थेंबे थेंबे तळे साचे – कुटुंबाचा तारणहार  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> चंद्रहास गोपीनाथ रहाटे, आर्थिक सल्लागार

जेव्हा आपण आपल्या कुटुंबासमवेत असतो तेव्हा कसं अगदी छान चाललेलं असतं. जे आपल्या कुटुंबाला हवंय ते पुरविण्याचा  प्रामाणिक प्रयत्न करतो. कुटुंबाच्या आवडीनिवडी आपण आनंदाने पुरवीत असतो. आपलं निष्पाप कुटुंबदेखील कुटुंबप्रमुखावर भरवसा ठेवून  निश्चिंत  असतं. जणू काही आता जी जीवनशैली आपण जगतो आहे, ती कायम राहणारआहे या भाबडय़ा कल्पनेत ते वावरत असते, पण जीवनाची अनिश्चितता मात्र दाहक असते. अनिश्चित वेळेसाठी करण्याच्या तरतुदी  राहून जातात व त्याचे दूरगामी परिणाम कुटुंबीयांना भोगावे लागतात. 

 

एक जबाबदार व्यक्ती म्हणून कुटुंबप्रमुखाने अनिश्चित वेळेसाठी तरतूद करणे खूप खूप गरजेचे आहे. आपले कुटुंबीय कधीच आपल्याला ही जाणीव देणार नाहीत, पण आपण स्वतः या गोष्टीचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.

मला तुम्ही तुमच्या नातेवाईकांपैकी किंवा मित्रांपैकी फक्त  दोन अशी नावे द्या की, ज्या पद्धतीने तुम्ही आपल्या कुटुंबाचं संगोपन करीत आहात, त्यांची स्वप्नं पूर्ण करीत आहात, अगदी त्याच पद्धतीने या दोन व्यक्ती तुमच्या कुटुंबाची काळजी घेतील. सांगा, किती नावे डोळ्यांसमोर येतात? बरं, आली तर त्यांना जाऊन विचारा की, तुमच्याप्रमाणे तंतोतंत ते तुमच्या कुटुंबाची काळजी घ्यायला तयार आहेत का? तुम्ही जर असं कोणाला विचारायला गेलात तर ही मंडळी तुम्हाला कधी तोंडही दाखवणार नाहीत. एखादी व्यक्ती जेव्हा या जगातून निघून जाते तेव्हा तिच्या माध्यमातून निर्माण होणारं उत्पन्नसुद्धा निघून जातं. या उत्पन्नावर कुटुंबाच्या अनेक जणांची स्वप्ने अवलंबून असतात. प्राथमिक म्हणजे कुटुंबाचं राहणीमान आणि त्यांची जीवनशैली. यासाठी लागणारं उत्पन्न जर कुटुंबप्रमुखानंतर  कुटुंबाकडे आलं नाही तर ज्या पद्धतीने ते राहत आहे, ती जीवनशैली ते टिकवू शकेल का?  या जीवनशैलीमध्ये अगदी राहण्याच्या जागेपासून मुलं ज्या शाळेत जातात त्या मूलभूत गोष्टींचा समावेश आहे. ज्या कुटुंबाचा अगदी स्वप्नवत प्रवास चालू आहे, हा प्रवास जर कुटुंबप्रमुखाच्या जाण्यानं विस्कळीत झाला तर त्याला जबाबदार कोण?

माझ्या मते जी व्यक्ती आपल्या उत्पन्नाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचं संगोपन करीत असेल, त्याच व्यक्तीने आपण नसल्यावरही उत्पन्न त्याच पद्धतीने मिळण्याची सवय करायला हवी.