
>> प्रसाद ताम्हणकर
अर्थव्यवस्थेचा एक आधारस्तंभ असलेल्या टेक कंपन्यांना वेळ पडल्यास नियमांचा बडगा दाखवणाऱया आणि धाकात ठेवणाऱया चीनचा आदर्श हिंदुस्थान सरकारनेही घेतल्यास देशातील अनेक छोटय़ा कंपन्या, स्टार्ट-अप आणि एकल व्यापाऱयांच्या आयुष्यात सुखाची पहाट अवतरायला वेळ लागणार नाही.
जगात सध्या सर्वच क्षेत्रांत प्रचंड प्रगती करत असलेला देश म्हणजे चीन होय. जागतिक महासत्ता होण्याची स्वप्ने बघणाऱया आणि त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आखत असलेल्या चीनने यावेळी त्याच्या देशातील टेक कंपन्यांनाच झटका दिल्याने संपूर्ण जगालाच आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. जागतिक बाजारातील एक मोठी कंपनी असलेल्या चीनच्या ‘अलिबाबा’ कंपनीला आर्थिक दंडाचा फटका देत चीनने इतरही टेक पंपन्यांना एक प्रकारे इशारा दिलेला आहे. चीनच्या टेक इंडस्ट्रीची जनक मानल्या जाणाऱया आणि ई-कॉमर्स क्षेत्रात सर्वोच्च स्थानी असलेल्या अलिबाबाला तब्बल 2.8 बिलियन डॉलर्सचा दंड चीन सरकारतर्फे ठोठावण्यात आलेला आहे. त्याचबरोबर इतर 34 टेक कंपन्यांच्या प्रमुखांना देखील यापुढे सावधपणे आणि सरकारतर्फे टेक कंपन्यांसाठी बनवण्यात आलेल्या नव्या नियमांचे पालन करतच व्यवसाय करण्यासंदर्भात इशारा देण्यात आलेला आहे. काही तज्ञांच्या मते, चीनच्या या नव्या नियमांवर चीनमधील इतर नव्या व लहान कंपन्या मात्र अत्यंत खूश आहेत. सरकारने आणलेल्या नव्या नियमांचा फायदा नवीन तसेच छोटय़ा कंपन्यांना मोठय़ा प्रमाणावर होणार असून त्यांना बाजारपेठेतील आपला हिस्सा वाढवायला मदतच मिळणार असल्याचा या कंपन्यांना विश्वास आहे. काही तज्ञ मात्र ‘अलिबाबा’वर गुदरलेल्या या प्रसंगाला राजकीय रंग असल्याचे ठामपणे मानतात. चीनमध्ये सर्वसामान्य लोकांवरती टेक कंपन्यांचा प्रचंड पगडा आहे. एकटय़ा अलिबाबा कंपनीचेच 800 दशलक्ष यूजर्स आहेत. या कंपन्यांनी जणू चीनच्या सर्वसामान्य जनतेसाठी एक अद्भुत जादुई जगच निर्माण केले आहे आणि त्यांच्या आयुष्यात एक वेगळे स्थान प्राप्त केले आहे. मात्र लोकांच्या आयुष्यात असेच एक स्थान चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचेदेखील आहे आणि आजवर लोकांच्या आयुष्यावर एकहाती नियंत्रण ठेवणारी कम्युनिस्ट पार्टी या टेक पंपन्यांकडे प्रतिस्पर्धी म्हणून पाहू लागली आहे. दुसरीकडे या सर्व घटनाक्रमामागे ‘अलिबाबा’चे सर्वेसर्वा असलेल्या ‘जॅक मा’ यांच्या एका गाजलेल्या भाषणाचादेखील हात असल्याचे मत व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी केलेल्या एका भाषणात ‘जॅक मा’ यांनी चीनच्या पारंपरिक बँकिंग व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ‘जॅक मा’ यांच्या या टीकेमुळे चीनमधील अनेक मोठे नेते नाराज झाल्याचीदेखील कुजबूज झाली होती. चीनच्या अधिकृत सरकारी मीडियाद्वारे ‘जॅक मा’ यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली होती. तसेच अलिबाबा कंपनीला समन्सदेखील पाठवण्यात आले होते. आणि अलिबाबा ग्रुपचाच हिस्सा असलेल्या अँट ग्रुपच्या शेअर मार्पेट लाँच रद्द करण्यात आले होते. अलिबाबावर करण्यात आलेल्या या कारवाईनंतर आता चीनमधील इतर मोठय़ा टेक कंपन्या ‘मायचुन’, ‘बाइटडान्स’, ‘टेंसेंट’, ‘जेडी डॉट कॉम’ चांगल्याच धास्तावलेल्या आहेत. चीनचे अर्थ विश्लेषक मात्र याला सरकारचे एक सकारात्मक पाऊल मानत असून सरकारने आणलेल्या या नव्या नियमांमुळे टेक कंपन्यांनी धास्तावण्याची गरज नाही. उलट अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठीच या नियमांचा उपयोग होणार आहे हे लक्षात घेण्याची गरज असल्याचे त्यांचे मत आहे.
z [email protected]






















































