हिंदुस्थानी मोबाईलमधून चिनी कम

390

>> निमिष वा. पाटगांवकर

नुकतीच आपल्या सरकारने तब्बल 59 चिनी मोबाईल ऑप्लिकेशन्सवर बंदी घातली. ही बंदी चीनला चांगलीच झोंबली आहे. कारण बंदीनंतर लगेच चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत चिंता जाहीर केली. केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने ही बंदी घालताना अर्थातच लडाखच्या संघर्षाचे कारण न देता देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक असलेले घटक या डेटाचा गैरवापर करत असून त्यामुळे देशाच्या एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धोका पोहोचत आहे हे कारण दिले.

कोरोनामुळे सर्व जगाचीच चीनवर वक्रदृष्टी झाली आहे. हिंदुस्थानातील कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे हा चीनचा तिरस्कार वाढत चालला आहे. त्यात भर पडली ती पूर्व लडाखमधील झालेल्या गलवान खोऱयातील चिनी सैन्याविरुद्ध झालेल्या रक्तरंजित संघर्षाची. हिंदुस्थानी सैन्यातील कर्नलसह वीस बहादूर जवान या संघर्षात मातृभूमीसाठी धारातीर्थी पडले आणि चीनविरोधाचा भडका देशभर उडाला. हिंदुस्थानी सैन्याच्या प्रत्युत्तरानंतर सरकार कसे प्रत्युत्तर देते याकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले होते. सीमेवरच्या प्रत्येक आगळिकीला त्या त्या देशाला समजेल अशा भाषेत उत्तर द्यावे लागते. हा दोन देशांतील सैन्यात संघर्ष असल्याने अतिरेकी कारवाईसाठी पूर्वी योजलेला सर्जिकल स्ट्राईकचा उपाय अर्थातच उपयोगी नव्हता. तेव्हा चीनला झटका बसेल असा उपाय सरकारने योजला तो म्हणजे डिजिटल स्ट्राईक.

गेल्या सोमवारी सरकारने तब्बल 59 चिनी मोबाईल ऑप्लिकेशन्सवर बंदी घातली. ही बंदी चीनला चांगलीच झोंबली आहे. कारण बंदीनंतर लगेच चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत चिंता जाहीर केली. केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने ही बंदी घालताना अर्थातच लडाखच्या संघर्षाचे कारण न देता देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक असलेले घटक या डेटाचा गैरवापर करत असून त्यामुळे देशाच्या एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धोका पोहोचत आहे हे कारण दिले. अर्थातच हे गंभीर कारण असल्याने माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69 अ आधाराने तातडीने बंदी घातली असे दाखवले आहे. या कारणामुळे चीनच्या नाकाला मिरच्या झोंबल्या आहेतच. कारण एक प्रकारे चीनकडून आपल्या देशातून होणाऱया डेटा चोरीवर हे अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे.

आपण गुगल निर्मित अँड्रॉईड प्रणालीच्या फोनचे उदाहरण घेतले तर आज त्यातील दहापैकी नऊ ऑप्लिकेशन्स आपला डेटा घेत असतात. दोन वर्षांपूर्वी ऑक्सफर्ड विद्यापीठाने केलेल्या एका संशोधनात असे आढळून आले की, गुगल प्लेमधून आपण जी ऑप्लिकेशन्स इन्स्टॉल करतो त्यातली अर्ध्याहून अधिक ऑप्लिकेशन्स आपला डेटा कमीत कमी दहा कंपन्यांना विकतात आणि दर पाचपैकी एक ऑप्लिकेशन हा डेटा वीस कंपन्यांना विकते. मग या 59 ऑप्लिकेशन्समध्ये असे वेगळे काय होते? एक म्हणजे ही ऑप्लिकेशन्स चालवायला नको असलेला बराच डेटा आपल्या फोनमधून गोळा करत होती. उदाहरण द्यायचे तर हेलो, शेअर इट किंवा यूसी ब्राऊझर ही ऑप्लिकेशन्स गरज नसताना आपल्या फोनचा कॅमेरा आणि मायक्रोफोन वापरून डेटा गोळा करत होते. लोकप्रियतेच्या निकषावर जगातील पहिली पन्नास ऑप्लिकेशन्स बघितली तर ही चिनी ऑप्लिकेशन्स जवळ जवळ 45 टक्के जास्त डेटा आपल्या फोनमधून गोळा करत होते, जो ऑप्लिकेशनच्या दृष्टीने अनावश्यक होता. चीनमध्ये प्रत्येक कंपनीला हा डेटा सरकारजमा करणे बंधनकारक आहे. त्यामुळे हा ऑप्लिकेशन्ससाठी अनावश्यक डेटा खासगी संस्था किंवा सरकारी यंत्रणेमार्फत खरोखरच विघातक कामासाठी वापरला जाऊ शकतो.

