
दिलीप जोशी ([email protected])
सखल भागात तुंबणारं पाणी, महानगरातील लोकांची दैनंदिन प्रवासात होणारी दैना आणि आकस्मिक अतिवृष्टीने ठिकठिकाणी घडलेले उत्पात असं चित्र गेल्या काही वर्षांत वारंवार अनुभवायला येतंय. पाऊस ‘नेमेचि’ आणि ‘नेमस्त’ पडला तर मस्तच असतो, पण माणसाचे काही ‘गुण’ त्याने घेतलेले दिसतात. ज्या देशात एक तृतीयांश वर्ष आकाशातून कोसळणाऱया जलधारांनी चिंब होते, तिथे तो एक स्वतंत्र ऋतू ठरतो. हिंदुस्थान याबाबतीत जगातला वैशिष्टय़पूर्ण देश आहे. पाऊस चार महिने पडणार याची आपल्याला पूर्वापार कल्पना आहे. साधारण 7 जूनला ‘मृग’ नक्षत्रावर पाऊस महाराष्ट्रात येतो आणि महिनाभरात उत्तर भागात पसरतो.
हा काळ पावसाच्या बहराचा. अनेक रूपात त्याचं दर्शन घडत असते. रिमझिम ते मुसळधार असा बरसत तो शेतीभातीला, पाणीपुरवठय़ाला नवसंजीवनी देतो. म्हणजे अगदी गेल्या 30-40 वर्षांपूर्वीपर्यंत द्यायचा! त्यातही गेल्या काही वर्षांत त्याचा ‘स्वभाव’ बदलत चाललाय. ‘नेमेचि’ जाऊ द्या, पण येईल तेव्हा तो सुखद होईलच असं सांगता येत नाही. मे महिन्यापर्यंत उन्हाने काहिली केली की, सारा देश पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत असतो. शेतकऱयांची नजर आभाळाला खिळून राहते. कारण पावसाच्या कृपेने सर्वांचाच पोटापाण्याचा प्रश्न सुटणार असतो. अन्नपाण्याची आबादानी होणार असते. म्हणूनच पावसाच्या बहराचं ‘येरे येरे’ म्हणून स्वागत व्हायचं आणि तो परतताना ‘पुनरागमनाचं’ म्हणजे ‘पुन्हा येण्यासाठी निरोप घे’ असं सांगितलं जायचं.
त्याच्या या ‘बहरा’चं वेळापत्रक गेल्या काही वर्षांत पार विस्कटलंय. तो आता लहरी झालाय. टक्केवारीच्या हिशेबात कदाचित त्याची कमतरता नसते. तेव्हासुद्धा त्याचा बरसण्याचा ‘पॅटर्न’ किंवा पद्धत विचित्र पद्धतीने बदलताना दिसतेय. ‘पावसाळा’ समजला जाणाऱया महिन्यांमध्ये काही दिवस पूर्णपणे कोरडेठाक तर काही दिवस अक्राळविक्राळ रूप धारण करून धो धो! त्यामुळे सगळय़ाच, त्यातही शेतीच्या नियोजनाचे तीनतेरा वाजतात. पाऊस आला म्हणून खुशीत पेरणी झाली की, तो अशी काही ओढ देतो की शेतकऱयावर दुबार पेरणीची वेळ येते. एवढं करून तो पुन्हा आवश्यकतेनुसार संथ लयीत बरसला तर ठीक अन्यथा कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ अशा विपरीत परिस्थितीचा सामना करावा लागतो.
