अनुबंध- जॉय ऑफ स्मॉल थिंग्स

>>आराधना कुलकर्णी

सकाळची थंडी, थोडेसे धुके. स्वेटर-शालीत लपेटलेले ते वयस्कर जोडपे हातात हात घालून फिरायला निघाले आहे. कोणी कोणाचा हात धरला आहे हे कळत नाही. दोघांनाही आधाराची, सोबतीची गरज आहेच हे त्यांच्या पांढऱयाशुभ्र केसांवरून आणि चालीवरून कळत असतं.

मध्येच नवीनच उघडलेला गुळाच्या चहाचा स्टॉल दिसतो. गुळाचा चहा पिऊन बघावा का? दोघांच्या मनात एकदमच इच्छा निर्माण होते. पण एकाला डायबिटिस. त्यामुळे नकोच! पण चहाचा दरवळ मोहात टाकतो. घेऊन तर पाहू थोडा थोडा… असे म्हणत दोघे थांबतात. मग एक-एक चहा मागवला जातो. आलं, गवती चहा आणि गूळ यांचं फर्मास कॉम्बिनेशन! पहिल्याच घोटात शरीरभर तरतरीचा तरंग फिरतो. मग अजून घ्यावा थोडा असं वाटतं, पण नको… दोन-दोन कप… नको… डायबिटिस! तरी पण थोडासा घ्यायला हरकत नसावी… साखरेपेक्षा गूळ बराच म्हणायचा…! मग असं करू या… दोघांत अजून एकच घेऊ असा मधला मार्ग निघतो. चहावाला ते ऐकत असतो. मग तो गोड हसत दोघांच्या कपात अर्धा अर्धा चहा टाकतो. दुक्कल दीड कप चहाने समाधान पावत पुढे चालू लागते. त्यांचं नेहमी असंच होतं. भेळ, वडापाव, चहा, कॉफी… जे काही घ्यायचं असतं ते एक-एक पुरत नाही आणि दोनöदोन जात नाही किंवा सहनही होत नाही. म्हणून ‘तिसरा’ त्यांच्यात येतोच, पण ‘तो तिसरा’ दोघांचा आनंद द्विगुणित करणारा असतो.

छान थंडीचे दिवस सुरू झाले आहेत. म्हटलं, करू या की सेलिब्रेशन! साजरं कसं करावं? हा प्रश्न होता. मित्र-मैत्रिणी, नातलग सगळेच जण दूर. मग आपला आपणच साजरा करायचा असं ठरतं. नुसती भटकंती करत नुसतंच फिरू या असंही ठरलं, पण तेही नेहमीच्या रस्त्याने नको, नवीनच भागात जावं. मग तसं फिरणं सुरू होतं. अचानक समोर येतो निवांत रस्ता, दुतर्फा गर्द झाडी आणि रस्त्याच्या शेवटी आडवी टेकडी. वर जायचं का? नको… अंधार पडत आहे. शिवाय गुडघेही दुखणार. सगळंच कसं असुरक्षित! नकोच त्यापेक्षा. मग पुन्हा मधला मार्ग. थोडंसंच जाऊ या वर. म्हणजे अगदीच काही मन खट्टू व्हायला नको. मग अर्धी टेकडी चढायची, तिथंच कुठेतरी बसायचं, वर जाणाऱया आणि वरून येणाऱयाकडे बघत बसायचं. पुन्हा खाली उतरायचं. पायथ्याशीच दोन-चार चकरा आणि काही वेळ नुसतेच बसणे.

मग घराकडे परत. परतीच्या वाटेवर ‘गोल्डन इराणी चहा’चा आमंत्रण देणारा मोठा बोर्ड. एक बन मस्कावर एक इराणी चहा फ्री. किती काळ लोटला इराणी चहा घेऊन! पण पुन्हा तोच प्रश्न. चहा, साखर, डायबिटिस… काय करावं? पण मग दोन बन मस्कावर दोन चहा घेतले. चहा अप्रतिम. त्यामुळे एकाने समाधान होत नाही. मग पुन्हा दोघांत तिसरा, दोघांत अर्धा अर्धा, पण त्यापुढचा बन मस्का काही दोघांत संपत नाही. मग तो तिथल्या टिश्यू पेपरमध्ये बसून पर्समधून घरात लहानग्या नातवासाठी आणला जातो. तो तर कसला खुश! त्यामुळे हेही डबल खुश! ना कसले प्लॅनिंग ना कसली चर्चा. झालेच की सेलिब्रेशन! सेलिब्रेशन असं नेमकं काय असतं? आनंदच घ्यायचा असतो. सहजतेने अचानक भेटलेला आनंद मनाला अधिक भावतो. आनंदाची ही नॉनप्लॅन स्कीम! खर्चही थोडा, वेळही थोडा, आनंद मात्र मोठाच… न मोजता येण्यासारखा!

असे अनेक छोटे छोटे प्रसंग जीवनात आनंद घेऊन येतात. कधी अचानक येणारा आवडता पाहुणा, कधी अनपेक्षित होणारी जुन्या मित्र-मैत्रिणीची भेट, कधी कधी अनोळखी माणसांशी झालेली ओळख व त्यातून जुन्या ओळखीचे सापडणारे धागे, घरातच रंगलेल्या जिव्हाळ्याच्या गप्पा, अचानक घडलेली सहल, विनासायास हातात आलेले चांगले पुस्तक, अचानक आलेली हलकीशी पावसाची सर…मातीचा सुगंध… आनंद मिळवायला हे पुरेसं नाही का?
किती पैसे खर्च करावे लागतात या गोष्टींसाठी?
पैशांचा आणि आनंदाचा काहीतरी संबंध आहे का? तसं असतं तर लेकरं तोंड भरून हसताना दिसली तरी असती का? त्यांना तर पैसा म्हणजे काय हेच माहिती नसतं.

खरंच, आनंद नेमका कशात असतो? पैशात, वस्तूत की मनात?
खरं तर याचे उत्तर ज्याच्या त्याच्या वृत्तीत आहे, पण मनात आणि अर्धे अर्धे वाटून घेण्यात तर तो नक्कीच आहे.

[email protected]