अस्थिर इराण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सनत कोल्हटकर

अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका-इराण यांच्यातील अणुकरार मोडीत काढला आहे आणि इराणला त्यावर बोलणी करण्यासाठी ६ ऑगस्ट ही ‘डेडलाइन’ दिली आहे. इराणने यासंदर्भात पुढाकार घेतला नाही तर ट्रम्प त्या देशावर कडक आर्थिक निर्बंध लादतील हे स्पष्ट आहे. या सर्व पार्श्वभूमीवर इराणचे चलन ‘रियाल’ हे रोज निच्चांकाची नवीन पातळी गाठत आहे आणि नजीकच्या भविष्यात आखातामध्ये अस्थिरता पसरण्याची भीती आहे.

अमेरिकेचे पूर्वाध्यक्ष बराक ओबामा यांनी २०१६ मध्ये इराणबरोबर केलेला अणुकरार अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन महिन्यांपूर्वी मोडीत काढल्यानंतर इराणचे चलन ‘रियाल’ याचे डॉलर्सच्या तुलनेत वेगाने अवमूल्यन होत आहे. ‘रियाल’ रोज निच्चांकाची नवीन पातळी गाठताना दिसत आहे. एप्रिलपासून जुलैअखेरपर्यंत रियालने डॉलर्सच्या तुलनेत ५० टक्क्यांनी अधिकृतरीत्या किंमत गमावली आहे. इराण सरकारचा सध्याचा अधिकृत डॉलर्सचा विनिमय दर ४५ हजार रियाल आहे. जानेवारीमध्ये एका डॉलरसाठी सुमारे ३५ हजार रियाल मोजले जात होते. इराणमध्ये सध्या अमेरिकन डॉलर्सचा ‘काळाबाजार’ जोरात सुरू असल्याचे बोलले जाते. सध्या एका डॉलरसाठी एक लाख १२ हजार रियाल मोजावे लागत आहेत. पण इराणमधील बँकेकडे डॉलर्सची अनुपलब्धता असल्याने इराणमधील नागरिक संत्रस्त आहेत. जेथे सहा महिन्यांपूर्वी ३५ हजार रियाल देऊन १ डॉलर मिळायचा तेथे आता एक लाख १२ हजार रियाल मोजावे लागत आहेत असे सांगतात.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुधारित अणुकराराची बोलणी करण्यासाठी इराणला येत्या ६ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. इराणने या सुधारित करारासाठी अमेरिकेबरोबर बोलणी करण्यासाठी पुढाकार घेतला नाही तर ६ ऑगस्टनंतर अथवा त्यापूर्वीही ट्रम्प हे इराणवर कडक आर्थिक निर्बंध घालतील हे निश्चित. अमेरिका पूर्वी केलेल्या अणुकरारातून बाहेर पडण्याबद्दल गेले सहा महिने बोलत होती. तेव्हापासूनच इराणच्या अर्थजगतात खळबळ माजली होती. आज ना उद्या हे निर्बंध येणारच याबद्दल इराणच्या नागरिकांमध्ये संशय नव्हता.

इराणने अमेरिकेच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही तर या वेळी इराणची दिवाळखोरीकडे वेगाने वाटचाल होऊ शकते. सध्या तरी युरोप, चीन, रशिया, हिंदुस्थान या देशांनी इराणच्या जुन्या कराराला समर्थन दिले आहे. युरोप इराणबरोबर ‘युरो’ चलनात व्यवहार करू इच्छितो. परंतु युरोप अजून किती काळ अमेरिकेला विरोध करू शकतो हे येणारा काळच सांगू शकेल. चीन आणि हिंदुस्थान मात्र इराणकडून तेल आयातीबाबत अजून तरी ठाम आहेत. इराण आणि हिंदुस्थानचे फार जुने राजनैतिक संबंध असून त्यामुळे हिंदुस्थानने तो फक्त ‘संयुक्त राष्ट्रांनी’ घातलेल्या निर्बंधांनाच मान्यता देईल असे सध्या तरी जाहीर केले आहे. हिंदुस्थानची प्रचंड लोकसंख्येची ‘एनर्जी’ची गरज पाहता इराणकडून क्रूड तेलपुरवठा बंद करणे हिंदुस्थानला परवडणारे नाही. अमेरिकेने सौदी अरेबियाला क्रूड तेल उत्पादन वाढविण्यास सांगितले असले तरी सौदीला क्रूड तेल उत्पादनाला मर्यादा आहेत. हिंदुस्थानने अमेरिकेकडून कच्च्या क्रूड तेलाची आवक वाढविली आहे. परंतु इराणला क्रूड तेलाच्या जागतिक बाजारात तेल विकण्यास निर्बंध घातले गेले तर क्रूड तेलाचे भाव १०० डॉलर्स प्रति बॅरलच्या पुढेही जाऊ शकतील अशी भीती आहे. तसेच हिंदुस्थान जे तेल इराणकडून विकत घेतो त्यामध्ये काही भाग डॉलर्समागे खरेदी करतो तर काही भाग वस्तूंच्या (जिन्नसांच्या) बदल्यात घेतो. म्हणजे काही भाग हिंदुस्थानी रुपयांमध्ये खरेदी करतो. इराणकडून हिंदुस्थानला ही सवलत दिली जाते. अर्थात हे प्रमाण किती आहे हे स्पष्ट नाही.