शे-दोनशे वर्षांपूर्वीही दुष्काळ पडत नव्हते असं नाही, पण यावेळची पृथ्वीवरची मानवी वस्ती एक-दीड अब्जाच्या आसपास होती. आता तिने सात अब्जांचा आकडा ओलांडलाय. खाणारी तोंडे बेसुमार वाढलीयत. नव्या संशोधनातून पिकांच्या नव्या पद्धतीनुसार भरपूर पीक घेण्याचे विचार कुठे प्रत्यक्षात आणले जातायत तर कुठे त्याला प्रखर विरोध आहे. पाण्याच्या समस्येतून तर अमेरिकेसारख्या नियोजनबद्ध प्रगत देशाचीही सुटका झालेली नाही. दोन-तीन वर्षांपूर्वी कॅलिफोर्नियातही दुष्काळी परिस्थिती ओढवली होती. प्रगत देशांची कमी लोकसंख्या, उत्तम साधनसुविधा यामुळे अस्मानी संकटांची प्रखरता कमी जाणवत असली तरी एखाद वेळेस संपूर्ण फ्लोरिडा राज्यातल्या लोकांचं तात्पुरतं स्थलांतर करण्याची पाळी त्यांच्यावरही येतेच हे दोन वर्षांपूर्वी दिसून आलं. या परिस्थितीत आपल्यासारखा विकसनशील महिन्यांपूर्वी ओडिशातील संभाव्य वादळाला तोंड देण्याची जय्यत तयारी करून तिथल्या प्रशासनाने जागतिक कौतुकाची कामगिरीं केली होती, पण प्रत्येक वेळेस ही प्रशासकीय चमक दिसतेच असं नाही. आकस्मिक अस्मानी संकटाचा फटका बसलेल्यांच्या व्यथा ऐकल्या की, आपल्याला एकूणच व्यवस्थेत किती सकारात्मक बदल करायला हवे आहेत याची जाणीव होते.
पावसाच्या बहराच्या आनंदाकडून त्याचा उत्पाती कहराकडे जाणाऱया प्रवासाला (पॅटर्नला) ग्लोबल वॉर्मिंग किंवा जगभरचं वाढतं तापमान हा एक घटकही मोठय़ा प्रमाणावर कारणीभूत आहे अर्थात यावरही वाद आहेतच. कोणी यालाच क्लायमेट चेंज म्हणतात. नावात काय आहे? काहीही म्हणा, विपरित परिणाम तर दिसतातच ना? या तापमानवाढीमुळे आणि संपूर्ण पृथ्वीवरचं भूजल वेगाने संपुष्टात आणण्याच्या आततायी कृतीमुळे वातावरणात बदल वेगाने होत आहेत. दक्षिण धुवावरचा एखाद्या महानगराएवढा हिमखंड निसटलाय किंवा उत्तर ध्रुव, आल्प्स आणि हिमालयातील हिमनद्या (ग्लेशियर्स) वितळतायत या बातम्यांनी आपल्याला फारसं काही वाटत नाही. कारण त्याचा सखोल विचार आपण करत नाही. समुद्राच्या पाण्याची पातळी वाढतेय हे ऐकूनही किनाऱयावरच्या माणसांचं जग सुस्त असतं. कारण ही गोष्ट काही एका रात्रीत घडत नाही.
परंतु ग्लोबल वॉर्मिंगमुळे आणि भूजल संपत आल्याने जमिनीवरची आर्द्रताही नष्ट होते. गेल्या मोसमात काठोकाठ भरलेली धरणं, जलसाठे यांचं वेगाने बाष्पीभवन होऊन पाणी आकशात जातं. शिवाय पावसाळय़ात ते आपल्याला पाहिजे तिथे आणि पाहिजे तेव्हा तसेच हवे तेवढंच बरसतं असं नाही. निसर्गाला कोण धडे शिकवणार? धडा आपल्यालाच शिकावा लागेल. हे संकट म्हणजे आव्हान समजावं लागेल. पाऊस पडतो त्या काळात ते पाणी जिथे शक्य आहे त्या सर्व ठिकाणी अनेक मार्गांनी साठवून जिथे पाणी नाही, तिथेही अनेक पद्धतीनी पोचवावं लागेल. त्यासाठी कमालीची ‘जलसाक्षरता’ अंगी बाणवावी लागेल. निसर्ग अनेकदा रौद्ररूप धारण करून इशारे देतोय. ते तितक्या लवकर आपल्याला (जगभरच्या माणसांना) समजतील तेव्हा खरं!



























































