
>> सीए संतोष घारे
वाढती महसूल तूट, महागाई आणि ग्रामीण भागात घटणारे उत्पन्न याचा सारासार विचार करून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून आज मांडण्यात येणारा निवडणूकपूर्व हंगामी अर्थसंकल्प आर्थिक पातळीवरची परीक्षा असणार आहे. अर्थात, केंद्रातील भाजप नेतृत्वाखालील सरकार निवडणूकपूर्व अर्थसंकल्प सादर करण्याची संधी गमावणार नाही हेदेखील तितकेच खरे. अशा अर्थसंकल्पातील घोषणांमधून निवडणुकांसाठीची तजवीज केली जाते असा आजवरचा प्रवाह राहिला आहे. विद्यमान शासनही त्याला अपवाद ठरण्याची शक्यता नाहीच.
विद्यमान केंद्र सरकारच्या चालू कारकीर्दीतील अखेरचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सादर करतील. सार्वत्रिक निवडणुकांच्या पूर्वसंध्येला हा अर्थसंकल्प सादर होणार असल्याने त्याचे स्वरूप अंतरिम अर्थसंकल्प असे असणार आहे. तरीही आजवरच्या सरकारांची परंपरा पुढे नेत विद्यमान शासनही या अर्थसंकल्पातून भरभक्कम घोषणांचा वर्षाव करून आपली मतांची बेगमी अधिक भक्कम करण्याची संधी सोडण्याची शक्यता नाहीच.
असे असले तरी वाढती महसूल तूट, महागाई आणि ग्रामीण भागात घटणारे उत्पन्न याचा सारासार विचार करून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यांकडून निवडणूक पूर्व मांडण्यात येणारा हंगामी अर्थसंकल्प हा आर्थिक पातळीवरची परीक्षा असणार आहे. 2019 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी हंगामी अर्थसंकल्प सादर करताना अल्पभूधारक आणि मजूर शेतकऱ्यांसाठी निश्चित अर्थसहाय्य उपलब्ध करून देणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची (पीएम-किसान) घोषणा केली होती. या योजनेनुसार दोन हेटरपर्यंत शेती असणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दरवर्षी सहा हजार रुपयांचे प्रत्यक्ष अनुदान देण्यात येत आहे. हा निधी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये यानुसार तीन हप्त्यांत जमा केला जातो. ही योजना 75 हजार कोटी रुपयांच्या वार्षिक अंदाजित खर्चाचा भाग होती आणि ती डिसेंबर 2018 पासूनच पूर्वलक्षी प्रभावापासून लागू करण्यात आली. त्यानुसार 31 मार्च 2019 पर्यंतच्या कालावधीसाठी पहिला हप्ता त्याच आर्थिक वर्षात देण्यात आला. या योजनेमुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बऱ्यापैकी राजकीय फायदा झाल्याचे दिसून आले.
या पार्श्वभूमीवर येणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पातूनही अशाच प्रकारची योजना जाहीर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः ग्रामीण भागातील उत्पन्नातील घसरण पाहता अशाच प्रकारच्या योजना आणण्यास प्रोत्साहन मिळू शकते. अर्थात मदतीसाठी हात मोकळे सोडणाऱ्या सीतारामन यांच्या निर्णयाचा चलनवाढीवरदेखील परिणाम होणार आहे. विशेषतः अन्नधान्यातील चलनवाढ यासंदर्भातील महागाईचा दर नोव्हेंबरमध्ये स्थिर झाला होता, मात्र डिसेंबरपासून त्याचे चटके बसू लागले आहेत. त्यामुळे या गोष्टीची सरकारला चिंता आहे. लोकप्रिय ठरणारी योजना जाहीर करताना त्याचा महागाई दरावर कितपत परिणाम होऊ शकतो, हे सरकारला पाहावे लागेल. याशिवाय ग्रामीण खर्चाची क्षमता वाढवण्यावरदेखील विचार करावा लागणार आहे.
अर्थसंकल्पाचे वारे वाहू लागताना एकच चर्चेची हवा राहते आणि ती म्हणजे प्राप्तीकराबाबत काय निर्णय होणार? आगामी हंगामी अर्थसंकल्पात बदलांबाबतच्या घोषणा होत असतील किंवा एखादी होत जरी असेल तर तो निर्णय एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नसेल. हिंदुस्थानी नागरिक दरवर्षी अधिक कर सवलत मिळवण्यासाठी आणि प्राप्तीकरात कपात होण्यासाठी नियोजन करत असतात आणि आडाखे बांधत असतात. त्याचवेळी सरकारने मात्र नवीन कर व्यवस्था आणली असून आता ते कर सवलत न देणाऱ्या व्यवस्थेत सर्वांना नेऊ इच्छित आहे. प्राप्तीकर विभागाने चालू आर्थिक वर्षात डिसेंबरच्या मध्यापर्यंत निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात 20.66 टक्के वाढ नोंदली आहे आणि ती 13.70 लाख कोटींपेक्षा अधिक आहे. या संकलनात 6.95 लाख कोटींचा कॉर्पोरेशन टॅक्स आणि 6.73 लाख कोटी रुपयांचा व्यक्तिगत कर (सिक्युरिटी व्यवहार करांसह) याचा समावेश आहे. चालू आर्थिक वर्षातील प्रत्यक्ष कर संकलन हे अर्थसंकल्पाचा 75 टक्के अंदाज सांगतो.
