वेब न्यूज : हिंदुस्थानी तंत्रज्ञाला इन्स्टाग्रामचे बक्षीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्पायडरमॅन

विविध सोशल मीडिया, वेबसाईट्स आणि त्यांचे मोबाईल ऍप्स हे अनेक अडचणींचा सामना करत असतात. कधी व्हायरस किंवा मालवेअरचा हल्ला, अपडेटमधून लाखो युजर्सच्या मोबाईलमध्ये पोचलेला एखादा बग, ऑप्लिकेशनमध्ये राहिलेली एखादी त्रुटी अशा अनेक समस्या या टेक कंपन्यांना भेडसावत असतात. त्यांचे कुशल तंत्रज्ञ या समस्या शोधण्यासाठी, सोडवण्यासाठी सतत कार्यरत असतातच, मात्र तरीही एखादी त्रुटी ही राहून जातेच. अशावेळी या त्रुटीचा गैरफायदा न घेता सदर कंपनीला ही त्रुटी दाखवून देणाऱ्या युजर्सना कंपनीतर्फे अनेकदा भरघोस रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते आणि आभाराचे पत्रदेखील.

हिंदुस्थानच्या अशाच एका तंत्रज्ञाने फेसबुकसारख्या हाय टेक कंपनीकडे मालकी असलेल्या इन्स्टाग्राम या फोटो आणि व्हिडीओ शेअरिंग सर्व्हिसेसच्या ऍपमधील एक मोठी त्रुटी दाखवून दिली आहे. इन्स्टाग्रामने त्याबद्दल त्याला तब्बल 30 हजार डॉलर एवढी रक्कम बक्षीस म्हणून दिली आहे. चेन्नईमध्ये राहणाऱ्या लक्ष्मण मुथीया या तंत्रज्ञान सुरक्षा विषयात संशोधन करणाऱ्या तरुणाला हा सन्मान मिळाला आहे. लक्ष्मणने यासंदर्भात आपल्या ब्लॉगवरती पोस्ट लिहून विस्तृतपणे या प्रकरणाची माहिती दिली आहे. मीडिया तसेच या क्षेत्रातील अनेक तज्ञांनी याची दखल घेत त्याचे कौतुकदेखील केले आहे. लक्ष्मणने लिहिले आहे की, या त्रुटीचा अर्थात बगचा शोध लागल्याबरोबर, त्याने इन्स्टाग्रामच्या सुरक्षा विभागातील तंत्रज्ञानाबद्दल कळवले. पण अपुरी माहिती आणि सबळ पुरावे देता न आल्याने त्यांनादेखील आधी या गोष्टीवरती विश्वास बसेना आणि नक्की त्रुटी काय आहे याचा अंदाज बांधता येईना. त्यानंतर मग प्रचंड मेहनत घेत लक्ष्मणने या त्रुटीसंदर्भात विस्तृत माहिती देणे, या संदर्भातले स्क्रीनशॉट्स पुरवणे, व्हिडीओ काढून सादर करणे अशी सगळी कामे केली. त्यानंतर मात्र इन्स्टाग्रामची सुरक्षा टीम खडबडून जागी झाली आणि त्यांनी या त्रुटीवरती उपाय शोधत ती दूर केली.