
युरोपातील ‘हंगेरी’ या छोटय़ा देशामधील निवडणुका नुकत्याच पार पडल्या. अपेक्षेप्रमाणे पंतप्रधान व्हिक्टर ओरबान यांच्या पक्षाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. व्हिक्टर ओरबान यांनी चौथ्यांदा मोठा विजय प्राप्त केलेला आहे. त्यांच्या उजव्या विचारसरणीच्या ‘फिडेज’ पक्षाने 199 पैकी 135 जागा जिंकलेल्या आहेत. तेथील विरोधी पक्षाला फक्त 56 जागा मिळाल्या आहेत. 200 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय निरीक्षकांनी या निवडणुकीदरम्यान उपस्थिती लावली होती हे विशेष.
या छोटय़ा देशाच्या निवडणुकीकडे लक्ष जाण्याची खालील कारणे आहेत
- हंगेरीमध्ये जन्म झालेल्या आणि नंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्या अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सोरोस या ज्यू उद्योगपतीचा पंतप्रधान व्हिक्टर ओरबान यांच्याशी असणारा 36 चा आकडा. जॉर्ज सोरोस आणि त्यांच्या जगप्रसिद्ध अशा विविध ‘एन.जी.ओ’ आणि त्यांच्या हंगेरीमधील कारवायांना व्हिक्टर ओरबान यांनी जाहीरपणे नुसता विरोधच केला नव्हता तर त्यांच्यावर पूर्णपणे बंदी घातली होती. त्यामुळे व्हिक्टर ओरबान यांना हटविण्यासाठी जॉर्ज सोरोस यांनी त्यांची शक्ती पणाला लावली होती. जॉर्ज सोरोस यांच्या प्रभावामुळे आंतरराष्ट्रीय माध्यमेही व्हिक्टर ओरबान यांच्या विरोधात उतरली होती.
- दोन महिन्यांपूर्वीच जॉर्ज सोरोस यांनी ‘ओपन सोसायटी फाऊंडेशन’च्या यूटय़ूबवर अजूनही उपलब्ध असणाऱ्या एका व्हिडीओमध्ये बोलताना ‘व्हिक्टर ओरबान’ यांचा तेथील निवडणुकीमध्ये कसा पराभव होणार आहे याचा खात्रीशीर दावा केला होता.
- व्हिक्टर ओरबान यांनी युरोपियन महासंघाच्या विरोधात भूमिका घेऊन सीरिया, अफगाणिस्तान, लिबिया, पाकिस्तानमधून युरोपात घुसलेल्या अनेक निर्वासितांना हंगेरीमध्ये प्रवेश देण्यास कडवटपणे विरोध केला होता. वर उल्लेखलेल्या देशांमधीलएकाही निर्वासिताला हंगेरीमध्ये प्रवेश देणार नाही असे जाहीर केले होते. या मुद्दय़ावर युरोपियन महासंघ सोडण्याची पाळी आली तरी चालेल, पण एकाही निर्वासिताला हंगेरीमध्ये प्रवेश देणार नाही असे सांगितले होते आणि अजूनही ते त्यांच्या या मतावर ठाम आहेत.
- सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये जोरदार युद्ध पेटलेले असताना अमेरिका आणि युरोपातील अनेक देशांनी रशियावर निर्बंध टाकलेले असून रशियाकडून क्रूड तेल आणि इंधन वायू घेण्यावर प्रतिबंध घातलेले आहेत, पण हंगेरीने या प्रतिबंधांना विरोध केलेला असून हंगेरी रशियाकडून इंधन वायू विकत घेणे चालूच ठेवेल असे त्यांनी जाहीर केलेले आहे. एवढेच नव्हे तर व्हिक्टर ओरबान यांनी रशियाकडून इंधन वायू घेण्यासाठी ‘रुबल’मध्ये किंमत अदा करण्यालाही होकार दिलेला आहे. फ्रांस ही रशियाकडून इंधन वायू विकत घेऊ इच्छितो. रुबल चलनात व्यवहार करण्याला व्हिक्टर ओरबान यांनी संमती दिल्यामुळे अमेरिकेला जास्त मिरची लागलेली आहे हे निश्चित.
- युक्रेनला कोणतीही शस्त्रास्त्रे विकायला पंतप्रधान व्हिक्टर ओरबान यांनी विरोध केलेला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यावर त्यांनी आतापर्यंत जोरदार टीका केलेली आहे, मात्र युक्रेनमधून आलेल्या निर्वासितांना त्यांनी हंगेरीमध्ये प्रवेश दिलेला आहे.
ओरबान यांचे मॉस्कोशी म्हणजेच रशियाचे व्लादिमिर पुतीन यांच्याबरोबर चांगले संबंध आहेत. जरी व्हिक्टर ओरबान यांनी युक्रेनवर आक्रमण केल्याबद्दल व्लादिमिर पुतीन यांच्यावर टीका केली असली तरी ओरबान यांनी हंगेरीतील निवडणूक जिंकल्यावर व्लादिमिर पुतीन यांनी त्यांना अभिनंदनाचा मेसेज केला होता हे विशेष. एकेकाळी ओरबान यांना युरोपातील ट्रम्प म्हणून ओळखले जायचे.
























































