
>>दिलीप जोशी<<
बाहेरून मागवलेले खाद्यपदार्थ घेऊन आलेला माणूस दारात अदबीने उभा होता. मुलाने ते घेतले आणि बिल बघितलं. वडिलांनी सहज विचारलं ‘‘किती रे?’’, ‘‘ओन्ली फिफ्टीन हंड्रेड. फक्त पंधराशे!’’ मुलगा तितकाच सहज उत्तरला. माझ्या मित्राच्या घरात चाललेला हा संवाद ऐकताना मला आणि मित्रालाही हसू आलं. ‘‘अरे, पाच हजार झाले असते तरी तो ‘ओन्ली’च म्हणाला असता.’’ मित्र हसून बोलला. मुलगा काही न बोलता, पण ‘कसले एवढय़ाशा पैशांचा विचार करताय!’ असे भाव नजरेत आणून त्याच्या खोलीत गेला. त्याचे त्या पदार्थाचे ‘ओन्ली फिफ्टीन हंड्रेड’ हा आमचा एकेकाळी सबंध महिन्याचा पगार होता हे त्याला सांगूनही खरं वाटलं नसतं. मग आमच्या, त्याच्या मुलाला ‘बोअरिंग’ वाटणाऱ्या गप्पा रंगल्या.
‘‘तुला माहितेय, माझ्या बाबांना तर एकशे दहा रुपये पगार होता. कधीकाळी हॉटेलात जाऊन बटाटेवडा खाणं ही चैन होती. आई म्हणायची, त्यापेक्षा घरी करते. तेवढय़ाच पैशांत कितीतरी होतील, पण हॉटेलातल्या बटाटेवड्याची ‘चव’ घरच्याला कशी येणार असं वाटायचं.’’
‘‘तुझ्या मुलाला आता तेच वाटतंय. फक्त बिलाचे आकडे फुगलेत. पदार्थ नवीन आलेत इतकंच. आपल्या ‘स्टेटस’च्या कल्पना त्या काळानुसार होत्या. यांच्या जागतिक परिमाणाच्या आहेत.’’
‘‘खरं आहे, पण आपण किती काटकसरीने राहायचो. म्हणजे राहावंच लागायचं’’. आम्ही एकोणीसशे साठच्या दशकात गेलो. देशात अन्नधान्य परिस्थिती बिकट होत चालली होती. रेशनवर महिन्याला ‘गॅम’मध्ये साखर आणि अमेरिकन लाल, चिकट गहू मिळायचा. तांदूळही तसाच. पुन्हा हे सारं बेताने वापरून संसार करताना आई-बाबांना होणारे कष्ट जाणवायचे. ‘काटकसर’ हा शब्द पाचवीला पुजलेला होता. अनेक गोष्टी आपल्यासाठी नाहीतच असं समजून चालावं लागायचं. मुलांनी एखाद्या वस्तूसाठी फारच हट्ट केला तर घरचं मासिक बजेट कोसळायचं. मग मोठी माणसं आपल्या ‘तुटपुंज्या’ खर्चात कपात करून मुलांची जमेल तेवढी हौस पुरवायची.
‘‘खरंच, आपल्या मागच्या पिढीने कसं निभावलं असेल रे?’’ मित्रही तसाच विचार करत होता. तेवढय़ात वहिनी ‘पिझ्झा’ची डिश घेऊन आल्या. ‘‘हल्ली मुलांना पोहे, थालीपीठं आवडतायत कुठे! हे असलंच खाणं.’’ असं म्हणत त्याही आमच्या बोलण्यात सामील झाल्या. आतल्या खोलीतली नवतरुण पिढी एकतर आमचं बोलणं ऐकत नसावी किंवा ऐकून कीव करत असावी.