करतज्ञांच्या मते 2024 च्या अर्थसंकल्पात 80 डीनुसार आरोग्य विमा हप्ता भरल्यापोटीची कमाल 25 हजार रुपयांची मिळणाऱ्या कर सवलतीची मर्यादा ही 50 हजार रुपये आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 50 हजारांवरून 75 हजार रुपये करण्याची शक्यता आहे. माध्यमांतील बातम्यांनुसार एक योग्य भांडवली लाभ कर व्यवस्था तसेच घरासाठी किंवा व्यावसायिक मालमत्तेसाठी भरण्यात येणाऱ्या व्याजापोटी मिळणाऱ्या कर सवलतीत वाढ करण्याचीदेखील मागणी केली जात आहे. मागील अर्थसंकल्पात नवीन कर व्यवस्थेला ऐच्छिक पर्याय म्हणून समोर आणण्याचा प्रस्ताव मांडला होता. नव्या प्राप्तीकर व्यवस्थेनुसार उत्पन्नातील मर्यादा अडीच लाखांवरून तीन लाख रुपये केली. नवीन कर व्यवस्थेत प्राप्तीकराचा स्लॅबदेखील बदलला आहे.
नव्या कर व्यवस्थेनुसार कलम 87 ए नुसार देण्यात येणाऱ्या सवलतीनुसार सध्याच्या करमुक्त उत्पन्नाची 5 लाखांची मर्यादा ही 7 लाख रुपये केली आहे. यानुसार नवीन प्राप्तीकर व्यवस्था निवडणाऱ्या व्यक्तीला सात लाखांपर्यंत कोणताही कर भरावा लागणार नाही. 2023 च्या अर्थसंकल्पात नव्या कर व्यवस्थेनुसार कर श्रेणीतही बदल केला आहे. तीन लाखांपर्यंत कोणताही कर नाही आणि तीन लाखांपेक्षा अधिक आणि सहा लाखांपेक्षा कमी असणाऱ्या उत्पन्नावर पाच लाखांचा कर भरावा लागेल. सहा लाखांपेक्षा अधिक आणि 9 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मंडळींना दहा टक्के तर 9 लाख ते 12 लाखांपर्यंतचे उत्पन्न असणाऱ्या मंडळींना 20 टक्के दराने कर आकारला जातो. ज्यांचे उत्पन्न 15 लाखांपेक्षा अधिक आहे त्यांच्यासाठी 30 टक्के प्राप्तीकर लागू आहे.
गृहनिर्माण क्षेत्राला अर्थसंकल्पात नेहमीच डावलले जाते, असे या क्षेत्रातील जाणकार सांगतात. यंदाही नव्या घोषणांना कमी वाव दिसत आहे; परंतु सरकारने गृहकर्जाच्या व्याजावरील कर कपातीची मर्यादा 2 लाखांवरून 3 लाख रुपये करावी, ही जुनी मागणी मान्य व्हावी अशी करदात्यांचीही इच्छा आहे. याशिवाय, मालमत्तेचे नुकसान भरून काढण्यासाठी 2 लाख रुपयांची मर्यादा वाढवावी. एचआरएमध्ये अधिक सूट मिळण्यासाठी हैदराबाद, पुणे, अहमदाबाद, बंगळुरू या शहरांचा मेट्रो शहरांच्या यादीत समावेश करावा अशा काही मागण्यांचा विचार अर्थमंत्र्यांकडून केला जातो का हे पाहावे लागेल.
निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेनुसार, सरकार कोणत्याही प्रकारच्या कराची घोषणा करू शकत नाही, ज्यामुळे मतदारांवर परिणाम होईल. सरकारने निवडणुकीपूर्वी कोणत्याही मोठय़ा घोषणा करू नयेत आणि नवीन सरकारने पूर्ण अर्थसंकल्प जाहीर करावा, असे आयोगाची नियमावली सांगते. त्यामुळे मर्यादित षटकांच्या या सामन्यामध्ये अर्थमंत्र्यांना फटकेबाजी करावयाची आहे. त्यामध्ये त्या किती धावा काढतात हे पाहूया.
(लेखक अर्थकारणाचे अभ्यासक आहेत.)




























































