शिरीषायन – आईला गिळलंन्…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>शिरीष कणेकर

माझी आई गेली तेव्हा मी तीन वर्षांचा होतो. माझे वडील गेले तेव्हा मी तेवीस वर्षांचा होतो. मी गेलो तेव्हा मी होतो की नाही तेच मला आठवत नाही. जो आहे की नाही कोणाला पडलेली नाही तो गेल्यातच जमा असतो.

माझ्या आईवडिलांना मिळून देवानं जेवढं आयुष्य दिलं त्यापेक्षा जास्त आयुष्य मला दिलं. कशासाठी? कोणी मागितलं होतं? तरुणपणापासूनच जे आयुष्य एक न पेलणारं ओझं वाटायला लागलं होतं ते काय चाटायचंय? मला अनेकदा वाटत आलंय की उंचावर उभं रहावं व बेपर्वा जगाला ललकारून सांगावं- ‘मी अजून जिवंत आहे याचं एकमेव कारण म्हणजे लौकिकार्थाने मी जीव जाऊन मेलेलो नाही.’ किती भावना, किती विचार, किती नाती, किती संबंध मरून गेलेत त्याची मोजदाद नाही; खंतही नाही.

लहानपणी मी त्रास देऊन भंडावून सोडलं की माझी आजी संतापून दातओठ खात म्हणायची- ‘आईला गिळलंन, आता आम्हाला गिळायला राहिलाय.’ तिच्या हातात वेताची छडी असायची, पण तिनं मला कधीही बोट लावलं नाही. तिचा राग फक्त तिच्या जिभेवर यायचा. कपाळावरची सुजीर शीर तटतटत रहायची. असं झालं की मला त्यात माझा विजय वाटायचा, शेवटी तिचा कडेलोट करवला की नाही? ‘आईला गिळलंन्’ हे विषारी, विखारी शब्द माझ्या अंगावरून निसटून जायचे. त्यामागचा तडफडाट, तळतळाट मला जाणवायचाच नाही.

मी मोठा होत गेलो तसतसे आजीचे हे रक्तबंबाळ पालुपद कमी कमी होत बंद पडले. तेवढं बोलण्याइतकाही उत्साह तिच्यात राहिला नव्हता. ती दिवस मोजत होती. झालं गेलं सगळं गंगेला मिळालं होतं. तिचं वास्तव्य मावशीच्या घरामागच्या गॅरेजमध्ये होतं. गॅरेजच्या झडपेतून माझा चेहरा दिसला की तिचा वृद्ध, थकलेला चेहरा उजळून निघायचा. ‘आत ये- आत ये’ ती उत्तेजित होत म्हणायची. माझं मावशीशी बरं नसल्यानं मी आत जायचं टाळायचो. एक दिवशी मात्र मी आत गेलो. आजी आनंदली. काहीबाही बोलत राहिली.

एकाएकी मी तिला विचारलं, – ‘आजी, मी खरंच आईला गिळलं का गं? इतक्या पांढऱया पायांचा आहे होय मी? किती वर्षे तुझं हे विधान मला पोखरत राहिलंय. मी स्वतःचा तिरस्कार करीत जगत आलोय.’

माझ्या सर्वस्वी अनपेक्षित प्रश्नानं आजीचा थरकाप झाला. ती शहारली. तिच्या वृद्ध, कृश देहाला कंप सुटला. तिचे खाचा झालेले डोळे भरून आले. नियंत्रण गमावून बसलेल्या तिच्या भुवया इच्छेविरुद्ध उडू लागल्या. चेहरा ओळखू येणार नाही इतका पिळवटला होता. मी भेदरून तिच्याकडे बघत राहिलो.

लहान मुलासारखे हमके देत ती रडत रडत बोलली, -‘नाही रे माझ्या सोन्या. तू कशाला गिळशील तुझ्या आईला, राजा? मी संतापाच्या भरात गाढवासारखं बोलायची. झडून का नाही गेली माझी अवलक्षणी जीभ? अरे, मी हडळ आहे. मी कैदाशीण आहे. मी चांडाळीण आहे. मीच गिळते सगळय़ांना. तुझ्या आईला गिळलं. माझ्या एकुलत्या एका मुलाला गिळलं. आता तुझ्या वडिलांनाही गिळलं. मी मरता मरत नाही. हडळी मरत नसतात. बेशरमपणे जगत रहातात. चांगल्या माणसांना गिळतात. हे बघ, माझी पुरचुंडीभर पुण्याई मी तुझ्यासाठी सांभाळून ठेवल्येय. तेवढी उचल आणि पळून जा. माझ्या वाऱयालाही उभा राहू नकोस. माझ्या जवळपास फिरकू नकोस…’

माझा पुतळा झाला होता. डोळय़ांना धार लागली होती. तिच्या आसवांनी भरलेल्या अधू डोळय़ांना ते दिसत नव्हतं. एक शब्दही न बोलता आम्ही बसून राहिलो. मी बसलो-बसलो आणि उठून बाहेर पडलो. ती आमची शेवटची भेट होती. माझी हडळ, कैदाशीण, चांडाळीण आजी जगात मला एकटय़ाला सोडून अखेर निघून गेली होती. तिनं मागे ठेवलेली पुण्याईची पुरचुंडी मला आजतागायत पुरतेय.

…तिचं शव घेऊन आम्ही अँब्युलन्समधून अंत्यविधीसाठी निघालो होतो. माझ्या मनात आलं की मी माझंच शव घेऊन निघालोय. कोण देणार होतं मला अग्नी? ज्यांचं कोणी नसतं त्यांचं क्रियाकर्म कोण करतं? माझा मेंदू बधिर झाला होता. एकाएकी मला प्रकर्षानं वाटलं की कोणीतरी मला विचारावं, ‘रडतोयस वाटतं?’ विचारा-विचारा. सोडू नका हरामखोराला. चामडी लोळवा हलकटाची. मीच आईला गिळलं असणार, मीच… आजीला अग्नी कोणी दिला आठवत नाही. मला कोणी दिला की नाही आठवत नाही. मी जगलो की गेलो हेही आठवत नाही. आठवत नाही तेच चांगलं. नाहीतरी आयुष्यात आठवण्यापेक्षा विसरण्यासारख्या गोष्टीच जास्त होत्या.

[email protected]