पक्षीराज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विद्या कुलकर्णी,   [email protected]

मत्स्य गरुड. श्रीविष्णू क्षीरसागरात पहुडलेले असल्याने पक्षी राजाचे वास्तव्यही समुद्राजवळच. त्यामुळेच मत्स्याहार विशेष प्रिय.

नेहमीच्या उत्साहाने आम्ही ताडोबा जंगलात सफारीतून निघालो. आदल्या रात्रीच प्रचंड विजा चमकून पावसाने थैमान घातले होते, त्यामुळे आम्ही थोडे साशंकच होतो. अपेक्षेप्रमाणे सगळे वाघोबा दडून बसले होते. मी माझ्याच विचाराच्या नादात तलावाकडे पाहिले आणि काय आश्चर्य समोरच उंच झाडावर एक पक्षी ध्यानस्थ अवस्थेमध्ये बसलेला दिसला. माझ्या सहकाऱ्याने लगेचच ओळखले. तो पक्षी करड्या डोक्याचा मत्स्यगरुड होता.

आपल्या पुराणात गरुडाला महत्त्वाचे स्थान आहे. प्रत्यक्ष श्री विष्णूने ज्याला आपले वाहन म्हणून मान दिला त्याबद्दल आपण काय बोलावे? रूपाने, गुणाने सर्वार्थाने श्रेष्ठ असा हा पक्षी! अतिशय चतुर पक्षी असल्यामुळे राजे महाराजे त्यांचा उपयोग हरवलेल्या लढवय्यांना शोधण्यासाठी करत. गरुड हा अमेरिका देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे. गरुड पक्ष्याच्या बऱ्याच उपजाती आहेत. त्यात तुरेवाला सर्प गरुड, काळा गरुड, सोनेरी गरुड, हार्पी गरुड, सपर्ण, टकला गरुड, मत्स्यगरुड, करड्या डोक्याचा मत्स्यगरुड,  आफ्रिकी मत्स्यगरुड, समुद्र गरुड, नेपाळी गरुड, ठिपक्यांचा पाणगरुड, पहाडी गरुड, पांढऱ्या शेपटीचा गरुड असे आहेत. गरुडाची नजर खूपच तीक्ष्ण असून डोक्याच्या मानाने डोळे खूपच मोठे असतात. त्यांची ही दृष्टी माणसांच्या चौपट तीक्ष्ण असते.  गरुडाच्या डोळय़ांची बाहुली खूप मोठी असल्यामुळे बाहेरून येणाऱ्या प्रकाशाचे कमीत कमी विवर्तन त्यांना त्यांचे भक्ष्य खूप दुरूनही दिसते.

करड्या डोक्याचा मत्स्यगरुड

लहान ते मध्यम आकाराचे, अवजड पण पिळदार यष्टी असलेले हे मासे खाणारे शिकारी पक्षी आहेत. नर राखाडी तपकिरी रंगाचा असून त्यांचे डोके लहान व फिक्कट राखाडी असते. त्यांचे डोळे फिक्कट राखाडी-पिवळे असतात. त्यांची चोच छोटी, मान लांब, आणि शेपटी गोलाकार असते. पाय आकाराने लहान व रंगाने फिक्कट पांढरे असतात परंतु फांदीवर पकड घट्ट असते. पंखही फार लांब नसतात, त्याची टोके शेपटीपर्यंत पोचत नाहीत. छाती व मान तपकिरी रंगाची असते. पंखांमध्ये तपकिरी काळ्या रंगांचे मिश्रण असते. पंखांचा पिसारा 155 ते 170 से.मी. असतो. या पक्ष्यांची लांबी 61 ते 75 से.मी.दरम्यान असते. मादीचे वजन 2.3 ते 2.7 किलो तर नराचे 1.6 किलो असते. मादी नरापेक्षा आकाराने मोठी असते. शेपटीचे माप 23–28 से.मी. आणि शेपटीची जाडी 8.5–10 से.मी. असते.

या पक्ष्यांचे वास्तव्य हिंदुस्थान आणि दक्षिण-पूर्व आशिया, मलेशिया, पश्चिम इंडोनेशिया आणि फिलिपिन्स येथे सापडते. हिंदुस्थानात उत्तर आणि पूर्व भागात, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार आणि आसाममध्ये हे पक्षी आढळतात. हे पक्षी समुद्रपातळीपासून 1500 मीटर उंचीपर्यंतच वास्तव्य करतात. ते त्यांची घरटी ‘नद्या, तलाव, जलाशय, दलदल’ मुख्यत्वे पाण्याजवळच बांधतात. मासे पकडण्यासाठी झेप घेतात. त्यांची झेप मात्र अतिशय वेगवान व पंख पूर्ण पसरून असते. क्वचित प्रसंगी मत्स्यगरुडाने छोटय़ा जनावरांचीही शिकार केल्याचा उल्लेख आहे. हे पक्षी पाण्यावरचे किंवा थोडे खोलवर असणारे मासे/साप पकडू शकतात. हे पक्षी मेलेले मासे पण खातात. हे पक्षी स्थलांतरित नाहीत.

या पक्ष्यांचा प्रजननाचा काळ प्रत्येक देशात वेगवेगळा असतो. हिंदुस्थानात नोव्हेंबर ते जानेवारी महिन्याच्या दरम्यान असतो. या पक्ष्यांचे घरटे प्रचंडच मोठे असते. 1.5×2 मीटर्स एवढा त्याचा आकार असतो. घरटे काठय़ा काटक्यांपासून बनवलेले असते. त्यांचे घरटे मोठय़ा झाडाच्या शेंड्यांवरती, सवंगड्यांच्या घरटय़ाच्या आजूबाजूला बांधलेले असते. हे पक्षी बहुतेक वेळा पांढरी शुभ्र दोन अंडी घालतात व नर मादी दोघेही मिळून उबवण्याचे काम करतात. अंडी उबवण्यास 45 ते 50 दिवस लागतात, पिल्ले मात्र 70 दिवसांनी उडू लागतात. मत्स्यगरुड 5–6 वेळा साद घालतात. त्याचे शाब्दिक वर्णन करायचे झाले तर ‘अहि-अहहर आणि ची-वारने’ व शीळ ‘ओउलीश ओ-वोक, ओ-वॉक, ओ-वोक’ अशी असते. सुरुवात मधुर गोड आवाजात होते व नंतर मात्र खूपच कर्कश्य होते. प्रजननाच्या दिवसात खूपच मोठय़ाने शीळ ऐकू येते. अगदी रात्रीसुद्धा ते शीळ घालताना आढळतात.

सहजच ओठावर शब्द येतात…

“असे तुला विष्णूच्या वाहनाचा मान, सार्थ ठरवी तुझे रूप महान,

पसरत भव्य पर तुझे आसमान, जाहले तुज समोर सर्व भक्ष्य लहान !!’’

अशा या दुर्मिळ पक्ष्याचे फोटो मिळाल्यामुळे माझी ‘ताडोबा जंगल’ सफारी सफल झाली.