साधारण सहा महिन्यांपूर्वीच आपल्या गुप्तचर यंत्रणेने या डेटा चोरीबद्दल माहिती दिली होती. अमेरिकन गुप्तचर यंत्रणेनेही याला दुजोरा दिला होता. युरोपात असलेल्या GDPR म्हणजेच जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशनसारखा खासगी डेटा सुरक्षित राखण्यासारखा कायदा अजून हिंदुस्थानात अस्तित्वात नाही आणि याचाच फायदा ही ऑप्लिकेशन्स घेत होती. प्रतिस्पर्ध्याला कुठलीही कल्पना न देता अचानक हल्ला करायचा या चिनी युद्धकलेच्या शास्त्राप्रमाणेच गुप्तचर यंत्रणांचा अहवाल येऊनसुद्धा बंदी लगेच न घालता सरकारने योग्य वेळी मोका साधला. चीनला कोंडीत पकडायचे तर त्यांच्या व्यापारावर घाला घालणे हेच योग्य. अर्थात आज बऱयाच उद्योगांत चिनी गुंतवणूक असल्याने हे रातोरात शक्य होणार नाही, पण पूर्ण चिनी बनावटीच्या वस्तूंवर या ऑप्लिकेशन्समार्फत बंदी घालत सरकारने योग्य पाऊल उचलले आहे. ही सर्व ऑप्लिकेशन्स वापरणारे हिंदुस्थानात लाखो होते की, नुसत्या टिकटॉकचाच विचार केला तर या बंदीमुळे टिकटॉक बनवणाऱया बाईट डान्स कंपनीला 6 अब्ज डॉलर्सचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली आहे.

या बंदीच्या पार्श्वभूमीवर अजून एक सूर ऐकू येतो तो म्हणजे बंदीच घालायची तर पे-टीएम, ओयो, झोमॅटो, बिग बास्केटसारख्या अनेक ऑप्लिकेशन्सवर बंदी का घातली नाही, ज्यात चिनी गुंतवणूक आहे. इथे एक लक्षात घेतले पाहिजे की इथे चिनी गुंतवणूक हा बंदीचा मुद्दा नसून ही ऑप्लिकेशन्स काय डेटा गोळा करतात यावर हा बंदीचा निर्णय आहे. तेव्हा डोळ्यांच्या फटीतून जगात कावेबाजी करणाऱया चीनला आपण डोळे वटारून दाखवले आहेत हे नक्कीच स्वागतार्ह आहे आणि जगातील अनेक देशांनीही या बंदीचे समर्थन केले आहे. हिंदुस्थानातील काहींचा रोजगार या बंदीने जाईल, पण त्याला सध्या तरी नाइलाज आहे.

नुकतीच पाकिस्तानने आपली तरुण जनता पबजी या लोकप्रिय ऑनलाइन खेळाच्या आहारी जात असल्याचे लक्षात आल्यावर आणि एक आत्महत्या घडल्यावर त्यावर तात्पुरती बंदी घातली. आपल्याकडेही याची लोकप्रियता खूप आहे. अर्थात हे ऑप्लिकेशन कोरियात जन्माला आल्याने चीनविरोधाचा यात संबंध नाही, पण कुणाला व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला वाटला तरी निव्वळ देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेच नाही, तर सामाजिक कारणांसाठीही मोबाईल ऑप्लिकेशन्सचे धोरण ठरवण्याची वेळ आली आहे.

कुणी म्हणेल की, मोबाईलवर अनेक ऑप्लिकेशन्स असतात आणि त्यातील बहुतांशी ऑप्लिकेशन्स हा आपला डेटा घेत असतात. मग या 59 ऑप्लिकेशन्सवर घातलेल्या बंदीचे काय महत्त्व आहे? या प्रश्नातील पहिला भाग बरोबर आहे, पण मुळात हा डेटा ही ऑप्लिकेशन्स का घेतात, कसा घेतात आणि त्याचा त्यांना फायदा काय हे पहिल्यांदा समजून घेतले पाहिजे. आपण जेव्हा एखादे ऑप्लिकेशन फोनवर इन्स्टॉल करत असतो तेव्हा हे ऑप्लिकेशन आपल्या फोनमधील फोटो बघू शकतो का? कॅमेरा आणि मायक्रोफोनचा वापर करू शकतो का? इत्यादी अनेक प्रश्न विचारले जातात. त्या लवकर इन्स्टॉल करायच्या नादात आपण काही विचार न करता या सर्व प्रश्नांना परवानग्या देऊन टाकतो. या परवानग्यांच्या आधारे हा डेटा ऑप्लिकेशन बनवणाऱया कंपन्यांना पोहोचतो. या डेटाचा उपयोग अनेक प्रकारे होतो. एक म्हणजे त्या ऑप्लिकेशन बनवणाऱया कंपन्या या डेटाचा उपयोग ग्राहकांना काय हवे त्या सुधारणा ऑप्लिकेशनमध्ये करायला या डेटाचे पृथक्करण करतात. हा झाला एक उपयोग, पण मुख्य उपयोग म्हणजे हा डेटा अनेक तिसऱया कंपन्यांना विकतात. तुम्ही काय बघता त्याप्रमाणे तुम्हाला खपू शकतील अशी उत्पादने विकणाऱया जाहिराती तुम्हाला पाठवायला याचा उपयोग होतो. एका अर्थी बघितले तर तुम्ही परवानगी दिलेल्या गोष्टीतून तुमचा डेटा घेऊन तुम्हाला उपयोगी पडतील अशा उत्पादनांच्या जाहिराती करणे हा सरळ सरळ मामला वाटतो, पण खरे गौडबंगाल आहे ते प्रत्येक ऑप्लिकेशन कुठचा डेटा गोळा करते आणि त्या ऑप्लिकेशनसाठी त्या डेटाची खरी गरज आहे काय यामध्ये.

आपली प्रतिक्रिया द्या