प्रासंगिक – गुरुदेवांचा परमार्थ – सोपान

>>  प्रा. डॉ. नरेंद्र कुंटे

थोर तत्त्वज्ञ व साक्षात्कारी संत प्रा. डॉ. रा. द. तथा श्री गुरुदेव रानडे यांची 64 वी पुण्यतिथी तिथीप्रमाणे ज्येष्ठ शुद्ध दशमीला कोरोना निर्बंधांचे पालन करून साजरी झाली. त्यानिमित्ताने ‘श्री गुरुदेवांचा परमार्थ सोपान’ याविषयी इथे मागोवा घेतला आहे.

श्री गुरुदेवांनी आपल्या सर्वच ग्रंथांत ‘नामस्मरण हाच परमार्थ’ असा तत्त्वविचार मांडला असून सर्वप्रथम तो त्यांनी सद्गुरू श्री भाऊसाहेब महाराज उमदीकर यांच्या आज्ञेवरून व मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या ‘नित्यनेमावली’ या भजनावलीत वयाच्या 24 व्या वर्षी ‘बीज’ रूपाने प्रकट केला आहे. त्यावेळी व्यापक-स्वरूप त्यांनी तत्त्वज्ञान स्वानुभूतीद्वारे आपल्या ग्रंथातून मांडले आहे. हे बीज वचन कोणते म्हणाल? तर ‘ईश्वराचे नाम घेतले असता रूप सहजीत प्रकट होणार आहे. अहर्निशी नाम घोकिले असता देवास भक्तापासून अन्यत्र जाताच येणार नाही.’ (नित्यनेमावली, प्रकाशक श्री गुरुदेव रानडे समाधी ट्रस्ट, निंबाळ, आवृत्ती 17 वी/पृष्ठ नं. 22) या बीज वचनातील दोन शब्द हे परमार्थाचा पाया आहेत. ईश्वरदर्शन घेऊन येण्यात आणखी काही पूरक-तत्त्वे असून त्या विषयाचा विचार सूत्रबद्ध स्वरूपात श्री गुरुदेवांचे भाचे व तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक नरहर गणेश दामले यांनी ‘परमार्थ सोपान’ या ग्रंथास लिहिलेल्या प्रस्तावनेत (पृ. 12 ते 15) विशद केले आहेत. हा ग्रंथ परमार्थपर पदांचा असून त्याचे संकलन श्रीगुरुदेव रानडे यांनी केलेले आहे. त्या प्रस्तावनेतील पूरक – तत्त्वांचा मागोवा इथे घेतला आहे.

नाम व नीती

प्रा. न. ग. दामले यांनी श्री गुरुदेवांना अभिप्रेत असलेल्या ‘परमार्थ सोपान’ची व्याख्या केली आहे. (1) ज्ञानमूलक (2) नीतिप्रधान (3) साक्षात्कारपर्यनवसायी (4) नामस्मरणात्मक भक्तियोग’ असा त्यातील वाटचालीचा क्रममार्ग आहे. ज्ञानमूलकमध्ये सम्यकविवेक समविष्ठत आहे. भक्तिसाधना कशी करावी हा प्रश्न अनेकांना पडतो. त्यासाठीची वाटचाल कशी करावी यासंबंधीचे मार्गदर्शन त्यात असल्याने त्याचा मागोवा इथे नम्रपणाने घेतला आहे.

‘ज्ञानमूलक’मध्ये त्यांनी अंधश्रद्धा अथवा भोळसटपणा यांचा स्पर्श होऊ न देता आपण डोळसपणाने संत-सत्पुरुष-सद्गुरू यांनी तो कोणत्या साधनेने आत्मसात केला आहे व स्वतः त्यांनी ईश्वरदर्शन प्राप्त करून घेतला आहे काय? या संदर्भातील माहिती यथैवपणे मिळविली पाहिजे. मग त्यांच्याकडून अनुग्रह घेऊन त्यांनी दिलेल्या नाममंत्राचे सदैव व सर्वत्र स्मरण केले पाहिजे. ज्ञान म्हणजे नामच होय. त्यायोगेच आत्मज्ञान (ईश्वरदर्शन) प्राप्त करून घेता येते. ‘नाम व नीती’मध्ये नामाइतकीच नीती महत्त्वाची आहे. विवेकज्ञानामुळे (सार काय नि असार काय?) गोंधळ व अस्पष्टता नाहीशी होते. नीतीमुळे अंतकरण शुद्ध होते, कारण ही एक प्रबळ शक्ती आहे. अनैतिकता ही कधीच समर्थनीय ठरत नाही. सद्गुणसंवर्धन व दुर्गुणत्याग हा परमार्थाच्या वाटचालीत विशेष महत्त्वाचा आहे. ‘नीती हा भक्तीचा पाया आहे. ती नसेल तर हॅम्लेटविना ‘हॅम्लेट’ केल्यासारखे होईल त्याला काय अर्थ आहे. हॅम्लेटविना ‘हॅम्लेट’ नाटक हे कसे अपुरे आहे? असे श्री गुरुदेवांनी अन्यत्र म्हटले आहे. तशी नीतिविना भक्ती अधुरी आहे. नीतिविना भक्ती असेल तर केवळ अपुरीच नव्हे तर ती भक्ती केवळ ‘वरपांगी देखावा’ ठरेल! मग ईश्वरदर्शन कसे होणार? नाहीच! नामस्मरण व नीतिआचरण ही दोन्ही पाऊले मिळूनच पडली पाहिजेत.

ईश्वरदर्शन

प्रा. न. ग. दामले यांनी भक्तियोग कसा हवा, तर तो साक्षात्कार पर्यवसायी म्हणजे ईश्वरदर्शन घडविणारा हवा, असे म्हटले आहे. त्यात साधन कसे हवे आणि त्याची परिणती कशी होते हेच प्रतिपादिले आहे. तिथे त्यांना साधकाने गुरुप्रदत्तनाम घेऊन त्या नामाचे सातत्याने स्मरण करावे ही साधना अपेक्षित आहे. तेही कसे? तर मन नामाशी एकरूप झाले पाहिजे. त्यावेळी अन्य विचार मनात येऊ नयेत म्हणून श्वासोच्छ्वासात नाम घेतले पाहिजे. म्हणजे नामाचे विस्मरणही होत नाही आणि अन्य विचारांकडे मन आकृष्टही होत नाही. घेतलेला नाममंत्र कधी बदलता कामा नये, कारण तो देताना सद्गुरूंनी आपली ‘कृपादृष्टी’ ठेवलेली असते. त्याला सबीजनाम असे म्हटले जाते. समर्थ रामदास स्वामींनी म्हटल्याप्रमाणे ‘नित्यनेम प्रातःकाली, माध्यान्हकाळी सायंकाळी। नामस्मरण सर्वकाळी। करीत जावे।। असे म्हटले आहे. त्याप्रमाणे होईल तितके, पण निश्चयपूर्वक केले पाहिजे. त्यायोगे सगुण-निर्गुण देवाचे दर्शन घडून येते. किमान त्याचे अंशदर्शन घडले तरी त्याला महत्त्व आहे. साधनाबरोबरच सत्संगती हवी. त्यायोगे प्रेरणा मिळून भक्तीत वाढ होते. भक्ती उत्कट झाली की, ‘गुरुकृपा’ होतेच. प्रपंचासह परमार्थ उत्तम होतो.

आपली प्रतिक्रिया द्या