निरागस मुलांना आसरा देणारे जीवन संवर्धन फाऊंडेशन

805

 

>> नमिता दामले

टिटवाळ्यामधील म्हसकळ येथील जीवन संवर्धन फाऊंडेशन ही संस्था पदपथावर, रेल्वे फलाटावर, पुलाखाली अत्यंत हलाखीत जीवन जगणाऱ्या मुलांचे पालकत्व घेऊन त्यांना आधार देण्याचं काम करते. या मुलांना चांगलं आरोग्य, चांगलं जीवनमान याबरोबरच चांगले शैक्षणिक संस्कार लाभावेत यासाठी ही संस्था मोलाचे कार्य करत आहे.

पदपथावर, रेल्वे फलाटावर, पुलाखाली अत्यंत हलाखीत जीवन जगणाऱया मुलांचे पालकत्व घेऊन त्यांना आधार देणारी ‘जीवन संवर्धन फाऊंडेशन’ ही संस्था. केवळ जनाधारावर काम करणाऱया या संस्थेत आजमितीला एकूण 60 मुले संस्थेच्या टिटवाळा व ठाणे येथील निवासांमध्ये वास्तव्य करून शिक्षणाचे संस्कार घेत आहेत.

कल्याणचे सदाशिव चव्हाण यांनी ही संस्था उभी केली. त्यामागे वेगळी गंमत आहे. ‘ज’ या अक्षरावरून ‘ज’नावर, ‘ज’मीन किंवा ‘ज’न्म देणारी कोणतीही व्यक्ती यांच्यासाठी कार्य करायचे, असे त्यांनी ठरवले आणि त्यांच्या असे लक्षात आले की माणसांसाठीच सुरुवातीला खूप काम करावे लागेल. लहान मुलांचे पुनर्वसन करायचे असे नक्की केले.

पदपथावर, रेल्वे फलाटांवर, पुलाखाली छोटी मुले कधी भीक मागताना तर कधी कोणी काही दिलेले खाताना दिसतात. कोणी ड्रग माफिया या मुलांना पावाला आयोडेक्स लावून खाण्यासारखी स्वस्त व्यसने लावतं आणि त्यांचा उपयोग ड्रग ट्रफिकिंगसाठी करतात. कधी कोणी भीक मागायला लावतात. या सगळय़ाच मुलांचे शारीरिक, लैंगिक शोषण  घडत असते. या जाचातून परिस्थितीतून मुलांना बाहेर काढण्याचे काम खूप अवघड असते. या मुलांना त्यातून सोडवून आणून समुपदेशन, संस्कार याद्वारे त्यांचे पुनर्वसन केले जाते.

संस्थेचे हे काम वेगवेगळ्या पातळीवर चालते. मुळात ही मुलं त्यांचा फायदा घेणाऱया मोठय़ा माणसांच्या उत्पन्नाचे साधन असतात. सुरुवातीला ती कोणाशीही संवाद साधण्यास तयार नसतात. परिस्थितीमुळे ती गांगरली जातात, घाबरतात. यामुळेच त्यांच्याशी बोलून त्यांचे आई, दादा, ताई, मावशी वा जे कोणी असतील त्यांना संस्थेकडे मूल सोपविल्यावर त्यांच्याबाबतीत योग्य गोष्टी घडतील याची संस्थेला खात्री करून द्यावी लागते. यानंतर पोलिसांच्या परवानगीने मुलांची संस्थेमध्ये नोंदणी केली जाते. पोलिसांना मुलांबाबत खात्री करून देणे ही एक जबाबदारीच असते. पोलिसांकडूनही संस्थेकडे अशी मुलं सुपूर्द केल्याच्या काही घटना आहेत.

टिटवाळा गणपती मंदिरापासून साधारण दोन किमी अंतरावर म्हसकळ नावाचे गाव आहे. येथील पातकर यांच्या फार्महाऊसमध्ये या बेघर मुलांसाठी सुविधा उभ्या करण्यात आल्या आहेत.  पूर्वी मुली व मुलांसाठी ही एकच जागा होती मात्र आता ठाण्यातील वाघबीळ येथे फक्त मुलींसाठी वेगळी सोय करण्यात आली आहे. ही जागा गद्रे यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ संस्थेला वापरायला दिलेली आहे. अडीच ते अठरा या वयोगटातील मुले संस्थेत दाखल होतात. यात त्यांचा शिक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यात संस्था आग्रहही असते. सध्या या दोन्ही ठिकाणची मुलं जवळच्या शाळांमधून शिक्षण घेत आहेत.

