मुद्दा – बाप्पा, आम्हाला कोकणात जाऊ दे!

496

>> >> प्रज्ञा गावडे

कोकणातील गणेशोत्सव हा चाकरमान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न! अनेक वर्षांची परंपरा लाभलेला सण. भक्तिभावाने साजरा करण्यासाठी वर्षभर मुंबईत राबणारा कोकणी माणूस न चुकता गणपतीला गावी जातो, पण या वर्षी ही परंपरा खंडित होते की काय अशा चिंतेत तो सापडला आहे. प्रवासाचे, तिकिटांचे, रजेचे आणि आर्थिक नियोजन कसे करायचे या विवंचनेने कोकणी चाकरमानी हैराण झाला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाबद्दल रोज वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. सूचनांबरोबर सरकारचे निर्देश निघत आहेत. जिल्हाधिकाऱ्य़ांच्या परिपत्रकांबरोबरच ग्रामपंचायत आणि सरपंच, ग्रामसभेने घेतलेल्या ठरावांचे मेसेज व्हॉटस्ऍपवर फिरत आहेत. अर्थात त्यामुळे सामान्य कोकणी माणसाचा संभ्रम वाढला आहे. राज्य सरकारने आता गणपतीसाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्य़ा कोकणवासीयांसाठी प्रवासाबाबत आणि इतर काही निर्णय घेतले आहेत.
त्यामुळे परिस्थितीत सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यांतील ग्रामपंचायती आणि सरपंच मात्र फुल फॉर्मात आहेत. मिळालेल्या अधिकाराच्या जोरावर ग्रामसभेत ठराव संमत करून पत्रके काढत आहेत. अशी तत्परता त्यांनी कोकणच्या विकासासाठी दाखवली तर बरे होईल, अशी भावना चाकरमानी व्यक्त करीत आहेत.

आधीच कोरोनाने हैराण झालेल्या चाकरमान्यांचे एवढेच माफक म्हणणे आहे की, गणेशोत्सवासाठी गावी जाण्यासंदर्भात  कोणतेही अडथळे येऊ नयेत. कोरोनाचे रामायण आता मावळतीला चालले आहे. मुंबईत कोरोना नियंत्रणात आला आहे. पण गणेशोत्सवाला गावी जाणाऱ्य़ा चाकरमान्यांबाबत ‘महाभारत’ घडू नये यासाठी स्थानिक प्रशासनाने योग्य ते निर्णय लवकरात लवकर घ्यावेत. आजघडीला तरी स्थानिक प्रशासनाने काढलेल्या एकतर्फी पत्रकांमध्ये किंवा घेतलेल्या निर्णयांमध्ये चाकरमान्यांचा कुठल्याही अंगाने विचार करण्यात आलेला दिसत नाही. तो कुठल्याही निर्णय प्रक्रियेत नाही. आता प्रशासनानेच श्रीकृष्ण होऊन चाकरमान्यांच्या शंकांचे व प्रश्नांचे निरसन करून त्याला संभ्रमातून बाहेर काढावे, अशी अपेक्षा तो व्यक्त करीत आहे.

गणेशोत्सवाला गावी जाणाऱ्य़ांसाठी प्रशासन क्वारंटाइन किती दिवस करणार? प्रशासनाचे म्हणणे आहे की दहा दिवस क्वारंटाइन करणार, तर सरपंच म्हणतात, 14 दिवस क्वारंटाइन व्हावे लागेल. यात अजून सात दिवस होम क्वारंटाइन असणार का? म्हणजे ज्यांची घरे बंद आहेत, त्यांना कमीत कमी गणेश चतुर्थीच्या 18 दिवसांपूर्वी जाणे भाग होते. त्यासाठी त्याला आणि कुटुंबाला एका महिन्याची सुट्टी काढावी लागली असती. आज नोकरकपात होत आहे, पगार कापले जात आहेत. अशा स्थितीत 14 दिवसांचे क्वारंटाइन परवडणारे नव्हते.  सुदैवाने सरकारने दहा दिवसांचे क्वारंटाइन  केल्याने काही प्रमाणात फायदा होईल.

गणेशोत्सवासाठी गावी जायला रेल्वे सोडणार का? परिवहन महामंडळ किती गाडय़ा सोडणार? प्रायव्हेट लक्झरी बसच्या तिकिटांचा दर आता अडीच ते तीन हजार रुपये आहे. तो चार हजारांपर्यंत नक्कीच जाईल. गणेशोत्सवासाठी गावी जायचे म्हटले तर दोन माणसांच्या कुटुंबाला एकंदरीत कमीत कमी 20 ते 30 हजार रुपये खर्च येणार आहे. बरं, प्रवासाची तिकिटे सहजासहजी मिळणे शक्य नाही. एवढं करून तिथे जायचे आणि घरात कोंडून घ्यायचे. तुम्ही इतरांच्या घरी जाऊ शकणार नाहीत. इतर तुमच्या घरी येणार नाहीत. वर ग्रामपंचायतीने ग्रामसभेत मंजूर करून घेतलेल्या ठरावाची टांगती तलवार असणारच आहे. तरीदेखील कोकणी चाकरमानी गावी जाण्यासाठी आस लावून बसला आहे. विघ्नहर्त्या गजानना, येणारी सगळी विघ्नं दूर कर आणि आम्हाला गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ दे, अशी प्रार्थना तो करीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या