साय-फाय- तुमची मुलं इंटरनेट विश्वात सुरक्षित  आहेत का?

>> प्रसाद ताम्हनकर

आजच्या वेगाने धावणाऱया जगात अनेक लहान मुलं ही इंटरनेटचा मोठय़ा प्रमाणात वापर करीत आहेत. पूर्वीपेक्षा लहान वयात मुलांकडून इंटरनेटचा वापर वाढला आहे आणि हे खरे चिंतेचे कारण आहे. ज्याप्रमाणे हे लहानगे त्यांना हव्या असलेल्या साधनांपर्यंत (जसे की, स्कूल प्रोजेक्टसाठी माहिती, फोटो गोळा करणे, सोशल मीडियाच्या माध्यमातून मित्रांच्या संपर्कात राहणे, गाणी ऐकणे, चित्रपट बघणे) पोहोचत आहेत, त्याप्रमाणे काही घातक गोष्टीदेखील अनोळखी लोकांच्या माध्यमातून तुमच्या मुलांपर्यंत पोहोचत आहेत.

इंटरनेटच्या विश्वात वावरणाऱया या मुलांची सुरक्षा हा जगभरातील देशांचा काळजीचा विषय बनत चालला आहे. ही मुलं फक्त इंटरनेटचा वापर करीत नाहीत, तर ती इंटरनेटच्या विश्वात मोठी होत आहेत. युनिसेफ या संयुक्त राष्ट्रांच्या मुलांसाठी असलेल्या संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार, 30 देशांतील एक तृतीयांशपेक्षा जास्त मुलांना इंटरनेटच्या जगात गुंडगिरी आणि धमक्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे सुमारे 20 टक्के मुले शाळेत जाणे बंद करतात. द्वेषमूलक भाषा, चुकीची आणि खोटी माहिती मिळणे या जोडीला दहशतवादी संघटना नवीन भरतीसाठी मोठय़ा प्रमाणावर अशा मुलांना आपल्या जाळ्यात ओढत असतात. युनिसेफच्या मते, या सगळ्या संकटांपेक्षा या कोवळ्या वयातील मुलांना इंटरनेटवर लैंगिक शोषण आणि अत्याचाराचा धोका सर्वाधिक आहे.

इंटरनेटच्या वाढत्या प्रसारामुळे आता बाल लैंगिक गुन्हे करणाऱयांना त्यांचे सावज शोधणे अधिक सोपे झाले आहे. अगदी सहजपणे ते या लहान मुलांना एखादे अश्लील चित्र, मजकूर किंवा व्हिडीओ पाठवू शकतात. असे गुन्हेगार इतरांनादेखील असे गुन्हे करण्यासाठी उद्युक्त करताना दिसून येत आहेत.

मेटा, ट्विटर, टिकटॉक, इन्स्टाग्राम या जगभरात मुलांमध्ये लोकप्रिय असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी विविध देशांत विविध प्रकारचे कडक नियम लागू केलेले आहेत. कोवळ्या वयातील मुले अयोग्य साहित्याला सामोरी जाऊ नयेत, त्यांचे लैंगिक शोषण होऊ नये, त्यांना धमक्या, हिंसक भाषेचा सामना करावा लागू नये ही या कंपन्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. अनेक सोशल मीडिया कंपन्या यासाठी वेगवेगळे फिल्टर्स वापरून मुलांच्या सुरक्षेत वाढ करत असतात. काही कंपन्यांनी या सोशल मीडिया अॅप्सची लहान मुलांसाठी वेगळी व्हर्जन तयार केली आहेत. पालक आपल्या मुलांसाठी त्यांचा वापर करू शकतात, ज्यामुळे ही मुले कोणत्याही प्रकारच्या प्रौढ साहित्याला सामोरी जाणार नाहीत.

मुलांच्या सुरक्षेत पालकांची भूमिका ही सर्वात जास्त महत्त्वाची आहे. एका ठरावीक मर्यादेनंतर आपला पाल्य इंटरनेटचा वापर किती प्रमाणात आणि कशासाठी करतो आहे, अनोळखी व्यक्तींच्या संपर्कात आपली मुले आली आहेत का? आपली मुले सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठल्या प्रकारचे साहित्य बघत असतात, ते हिंसक

ऑनलाइन गेम्स खेळतात का? अशा साध्या, पण महत्त्वाचा गोष्टींकडे पालकांचे लक्ष असणे अत्यंत महत्त्वाचे. सध्या इंटरनेटवर आपल्या पाल्याच्या इंटरनेट वापरावर लक्ष ठेवण्यासाठी अनेक साधने उपलब्ध आहेत. मात्र फार मोजके पालक त्यांचा वापर करतात. सायबर सुरक्षा तज्ञांच्या मते, पालकांनी ज्या प्रकारे ते आपल्या पाल्याच्या शाळेतील, खेळातील दैनंदिन घटनांची चौकशी करतात, अगदी त्याच पद्धतीने रोज त्याच्या इंटरनेटवर घालवलेल्या वेळेबद्दलदेखील त्याच्याशी चर्चा करणे हा एक अत्यंत सोपा, पण परिणामकारक सुरक्षा उपाय आहे.

[email protected]