्ट 21 सप्टेंबरनंतर सूर्य दक्षिण गोलार्धात (भासमान) गेल्यानंतर घडते. दिल्लीमध्ये सूर्य माथ्यावर कधीच दिसणार नाही.

धुव ताऱ्याविषयी आणखी सांगायचं तर ‘ध्रुवतारा’ बदलतो. म्हणजे पृथ्वीच्या उत्तर धुवीय बिंदूच्या वर्तुळाकार फिरण्याने, अवकाशातील काही महत्त्वाचे तारे, त्या ‘वर्तुळा’वर येतात. आजच्या आपल्या धुवताऱयाच्या आधी ‘ठुबान’ नावाचा ‘धुवतारा’ असल्याची नोंद तत्कालीन इजिप्शियन खगोल अभ्यासकांनी केली आहे. आपला पुढचा धुवतारा अभिजित नावाचा तेजस्वी तारा असेल. त्यावेळी आजच्यासारखा ‘धुवतारा’ शोधावा लागणार नाही, कारण अभिजित तेजस्वीतेमध्ये 5 व्या क्रमांकाचा तारा आहे.

हे धुवतारा बदलण्याचं चक्र सुमारे 26 हजार वर्षांचं आहे. तेव्हा आपल्याला निदान 13 हजार वर्षे तरी त्याची चिंता नको. नववर्षांरंभी काही खगोलीय संकल्पना जाणून हे वर्ष ‘अभ्यासोनि प्रगटण्या’ ठरो अशी सदिच्छा!