अतर्क्य आणि अभिजात

551

>> शशिकांत सावंत

बेटांना कापडी आच्छादनं घालणं, इमारतींना कापडाने झाकून टाकणं किंवा शहरभर छत्र्या बसवणं अशा अतर्क्य गोष्टी कलेच्या प्रांतात बसतात? या प्रश्नांचं उत्तर म्हणजे इन्स्टॉलेशन आर्ट. या एका वेगळ्या माध्यमातून, दृष्टीतून व्यक्त होणारा इन्स्टॉलेशन आर्टिस्ट क्रिस्तो यांचं नुकतंच निधन झालं.

केवळ क्रिस्तो या नावाने ओळखला जाणारा इन्स्टॉलेशन आर्टिस्ट नुकताच निधन पावला. मूळचा बल्गेरियन असलेला हा कलावंत त्याच्या अनेक कामांमुळे वादग्रस्त ठरला होता आणि जगभरात त्यांनी खटले ओढवून घेतले होते. प्रामुख्याने पर्यावरणीय कला असं त्याच्या कलेचं वर्णन करता येईल. म्हणजे भोवतालचे दृश्य आपण पाहतो त्या पाहण्यातच बदल होईल असं काहीतरी घडवून आणणं हे त्याचे उद्दिष्ट होतं. उदाहरणार्थ बेटांना कापडी तरंगणारी आच्छादनं घालायचा किंवा इमारती कापडाने झाकून टाकायच्या किंवा शहरभर छत्र्या बसवायच्या, अशी वेगळी आणि अतर्क्य वाटावी अशी काही त्याच्या कलांची उदाहरणं आहेत.

1962 मध्ये पॅरिसमधील रस्त्यावर 240 पिंप ठेवून त्याच्या पहिल्या इन्स्टॉलेशनची सुरुवात झाली. 1972 साली त्यांनी कोलोरॅडोमधील रस्त्यावर डोंगरांमध्ये भला मोठा पडदा लावला. 1976 मध्ये कॅलिफोर्नियामध्ये रनिंग फॅन्स म्हणजे धाव कंपनी असा लांबलचक पडदा त्याने बांधला. 18 किलोमीटर उंची आणि 45 किलोमीटर लांबीच्या या पडद्यासाठी दोन लाख चौरस मीटर कापड लागलं. 1995 मध्ये बर्लिनमधील राईनस्टॅग इमारतीला पूर्ण कापडाने आच्छादून टाकणारं त्याचे इन्स्टॉलेशन चर्चेचा विषय झालं. 1968 साली डॉक्युमेंटा प्रदर्शनात त्यांनी उभा केलेला अतिभव्य कापडी टॉवर हादेखील विलक्षण होता.

क्रिस्तोची अनेक कामं ही अक्षरशः शेकडो मजूर आणि लाखो डॉलर्स खर्चून केलेली होती. त्याच्या कामांचा विस्तार प्रचंड असायचा. इटलीमध्ये एका तलावावर त्याने तरंगत्या रस्त्यासारखे इन्स्टॉलेशन घडवले. त्यासाठी पॉलिथिनचे रिकामे बॉक्सेस, विशिष्ट प्रकारे विणकाम करून घेतलेले कापड, पाणबुडय़ांना घेऊन ते तळाला बांधणं, हेलिकॉप्टरने बॉक्सेस त्या बेटावर आणणं या गोष्टी करण्यासाठी प्रचंड बजेट लागायचं. त्याच्या वेबसाईटवर हे सारं त्याने कसं केलं हे पाहता येते. या साऱया कामामागील कष्टही जाणवतात. अनेकदा तो पाच ते दहा वर्ष अशा कामांची तयारी करत असायचा.

क्रिस्तोचा जन्म 1930 साली बल्गेरियात झाला. तिथे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने तिथून पळून जाऊन युरोपमध्ये प्रवास केला. पॅरिसमध्ये असताना 1958 मध्ये त्याला ज्यॉ क्लॉड ही तरुणी भेटली आणि दोघे प्रेमात पडले. तेव्हा तिचं खरं लग्न ठरलं होतं, पण ते सोडून तिने क्रिस्तोशी लग्न केलं. ती स्वतःही कलावंत होती आणि क्रिस्तोच्या अनेक प्रदर्शनात तिचा सहभाग असायचा. मात्र पुढे दोघांनी मिळून केवळ क्रिस्तोचेच नाव प्रदर्शनात राहील अशी काळजी घेतली होती.

ज्यॉ क्लॉड, क्रिस्तोच्या कामासाठी वेगवेगळ्या मंडळींशी संवाद साधणे ते यासाठी पैसे उभे करणे अशा सर्व कामांची जबाबदारी घ्यायची. त्यामुळेच वर्षानुवर्षे क्रिस्तो निर्धोकपणे काम करू शकला. 1968 पासून दोघेही अमेरिकेत स्थायिक झाले.

जास्पर जोन्ससारखे क्रिस्तोचे समकालीन आणि दिग्गज कलावंत आजही कार्यरत आहेत. परंतु या साऱयांचा बहराचा काळ संपला आहे. साठ-सत्तरच्या दशकात ही सारी मंडळी मोठय़ा प्रमाणावर कार्यरत होती आणि जागतिक कलेच्या इतिहासात त्यांनी आपले योगदान दिलं. क्रिस्तोची गोष्ट मात्र वेगळी. अगदी काल-परवापर्यंत तो कार्यरत होता. त्याचे एक प्रदर्शन तर पुढच्या वर्षी होणार आहे

त्याच्या कामाची अनेक वैशिष्टयं होती. मुळात त्याचं कुठलंही काम विक्रीसाठी नव्हतं. त्याने कधी प्रायोजक घेतला नाही. खरंतर त्याच्या कामांची जगभर चर्चा होत असल्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्या आनंदाने त्याला स्पॉन्सरशिप द्यायला पुढे येत. बहुतेक प्रदर्शनांसाठी त्याने स्वतः पैसे उभे केले. त्यासाठी अनेकदा ज्या प्रकल्पाची उभारणी करायची आहे त्याची रेखाटनं विकली जात . ही रेखाटनं आधुनिक उत्तम समकालीन चित्रकला पाहिल्याचा आनंद देतात. क्रिस्तोचे कोणतेही काम टिकावू नसल्याने त्याच्या कामाचा नमुना म्हणून फोटोंशिवाय काहीच दाखवता येत नाही.

सावित्री या कादंबरीत न टिकणाऱया कलेबाबत एक तात्त्विक संवाद आहे. गणपतीची मूर्ती कलावंत घडवतो तेव्हा त्याला ती टिकणार नाही याची जाणीव असते. मग तो का घडवतो यावर सावित्री म्हणते की, ही माझी कला आहे. तसंच क्रिस्तोच्या कामाबद्दल म्हणता येईल. आज त्याचं काम फोटोच्या रूपातच पाहता येते. अर्थात त्याने केलेली रेखाटनं सोडून भोवतालच्या जगाकडे बघण्याची आपली नजर बदलून टाकण्याचा ध्यास शेवटपर्यंत घेतला आणि एक जगावेगळा कलावंत म्हणून लौकिक प्राप्त केला. प्रत्येक कलाकाराला केवळ हीच ओढ असावी म्हणूनच कला आणि कलाकार कायम श्रेष्ठ ठरतात.

आपली प्रतिक्रिया द्या