वर्षभराचे सण शिकवण

>> पुरुषोत्तम कृ. आठलेकर

सर्वसाधारण दिवाळी झाली की, आपल्या वर्षभराच्या सण/उत्सवांची सांगतेच्या दिशेने वाटचाल सुरू होते. या वर्षी मार्चअखेरीपासून सुरू झालेल्या कोरोना हा संसर्गजन्य रोग, त्याचा वाढता प्रादुर्भाव, रुग्णसंख्या व दुर्दैवाने काहींना गमवावे लागलेले प्राण. या रोगावर व वस्तुस्थितीवर ठोस व रामबाण औषध नसताना सुरक्षित शारीरिक अंतर, तोंडावर मुखपट्टय़ा,वैयक्तिक स्वच्छता व गर्दी न करणे या माध्यमातून आपण नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आलो. ते करत असताना चातुर्मासापासून वटपौर्णिमा, मंगळागौर, रक्षाबंधन, नारळीपौर्णिमा, गोकुळ अष्टमी, दहीकाला, गणेशोत्सव, नवरात्र ते अगदी दिवाळीपर्यंत हे सर्व सण व उत्सव साधेपणाने कोणताही गाजावाजा न करता राज्य शासन व आरोग्य विभाग यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, नियमानुसार व सामाजिक भान जपत साजरे केले. हे करत असताना लॉकडाऊन, जमावबंदी, धार्मिक प्रार्थनास्थळे, मंदिरे बंद ठेवण्यात आली. मागील आठ महिन्यांत एकूणच सर्व व्यवहार ठप्प विस्कळीत झाले आहे. ‘न भूतो न भविष्यति’ अशी या दरम्यान परिस्थिती झाली आहे. सण-उत्सवातून मिळणारा आनंद, उत्साह, ऊर्जा या वेळी नक्कीच हरपलेला आपण अनुभवला आहे. सर्वच यंत्रणा या सूक्ष्म विषाणूसमोर हतबल ठरलेल्या आपण अनुभवत आहोत. तरीसुद्धा अशा प्रकारे सण व उत्सव साजरे केलेल्या वृत्तीमधून आपण बरेच काही शिकलो हेसुद्धा नाकारता येणार नाही. तर कौटुंबिक, सामाजिक स्तरावरसुद्धा झालेले बदल आपण अनुभवत आहोत. आपुलकी, सहकार्य याबद्दल व्यापक जनजागृती अप्रत्यक्षपणे झालेली आपण पाहत आहोत. सण- उत्सवांवर असलेले नियम, निर्बंध यामुळे काही प्रमाणात नैराश्येचे वातावरण होते हेसुद्धा नाकारता येणार नाही. अगदी लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्व जणांचा हिरमोड झालेला आपण पाहिला आणि हे होणे जरी स्वाभाविक असले तरी सर्वांचे आरोग्य व जिवाची सुरक्षा ही केंद्रस्थानीच असली पाहिजे. त्यासाठी असलेल्या नियमांचे पालन करणे ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. सण-उत्सव दरवर्षी येत असतात. ते आगळय़ावेगळय़ा पद्धतीने साजरे करण्याची संधीसुद्धा येत असते. असे हे संकट क्वचितच येत असते. यावर खबरदारी व जबाबदारीने मात करून पुढे जायचे असते. कारण ती आपली सर्वांची जबाबदारी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या