‘‘…आणि थोडं कमी मागवा म्हटलं तर चालत नाही. लगेच ‘तुझी काटकसरीची थिअरी सांगू नकोस’ असं म्हणतात.’’ वहिनींचा आणि घरोघरचाच हा नित्यानुभव. अर्थात हे सारं शहरी भागातलं. खिशात चार पैसे खुळखुळतायत अशा जगातलं, पण याच जगाच्या दुसऱ्या भागात किमान अन्न, वस्त्र्ा, निवारा यापासून वंचित असलेली कोटय़वधी माणसं ‘जगतात’. त्यामुळे समृद्ध जगाने ‘काटकसरीचा’ विचार करावा म्हणून काटकसर दिन पाळण्यात येतो.
त्याचं उद्दिष्ट असं की, उधळपट्टी थांबावी. मग ती कोणत्याही प्रकारची असो. ‘‘आम्ही आमचेच पैसे खर्च करतो ना’’ असा प्रतिवाद केला जातोय, पण तो व्यक्तीसापेक्ष खरा असतो. थोडं त्यापलीकडे जाऊन विचार केला तर ज्या समाजाशिवाय आपण जगूच शकत नाही त्याची अवस्था कशी असते याची जाणीव हवी. यासंदर्भात एक गोष्ट आठवली. अगदी सत्यकथा. एका संशोधकाला भेटलो होतो. त्यांनी स्वयंपाकाचा गॅस कमी वापरला जाईल असा कुकर बनवला होता. महिन्याकाठी जवळजवळ निम्मा गॅस वाचत होता. बोलता बोलता ते म्हणाले, ‘‘मला किती गॅस वापरायला परवडतो? हा प्रश्न नाही. देशाच्या अर्थव्यवस्थेत यातून बचत होते आणि तेवढेच पदार्थ कमी गॅसमध्ये उत्तम शिजत असताना उधळपट्टी कशासाठी? पृथ्वीवरचे सर्व ऊर्जास्रोत सर्वांनी जपून वापरायला हवेत.’’
त्या दिवशी नवी दृष्टी लाभली. प्रश्न नुसत्या काटकसरीचा नव्हता. जागतिक जाणिवेचा होता. ‘‘काटकसर म्हणजे कंजूषपणा नव्हे’’ ते मला सांगत होते, ‘‘आवश्यक त्यात कमतरता आली का? मग तेच कमी पैशांत साध्य झालं तर बिघडलं कुठे?’’ खरंच आहे. कंजूषपणात आपलं किंवा इतरांचं मन मारलं जातं, असून न देण्याची विकृती निर्माण होते. काटकसर अनाठायी खर्च आणि उधळपट्टीला लगाम घालते. ऋण कढून सण साजरा करण्याची वेळ आणत नाही.
सात अब्ज माणसांच्या आणि आणखी अब्जावधी प्राण्यांच्या वनस्पतींच्या ‘सर्वांगीण’ पोषणाची सोय पृथ्वी करत असते. तिथले सगळे सुखाचे स्रोत फक्त माणसासाठी नाहीत. विविध प्रकारचा हव्यास आणि उधळपट्टी यांनी गेल्या दोन शतकांतच माणसाने भरपूर गोंधळ घालून ठेवलाय अन्यथा काटकसर ‘दिवस’ साजरा करून ‘‘जरा बेतानं बरं का’’ असं सांगण्याची वेळ आली नसती. बदलत्या काळाबरोबर जीवनशैली बदलणार, कपड्यांची फॅशन आणि खाण्याची चव बदलणार, त्यातही जागतिकीकरण येत राहणार आणि अनेकांना ते सहज ‘परवडणार’ हे जमेस धरता ‘पिझ्झा’ही अगदी साधी गोष्ट झाली, पण घरचे ‘कांदेपोहे’ विसरायची गरज नाही. ही प्रतीकं जाऊ द्या, पण मुद्दा असा की, खर्च करताना तारतम्य ठेवून आज काटकसर केली नाही, तर उद्या कदाचित पैसा असूनही अनेक गोष्टी मिळणार नाहीत या जागतिक परिमाणाचा विचार करण्यात मात्र काटकसर नको.





























































