लेख – तरुणाईचा देश

>> दिलीप जोशी

12 जानेवारी, आपल्या देशातील तरुणाईचा दिवस असतो. जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवर असे दिवस, समाजातील त्या त्या घटकांच्या उन्नतीसाठी साजरे केले जातात. आपण बालदिन साजरा करतो. वृद्धाची काळजी घेण्याची आठवण करून देणारा दिवस असतो तसाच हा तरुण (यूथ) दिन! तरुणांसाठीचा जागतिक दिवस आहे 12 ऑगस्ट. त्याचा आरंभ युनोच्या प्रेरणेने 1999 मध्ये झाला. हिंदुस्थानने मात्र आपला तरुण किंवा युवादिवस 15 जानेवारी ठरवला. कारण ऐन तारुण्यात आपल्या प्रखर विद्वत्तेने जग अक्षरशः गाजविलेल्या स्वामी विवेकानंदांचा तो जन्मदिवस आहे. विवेकानंदांना 39 वर्षांचं आयुष्य लाभलं. म्हणजे पुरती चाळीशीही पार न केलेल्या स्वामींची जगात हिंदुस्थानी संस्कृतीचा झेंडा मिरवला. विविध धर्म तत्त्वांचा सखोल अभ्यास करून हिंदुस्थानी विचारधारेतील चिरंतन विचारांची, मानवतेवर आधारित प्रभावी मांडणी केली आणि जग जिंकलं.

तरुणाला जागृत करणारी अनेक भाषणं त्यांच्या अमोघ वाणीने श्रोत्यांवर परिणाम करत असत. 12 जानेवारी 1863 रोजी जन्मलेले विवेकानंद वयाच्या तिसाव्या वर्षी अमेरिकेतील शिकागो येथील सर्वधर्म परिषदेला गेले आणि आपल्या मोजक्या शब्दांतील भाषणाच्या आरंभी त्यांनी श्रोत्यांना ‘सिस्टर्स ऍण्ड ब्रदर्स ऑफ अमेरिका’ अशी साद घातली. एरवी प्रत्येक वक्त्याकडून ‘लेडीज ऍण्ड जन्टलमेन’ ऐकण्याची सवय असणाऱया अमेरिकन श्रोतृवृंदालाही गोष्ट अभिनव वाटली. टाळय़ांचा कडकडाट झाला. हा कोणीतरी आगळावेगळा माणूस आपल्याशी संवाद साधतोय असं त्यांना वाटलं. त्याआधी विवेकानंदांनी 1888 पासून देशात सर्वत्र भ्रमण केलं होतं. ते महाराष्ट्रातही आले होते. लोकमान्य टिळकांची आणि त्यांची भेट झाली होती. हिंदुस्थानातल्या तत्कालीन राजकीय आणि सामाजिक परिस्थितीची त्यांना जाणीव होती. म्हणूनच त्यांनी तरुणांना साद घातली.

तरुणांची शक्ती देशाचं चित्र बदलू शकते. रचनात्मक काम करणाऱया तरुण-तरुणींकडून देशाचा, समाजाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. कारण पुढच्या काळाची बदलती पावलं तरुणाईला जाणवत असतात. त्यांच्यात नवजाणिवा जागृत झालेल्या असतात. अशावेळी कालसुसंगत राहून आपल्या संचितामधलं जे आहे ते होऊन पुढे जाण्यात त्या देशाचा उत्कर्ष आणि स्वाभिमान असतो.

आजच्या जगात हिंदुस्थान हा सर्वांत तरुण देश असल्याचं युनोचा अहवाल सांगतो. हिंदुस्थानात छत्तीस कोटींहून अधिक तरुण ही संख्या देशाच्या लोकसंख्येच्या तुलने बरीच मोठी आहे. अमेरिकेत साडेसहा, चीनमध्ये तीस कोटी तरुण आहेत. जगातल्या वृद्धांची साधारण टक्केवारी पाहिली तर अमेरिकेत 16, चीनमध्ये 12, जपानमध्ये 26 टक्के वृद्ध व्यक्ती आहेत. हिंदुस्थानात हे प्रमाण 6 ते 7 टक्क्यांच्या आसपास आहे. तरुणांचा वयोगट 10 ते 24 असा युनोने ठरवला आहे. चाळीशीपर्यंतचे ‘तरुण’ गणले गेले तर आपल्या देशात जोश, जल्लोष असलेली तरुणाई खरोखरच व्यापक प्रमाणावर आहे आणि तेच राष्ट्राचे बलस्थान आहे.

या तरुणाईच्या हाताला योग्य ते काम आणि त्यांच्या श्रमाला योग्य तो दाम मिळाला तर एवढी तरुणाई प्रचंड विदायक कार्य करू शकते. तरुणांमध्ये असलेल्या या उत्साहाचा, ऊर्जेचा आणि संशोधनात्मक वृत्तीचा फायदा देशालाच नव्हे तर जगालाही होऊ शकतो. आपल्या महाराष्ट्रातील सोलापूरच्या रणजीतसिंह डिसले या तरुण शिक्षकाचं नाव सध्या जगात गाजतंय. आधुनिक तंत्रज्ञानाला अनुसरूनच विद्यार्थीप्रिय अभ्यासक्रम सादर करून उगवत्या पिढीला ज्ञानर्जनाची गोडी लावण्याचं अभूतपूर्व कार्य डिसले यांनी केलं. त्याबद्दल त्यांना मिळालेल्या जागतिक कीर्तीच्या पारितोषिकातली अर्धी रक्कम त्यांनी या स्पर्धेतील पहिल्या दहा सहशिक्षकांना दिली आणि ज्ञानार्जन, ज्ञानदान आणि औदार्याचा वस्तुपाठ जगाला शिकवला. असे शिक्षक तरुणाईला मार्गदर्शन करू लागले तर तरुणाईच्या आपल्या देशाचं भवितव्य उज्ज्वल आहे. विवेकानंदांचं स्वप्नही तेच होतं. आपल्या प्रजासत्ताकात तरुणांची संख्या मोठी असणं ही जमेची बाजू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या