
>> दिलीप ठाकूर
दैनंदिन मालिकेत दररोज दिसत असलेला आणि काैटुंबिक मालिकेतील व्यक्तिरेखेमुळे आपल्या जणू घरातीलच झालेल्या कलाकाराच्या निधनाचे वृत्त पचवणे सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी अवघड असते. अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने काहीसे तसेच झाले. एका मनोरंजन उपग्रह वाहिनीवर ‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेतील पूर्णा आजी या भूमिकेतून त्या घराघरात पोहोचल्या होत्या. आणि अचानक 16 ऑगस्ट रोजी त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मराठी मनोरंजन क्षेत्राप्रमाणेच रसिक प्रेक्षकही हळहळले. अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही त्यांची कन्या. पौर्णिमा हीदेखील एक कन्या त्यांना आहे. साधारण पन्नास-बावन्न वर्षांपूर्वी अतिशय योगायोगानेच अमिताभ बच्चन व जया भादुरी यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘एक नजर’ या चित्रपटातील छोटय़ाशा भूमिकेतून ज्योती चांदेकर यांच्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात झाली. खरं तर त्या आपल्या वडिलांसोबत मुंबई उपनगरातील एका चित्रपट स्टुडिओत चित्रीकरण पाहण्यास गेल्या होत्या. त्या वेळी दिग्दर्शक बी. आर. इशारा यांनी त्यांना काही ओळी वाचायला दिल्या. ते त्यांचे तरुण वय होते. त्यांनी त्या ओळी अतिशय व्यवस्थित वाचल्यावर दिग्दर्शकांनी सांगितले, या मुलीला मेकअपसाठी न्या. अशा पद्धतीने ज्योती चांदेकर चित्रपटसृष्टीत आल्याचा किस्सा प्रसिद्ध आहे. या चित्रपटाला फारसे यश प्राप्त झाले नसले तरी ज्योती चांदेकर यांचा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर त्यांनी अनंत ओक दिग्दर्शित ‘सुंदर मी होणार’ या नाटकात भूमिका साकारली. नाटय़संपदा या ख्यातनाम नाटय़ संस्थेच्या प्रभाकर पणशीकर यांच्या ‘बेइमान’ या नाटकातून त्या व्यावसायिक रंगभूमीवर आल्या. सत्तरच्या दशकात हे घडले. याच नाटकात प्रमुख भूमिकेत असलेल्या प्रभाकर पणशीकर यांनी त्यांना शाबासकीची थाप दिली. ज्योती चांदेकर यांची अभिनय क्षेत्रातील वाटचाल आता मार्गी लागली. बाबूराव गोखले यांच्या ‘वऱ्हाडी माणसं’, ‘स्वयंसिद्धा’, ‘प्रेमा तुझा रंग कसा?’ याप्रमाणेच ‘करायला गेलो एक’, ‘माझं घर’, ‘कथा अकलेच्या कांद्याची’ अशा नाटकांतून घोडदौड सुरू झाली. मुंबईतील प्रयोगांसह राज्यातील विविध भागांतून नाटकाचे दौरे होत. भिन्न पठडीतील व बराच अनुभव असलेल्या कलाकारांचा लाभणारा सहभाग बरेच नवीन काही शिकवणारा आणि नाटय़ माध्यम व व्यवसाय याकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन देणारा असतो. त्यांनी विविध धाटणीतील ‘रखेली’, ‘मिसेस आमदार सौभाग्यवती’, ‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘मित्र’ अशा नाटकांतून भूमिका साकारत आपल्या अभिनयातील अष्टपैलुत्वाची जाणीव करून दिली. ‘राजकारण गेलं चुलीत’ या नाटकात अरुण सरनाईक व निळू फुले अशा दिग्गजांसोबत काम करण्याची मिळालेली संधी त्यांना अभिनय व नाटय़ माध्यम याबाबत बरेच काही देणारी ठरली. याच वाटचालीत त्यांना ‘हू इज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वूल्फ’ या विदेशी नाटकावर आधारित थिएटर अकॅडमीने मराठीत सादर केलेल्या ‘उत्तररात्र’ या नाटकात मिळालेली भूमिका गाजली. मूळ नाटकात एलिझाबेथ टेलर यांनी साकारलेल्या आणि गाजलेल्या ‘मार्या’ या गुंतागुंतीच्या व्यक्तिरेखेत ज्योती चांदेकर यांनी अधिक रंग भरले आणि समीक्षक व रसिक प्रेक्षक यांची वाहवा मिळवली. त्यांचा विवाह रणजीत पंडित यांच्याशी झाला होता. चित्रपटातील त्यांची वाटचाल अशीच लक्षवेधक. संजय सूरकर दिग्दर्शित ‘सुखान्त’ या इच्छामरणावर आधारित चित्रपटापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यानंतर त्यांनी ‘संसार’, ‘बिनधास्त’, ‘कथा दोन गणपतरावांची’, ‘पाऊलवाट’, ‘गुरू’, ‘दमलेल्या बाबाची कहाणी’, ‘ढोलकी’, ‘तिचा उंबरठा’, ‘सांजपर्व’, ‘सलाम’ अशा अनेक चित्रपटांतून भूमिका साकारल्या. अनंत महादेवन दिग्दर्शित ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटातील त्यांची मध्यवर्ती भूमिका विशेष गाजली. दूरचित्रवाणी मालिकेतही त्यांनी उत्तम वाटचाल केली. ‘बाजीराव मस्तानी’, ‘छत्रीवाली’, ‘तू सौभाग्यवती हो’ अशा अनेक मालिकांमधून त्यांनी भूमिका साकारल्या. त्यांचा जन्म 31 ऑगस्ट 1956 रोजीचा रत्नागिरीचा. त्यांचे शिक्षण पुण्यात झाले. मुंबईत राहण्याची सोय नसल्यामुळे नाटय़ निर्मात्यांना त्यांना नाटकात घेणं काही काळ अडचणीचं ठरलं. म्हणून त्यांनी पुण्यातील नाटय़ संस्थेच्या नाटकांतून भूमिका साकारल्या. आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन, देखणं ठसठशीत व्यक्तिमत्त्व, भेदक डोळे आणि करारी आवाज या गुणांवर त्यांनी आपला मार्ग काढला. तेजस्विनी पंडित हीदेखील एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे. आई-मुलगी या जोडगोळीने 2015 मध्ये ‘तिचा उंबरठा’ या पुरस्कारप्राप्त चित्रपटात काम केले. या चित्रपटात ज्योती चांदेकर यांनी तेजस्विनीच्या सासूची भूमिका साकारली होती. या दोघींना 2015 च्या झी गौरव पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. तेजस्विनी पंडित हिच्यासोबत त्यांनी ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटात भूमिका केली. या चित्रपटात दोघींनीही सिंधुताईंच्या जीवनातील वेगवेगळ्या वयाचे व टप्प्यांचे चित्रण साकारले होते. ज्योती चांदेकर यांना अ. भा. मराठी नाटय़ परिषदेच्या पुणे शाखेतर्फे जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. ज्योती चांदेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने अनेक जण हळहळले. आपल्या अनेक प्रकारच्या भूमिकांमुळे रसिक प्रेक्षक व मनोरंजन क्षेत्र ज्योती चांदोरकर यांना कायम स्मरणात ठेवेल.