ठसा – कमल शेडगे

1196

>> प्रशांत गौतम

अक्षरसम्राट कमल शेडगे नुकतेच आपली अक्षरमुद्रा मागे ठेवून चिरंतनाच्या प्रवासास गेले. मराठी सुलेखन क्षेत्रातील ते तपस्वी तर होतेच; नाटय़ सुलेखनातही त्यांची प्रदीर्घ काळ तपश्चर्या होती. तब्बल सहा दशकांहून अधिक काळ असलेला हा अक्षरप्रवास मुंबईत 85व्या वर्षी थांबला. खरे तर कमल शेडगे यांना अक्षरलेखनासाठी व्यावसायिक प्रशिक्षण घेण्याची गरज भासली नाही. कारण या व्यवसायाचे बाळकडू त्यांना वडिलांकडूनच मिळत गेले. त्यावर त्यांनी आपले कार्यकौशल्य सिद्ध केले. शेडगे यांचे शालेय शिक्षण गिरगावातील ओरिएंटल हायस्कूलमध्ये झाले. टाइम्स ऑफ इंडियात त्यांचे वडील विविध नियतकालिकांची शीर्षके बनविण्याचे काम करीत असत. शेडगे यांना मुळात चित्रकार बनण्याची आवड होती. त्यांच्या वडिलांनी नेमका हा गुण हेरला. वडिलांची पेरणा मिळाल्याने शेडगे यांनी टाइम्सच्या कला विभागातून आपल्या अक्षरलेखन कार्याचा श्रीगणेशा केला. 1962 साली प्रा. वसंत कानेटकर यांच्या ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाच्या अक्षरलेखनाच्या निमित्ताने नाटय़सृष्टीत पाऊल टाकले. पुण्या-मुंबईकडील वृत्तपत्रांत रविवारी अनेक नाटकांच्या जाहिराती प्रकाशित होत असत. त्यातील नाटकांच्या जाहिरातींची पाने शेडगे यांच्या सुलेखनाने सजलेली असायची.

ललना, अनुराधा, श्यामसुंदर, रसरंग, कालनिर्णय दिनदर्शिका, अक्षर, माहेर, किर्लोस्कर, चंदेरी या नियतकालिकांचे लोगो खास शैलीतून साकारले. मोहन वाघांची छायाचित्रे आणि कमल शेडगे यांचे सुलेखन अशी एक छान मैफल जमलेली असायची. मी शिवाजीराजे बोलतोय, शिक्षणाच्या आयचा घो, काकस्पर्श, मोरया, तुकाराम अशा मराठी चित्रपटांचे लोगो शेडगे यांनी उत्तम साकार केले. कमल शेडगे यांनी आपल्या अक्षरप्रवासाविषयी अनेक पुस्तकांत विस्ताराने लिहिले आहे. अक्षरगाथा हे त्यांचे पहिले पुस्तक; त्यानंतर चित्राक्षरे, कमलाक्षरे, ऐसी अक्षरे रसिके ही चार पुस्तके आली. पाचव्या पुस्तकाचे काम अपूर्ण असताना त्यांनी अक्षरविराम घेतला. कलागुणांचा वारसा त्यांनी आपल्या वडिलांकडून घेतला आणि मुलगा अक्षर याच्याकडे सोपवला.

आपली प्रतिक्रिया द्या