शिक्षण आणि दैनंदिन जीवनमान यासाठी एका मुलाचा वार्षिक खर्च साधारण 40 हजार रुपये असतो. या खर्चासाठी पैसा उभं करणं ही खरंतर प्रत्येक स्वयंसेवी संस्थेची धडपड असते. या संस्थेने सुरुवातीला दारोदार जाऊन देणग्या गोळा करून निधी उभा केला आहे.  मात्र संस्थेच्या कार्याचा परिचय जसा होत आहे तसतसा देणग्यांचा ओघही वाढत आहे. कपडे, धान्य, साबण, वहय़ा, पुस्तके अशा अनेक वस्तू देणगी रूपात संस्थेला लाभतात. अनेक लोक s संस्थेला भेट देतात आणि जोडले जातात.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वाढलेल्या या मुलांच्यां आरोग्याची संस्थेतर्फे वेळोवेळी देखभाल घेतली जाते. मुलांचे आजार, त्यांचे लसीकरण यासाठी वैद्यकीय मदत घेतली जाते. यात काही डॉक्टर्स निःशुल्क किंवा अत्यल्प शुल्क सेवा देतात. या मुलांमध्ये कुपोषणाची समस्याही तितकीच दिसून येते. अशा काही समस्यांचे निवारण करण्यासाठी एक स्थानिक लोकांची समिती केलेली आहे.

टिटवाळय़ाला प्रज्ञा ताम्हणकर यांनी या मुलांचे मातृत्व स्वीकारून त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी घेतली आहे. सेवाभावी वृत्तीने त्या व त्यांचे पती या मुलांजवळ कायम राहतात. त्यांच्या मदतीस पाटील कुटुंबीय आहेत. ठाण्यातील मुलींची जबाबदारी सांभाळणाऱ्या दोघीदेखील तिशीतील तरुणी आहेत. भावंडे असतील तर मोठी भावंडे लहानांची काळजी घेतात. नसतील तर त्यांच्यातीलच मोठी मुले छोटय़ांना ताई-दादा होऊन सांभाळतात. प्रातःकालीन प्रार्थनेने यांचा दिवस सुरू होतो. त्यांच्या आचारविचारांवरून ही मुले एवढय़ा प्रतिकूल परिस्थितीतून आलेली आहेत याची आपल्याला कल्पनाही येणार नाही. त्यांच्यासाठी काही छंदवर्ग घ्यावेत यासाठीही संस्थेचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.

या मुलांना किती वर्षे वयापर्यंत तुम्ही शिकवणार, सांभाळणार असा प्रश्न विचारला असता जयश्रीताई म्हणाल्या, त्यांना जेवढे शिकायचे आहे तेवढे शिकू द्यावे असे आम्हाला वाटते. एका मुलीचे तर आम्ही लग्नही लावून दिले आहे. आई-वडील जसे आपल्या मुलांना हवे तेवढे शिकू देतात तसेच यांनाही शिकू द्यावे हा विचार तर उत्तमच आहे. मग नवीन मुलांना जागा कशी होणार?

अधिकाधिक मुलांना मातृछाया घरकुलामध्ये सामावता यावे यासाठी स्वतःची जागा घेऊन त्यावर मुलांच्या दृष्टीने सोयीचे होईल असे बांधकाम करावे असा भविष्याचा विचारही संस्थेने केला आहे. चांगल्या कामासाठी चांगली माणसे आपणहून पुढे येतात. हा अनुभव संस्था घेतच आहे. या मुलांची काळजी घ्यायला माणसांची चणचण कधी भासली नाही. जनाधाराबद्दलचा संस्थेचा लोकांचा विश्वास असाच सार्थ ठरावा आणि अधिकाधिक लोकांनी या संस्थेशी जोडले जावे.

आपली प्रतिक्रिया द्या