विचारा तर खरं…

>> उदय पिंगळे, अर्थ अभ्यासक

मी आणि माझी पत्नी नोकरी करीत असून आमच्या संयुक्त नावे कर्ज घेऊन घर खरेदी केले आहे. आम्ही ते घर बांधून पूर्ण होण्याआधी ईएमआय भरण्याचा पर्याय स्वीकारला होता. अलीकडे घर बांधून पूर्ण झाले असून आम्हाला त्याची गरज नसल्याने भाडय़ानेही दिले आहे. यासंदर्भात आम्हाला कोणकोणत्या कर सवलती मिळतील?

सुजित कांबळे, अकलूज

उत्तरः आपण संयुक्त नावे घर घेतले असून त्यासाठी असलेल्या कर सवलतींचा फायदा तुम्हा दोघांनाही जुन्या पद्धतीने कर मोजणी केल्यास घेता येईल. बांधून पूर्ण झालेल्या घराच्या कर्जाच्या मुद्दलेवर 80 सी नुसार दीड लाख रुपयांच्या मर्यादेत सवलत मिळते. त्याचप्रमाणे कलम 24 नुसार गृहकर्जावरील दोन लाख रुपये व्याजावर घरापासून झालेला तोटा समजून उत्पन्नातून वजावट मिळेल. घर बांधून होण्यापूर्वीच्या एकूण व्याजावर त्या वर्षांपासून प्रतिवर्षी 20 टक्के अशी पाच वर्षांत वजावट मिळेल. आपण घर भाडय़ाने दिले असून या भाडय़ातून मालमत्ता कर वजा करून उरलेल्या रकमेवर 30 टक्के प्रमाणित वजावट मिळेल. नव्या कर मोजणी पद्धतीप्रमाणे केल्यास फक्त भाडय़ाने दिलेल्या घराच्या व्याजावरच कोणत्याही मर्यादेशिवाय ही सवलत मिळेल. आपल्याला मिळणारे सर्व उत्पन्न विचारात घेऊन जुन्या आणि नव्या कर पद्धतीने मोजणी करावी, जेथे आयकर कमी बसेल ती पद्धत स्वीकारावी. पण आपल्या बाबतीत जर नवी पद्धतीत कर तात्पुरता कमी बसला आणि ती आपण स्वीकारली तर घरापासून मिळालेले उत्पन्न हे व्यवसायाचे उत्पन्न समजल्याने एकदा नवी पद्धती स्वीकारल्यास पुन्हा जुन्या पद्धतीने विवरणपत्र सादर करता येणार नाही. हा धोका लक्षात घेऊनच अंतिम निर्णय घ्यावा.

जमीन खरेदी केली तर आयकरात काही सवलत मिळते का?

रसिका जोशी आपटे, पुणे

उत्तरः जमीन खरेदी केली म्हणून आयकरात थेट कोणतीही कर सवलत मिळत नाही. आपल्याला झालेल्या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर काही मर्यादेत आणि विशिष्ट मुदतीत स्वतःसाठी राहण्यास घर किंवा अन्य एका घरात गुंतवणूक केली असता त्यासाठी जमीन घेतली असेल तर त्या घराच्या एकूण किमतीतच जमिनीची किंमत मिळवता येईल. त्यावर ज्या सवलती मिळू शकतात त्या अप्रत्यक्षपणे घेता येतील.

वाचकहो, आर्थिक गुंतवणुकीसह आर्थिक समस्यांसंदर्भातील तुमच्या मनातील प्रश्न, शंका [email protected] या मेलवर पाठवा.