राशीनुसार सजवा आपले घर

378

>> संगीता कर्णिक

आपलं घर सुंदर दिसावं… असं प्रत्येकालाच वाटत असतं. बऱ्याचदा वास्तुशास्त्रानुसार घरात बदल केले जातात. पण आम्ही एक सोपी पद्धत सांगत आहोत… आपल्या राशीनुसार घर कसं सजवायचं ते पाहूया…

मेष

स्वतंत्र वृत्तीचा स्वभाव असलेल्या मेष राशीच्या व्यक्तींसाठी लाल, गुलाबी व भगवा रंग शुभ आहे. त्यामुळे घर सजवताना याच रंगाची बेड कव्हर, चादर, कपडे, आभूषणे, पडदे वापरले तर त्यांना फायदाच होईल. परंतु त्यांनी दक्षिण-पश्चिम कोपऱ्यांकडे वजनदार फर्निचर ठेवावे.

वृषभ

बोलण्यात चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरणशक्ती असलेल्या वृषभ राशीच्या व्यक्तीने घराच्या भिंतीसाठी भडक रंगाचा वापर करावा. सोफा कव्हर, उशींचे अभ्रेही त्याच रंगाचे असणे शुभ असते. या राशीच्या व्यक्तीसाठी दक्षिण-पश्चिम दिशेला वजनदार फर्निचर ठेवणे लाभदायक ठरेल.

मिथुन

कष्टाळूपणा आणि सतत कार्य करण्याची धमक असलेल्या मिथुन राशीच्या व्यक्तीने आपल्या घरात फिकट हिरवा, निळा व लाल रंग याचा वापर करावा. खोल्यांना ते हे रंग देऊ शकतात. याच रंगाचे कपडे परिधान करणेही शुभ असते. त्यांच्यासाठी उत्तर-पश्चिम वायव्य दिशेला कमी वजनाचे फर्निचर ठेवणे फायदेशीर असते.

कर्क

सौम्य पण अस्थिर स्वभावाच्या कर्क राशीच्या लोकांसाठी पांढरा, क्रीम रंग शुभ आहे. कारण हे रंग चंद्रासारखे दुधाळ आणि पांढरे असतात. मात्र कर्क राशी ही जलतत्व असल्याने खोलीच्या उत्तर-पूर्व (ईशान्य) दिशेच्या कोपऱ्यात पाण्याने भरलेला माठ किंवा वाहत्या पाण्याचे चित्र लावले पाहिजे.

सिंह

आशावाद असलेली आणि जिद्धीने उभारी घेण्याची हिंमत असलेल्या सिंह राशीच्या व्यक्तीसाठी पांढरा, चमकणारा पिवळा रंग लाभदायक असतो. या रंगाचे कपडे किंवा सजावटीच्या वस्तू ते घरात ठेवू शकतात. अशा व्यक्तींसाठी घरातील कोपरा महत्त्वपूर्ण असतो. दक्षिण-पूर्व (आग्नेय) दिशेला स्वयंपाकघर असावे.

कन्या

दूरचा विचार करणारी आणि माणसांची चांगली पारख असलेल्या कन्या राशीच्या व्यक्तींसाठी फिकट हिरवा, निळा व लाल रंग शुभ आहे. या रंगाचे कपडे परिधान करावे. घर सजवतानाही या रंगाच्या वस्तूंचा अधिक वापर केला पाहिजे. खोलीच्या दक्षिण-पश्चिम (नैऋत्य) कोपऱ्यात वजनदार फर्निचर किंवा इतर सामान ठेवले पाहिजे. असे केल्याने घरात आनंदी वातावरण नांदते.

तूळ

आकर्षक आणि प्रेमळ स्वभावाच्या तुळ राशीच्या व्यक्तीना कुठलाही चकाकणारा रंग शुभ आहे. घरातील पडदे, सोफा कव्हर तसेच उशांच्या अभ्य्रांना हा रंग वापरू शकता. त्यांच्यासाठी कमी वजनाच्या वस्तू किंवा सजावटीच्या वस्तू ठेवू शकता. असे केल्याने त्यांच्या जीवनात कुठल्याच समस्या उद्भवत नाहीत.

वृश्चिक

प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहणाऱ्या वृश्चिक राशीसाठी लाल, गुलाबी व भगवा रंग शुभ आहे. या राशीच्या व्यक्तीने याच रंगाचे कपडे, दागिने घालावेत. उत्तर-पश्चिम (ईशान्य) दिशेला पाण्याची व्यवस्था केली पाहिजे.

धनु

संयमी आणि सात्विक स्वभाव असलेल्या धनू राशीच्या व्यक्तींसाठी पिवळा रंग शुभ आहे. अग्नी किंवा अन्य ज्वलनशील पदार्थ नेहमी दक्षिण-पूर्व (आग्नेय)दिशेला ठेवावीत. तसेच आग्नेय दिशेच्या कोपऱ्यात दररोज दिवा प्रज्वलित करुन ठेवला पाहिजे.

मकर

खूप व्यवहारी आणि महत्त्वाकांशी असलेल्या मकर राशी व्यक्तीसाठी गडद निळा, हिरवा व काळा शुभ आहे. याच रंगाची चादर, सोफा कव्हर, पडदे त्यांना लाभदायी ठरू शकतात. वजनदार फर्निचर किंवा इतर सामान दक्षिण दिशेच्या कोपऱ्यात ठेवले पाहिजे.

कुंभ

हुशार, प्रामाणिक आणि स्वावलंबी असलेल्या कुंभ राशीसाठी गडद निळा, हिरवा व काळा रंग शुभ आहे. या रंगाचा उपयोग घराच्या भिंती सजावटीच्या वस्तूंसाठी करु शकतो. असे केल्याने यशाचा मार्ग सापडतो. कमी वजनाच्या वस्तू नेहमी उत्तर-पश्चिम (वायव्य) दिशेला ठेवल्या पाहिजेत.

मीन

सदैव इतरांच्या मदतीस तत्पर असणारी आणि संवेदनशील मीन राशीला पिवळा रंग शुभ आहे. घराच्या उत्तर-पूर्व (ईशान्य) कोपऱ्यात पाण्याने भरलेला माठ अथवा वाहत्या पाण्याचे चित्र लावले पाहिजे.

आपली प्रतिक्रिया द्या