सध्या इराणबरोबर त्याच्या शेजारील देश ‘तुर्कस्तान’च्या चलनाचेही गेल्या चार महिन्यांत ४० टक्क्यांनी डॉलर्सच्या तुलनेत अवमूल्यन झाले आहे. इराणमधील अमेरिकेला निर्यात करणाऱया व्यापारी लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. गेल्या दोन महिन्यांत इराणमधील काही मोठय़ा शहरांमध्ये तेथील सरकारविरोधात मोठे मोर्चे निघाले होते. इराणने सीरिया, इराक, लेबेनॉन, पॅलेस्टाईन, येमेन येथे आर्थिक गुंतवणूक न करता इराणमधील नागरिकांकडे जास्त लक्ष द्यावे, अशी या लोकांची मागणी होती. इराणने तेथील नागरिकांच्या या असंतोषामागे अमेरिका व इस्राएलचा हात असल्याचा आरोप केला. इराणच्या ‘रियाल’ या चलनाचे हे गडगडणे कुठपर्यंत जाते याची सर्वांना उत्सुकता आहे. इराणनेही त्याला क्रूड तेलाच्या विक्रीला प्रतिबंध केला तर आखातातील तेल वाहतूक ज्या ‘होर्मुज’च्या खाडीतून होते तेथून कुठल्याही इतर तेल उत्पादक तेलवाहक जहाजाला जाऊ देणार नाही असे जाहीर केले. होर्मुजची ही चिंचोळी खाडी सुमारे फक्त ५५ किलोमीटर्सची आहे. या खाडीतूनच सौदी अरेबिया, अबूधाबी, कतार, ओमान या देशांची तेल वाहतूक होते.

इराणची अर्थव्यवस्था सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. हिंदुस्थानची इराणमधील ‘चाबहर’ बंदरात मोठी सामरिक तसेच आर्थिक गुंतवणूक आहे. हिंदुस्थानला या बंदरामुळे पाकिस्तानला वगळून थेट अफगाणिस्तानपर्यंत व्यापारासाठी प्रवेश मिळाला आहे. शिवाय आपल्याला इराण, अफगाणिस्तान ते मध्य आशियन देशांपर्यंत प्रवेश शक्य झाला आहे. अमेरिकेच्या इराणवरील संभाव्य निर्बंधांमुळे हिंदुस्थान-इराण संबंधांवर गंडांतर येण्याची भिती व्यक्त होत आहे. हिंदुस्थान हा अमेरिकेचा सामरिक भागीदार असल्याने हिंदुस्थानला इराणबरोबरील व्यवहाराबद्दल अमेरिकेकडून काही सवलत मिळू शकते का, याची सध्या चाचपणी सुरू असण्याची दाट शक्यता आहे.

अमेरिकेने इराणबरोबर व्यापार करणाऱया सर्व देशांना येत्या ४ नोव्हेंबरपर्यंत व्यापार बंद करण्यास सुचविले आहे. हिंदुस्थानलाही 4 नोव्हेंबरपर्यंतचा अवधी उपलब्ध असल्याने हिंदुस्थान काय निर्णय घेतो हे बघावे लागेल. चीन, रशिया, तुर्की हे देश इराणबरोबर असल्याने आणि त्यातही चीन हा इराणच्या तेलाचा मोठा ग्राहक असल्याने चीनचा अमेरिकेच्या आवाहनाला काय प्रतिसाद असेल याकडे जगाचे लक्ष आहे. इराणवरील निर्बंधाबाबत चीन अमेरिकेचे आवाहन धुडकावून लावेल अशीच लक्षणे आहेत. ७ ऑगस्टनंतर अमेरिका इराणमधून अमेरिकेत आयात होणारे गालिचे, इतर खाद्यपदार्थ यावर बंदी घालू शकेल. इराण जागतिक समूहाकडे इराणमधील अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अनेक करसवलती देऊ इच्छितो. ४ नोव्हेंबरनंतर अमेरिका इराणच्या तेल आणि वायू यांची विक्री व वाहतूक यावर निर्बंध घालेल अशी लक्षणे आहेत. तत्पूर्वी इराणने ट्रम्प यांच्याबरोबर सुधारित अणुकराराची बोलणी सुरू केली तर त्याला कदाचित निर्बंधांमध्ये मुदतवाढ मिळू शकेल. अमेरिका व इराण या दोन्हीही देशांतील ही ओढाताण नजीकच्या भविष्यात नवीन जागतिक संघर्षाला तर आमंत्रण देणार नाही ना, याकडे सर्व जगाचे लक्ष आहे.