लेख – हायवे आणि रेल्वेतील स्पर्धेमुळे पर्यटनात वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विश्वास सुरेंद्र मुळीक

कोणतीही स्पर्धा असो, अशा स्पर्धेमुळे सर्वांनाच त्याचा फायदा होत असतो. मग ते ऑलिम्पिक असो किंवा आशियाई स्पर्धा. त्याचा फायदा आपसूकच अनेकांना होत असतो. अशीच स्पर्धा सध्या कोकणात सुरू झाली आहे आणि तीही कोकण रेल्वे आणि हायवे या दोन विभागांत. तसे पाहिले तर कोकणात येण्यासाठी अनेक कंपन्यांत स्पर्धा सुरू झाल्या आहेत. याचे कारणही स्पष्ट आहे की, देशाचा आणि महाराष्ट्राचा विकासाचा पुढील टप्पा कोकण आहे. त्यामुळेच कोकणात येण्यासाठी सारे दरवाजे सरकारने खुले करण्याचे  ठरविले आहे. त्याचाच एक भाग म्हणजेच मुंबई-गोवा महामार्ग आणि या सर्वांचा फायदा पर्यटन वाढीसाठी होणार आहे.

अनेक वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा एनएच 66 महामार्गाला केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी चालना दिली आहे. त्यामुळेच या महामार्गाचे काम वेगाने होत आहे. केवळ आरवली -लांजा वगळता सर्वच ठिकाणी महामार्गाची कामे वेगाने होत असताना दिसत आहेत. पर्यटनाचा विशेष दर्जा असलेल्या सिंधुदुर्ग जिह्यात जवळपास सारी कामे पूर्णच झालेली दिसत आहेत. या महामार्गावरील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे कशेडी घाट. कशेडी घाटाला 2 कि.मी. लांबीची दोन भुयारे पाडण्यात येणार आहेत. त्यातील एका भुयाराचे काम पूर्ण झाले असून दुसऱया भुयाराचेही काम लवकरच पूर्ण होत आहे. सध्या कशेडी घाट पार करण्यास 30 ते 40 मिनिटे लागतात तसेच पावसाळ्यात दरड कोसळत असल्याने अनेक वेळा वाहतूकही थांबवली जाते. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात, पण लवकरच दोन भुयारे पूर्ण झाल्यानंतर हे अंतर केवळ 10 मिनिटांत पार केले जाईल तसेच प्रवास वेगाने आणि सुरक्षित होईल. या महामार्गावर अनेक वर्षे मी प्रवास करीत आहे. स्वतः ड्राइव्ह करत असताना सुरुवातीच्या काळात अनेक अडचणी येत असत.

एकच मार्ग असल्याने समोरून येणाऱया वाहनांवर बारकाईने लक्ष ठेवणे, ओव्हरटेक करतानाही फारच काळजी घ्यावी लागत असे. त्यामुळे मुंबई ते सावंतवाडी या प्रवासाला तब्बल 12 ते 14 तास लागत असत, पण चौपदरी महामार्गाचे काम सुरू झाल्यापासून या वेळेत हळूहळू बचत होत गेली व आज दहा तासांत सावंतवाडीत पोहोचता येते. केवळ कर्नाळ्यापासून वडखळ मार्गावरील पुलाचे काम पूर्ण झाल्यानेच तब्बल चार तासांची बचत झाली. वडखळच्या वाहतूककोंडीवर बायपास हा उपाय केल्यानेच केवळ चाकरमानी म्हणण्यापेक्षा पर्यटकांची मोठय़ा प्रमाणात सुटका झाली. ‘येवा, कोकण आपलोच आसा’ अशी कोकणच्या जनतेने जवळपास पंचवीस वर्षांपूर्वी देशभरातील पर्यंटकांना साद घातली होती, पण दळणवळणाचीच सोय नसल्याने पर्यटक रायगड जिह्यातील अलिबागपर्यंत जेमतेम पोहोचत होते, परंतु मागील पाचसहा वर्षांत कोकणने कूस बदलत विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यास सुरुवात केली आहे.

‘ग्रामीण विकास’ या विषयातून एम. फिल. आणि पीएचडीचा अभ्यास आणि संशोधन करण्यासाठी 2014 पासून मी सिंधुदुर्ग जिह्यात आणि पर्यायाने कोकणात फिरत आहे. त्यामुळेच पायाभूत सुविधांचा विकास किती वेगाने होत आहे हे प्रत्यक्ष दिसत आहे. केवळ कर्नाळा आणि वडखळ येथील वाहतूककोंडीचा प्रश्न निकालात निघाल्याने चार तासांचा फरक पडला तर विचार करा, उद्या इंदापूर बायपास,  माणगाव बायपास,  कशेडी घाटातील भुयार,  राजापूर येथील अर्जुना नदीवरील पूल, प्रत्येक शहरात उभारले जाणारे पूल आणि महत्त्वाचे म्हणजे रस्त्यावरील काढलेली धोकादायक वळणे यामुळे आणखी चार ते पाच तास वाचतील. म्हणजेच पनवेल ते सावंतवाडी,  गोवा सीमेपर्यंत जाण्यास अवघे सहा ते सात तास लागतील असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही.

पनवेल-गोवा महामार्गाचा हा सारा आराखडा कोकण रेल्वे महामंडळाला माहीत असावा आणि म्हणूनच या स्पर्धेत टिकायचे असेल तर आपल्या मार्गाचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरण केल्याशिवाय पर्याय नाही याची जाणीव झाल्यानेच कोकण रेल्वेनेही आपल्या मार्गाचे पॅच दुपदरीकरण आणि विद्युतीकरण करण्याची घोषणा केली. आणि नुसतीच घोषणा करून कोकण रेल्वे थांबली नाही, त्यांनी संपूर्ण मार्गांवर विद्युतीकरण केले. इतकेच नव्हे तर, महाडपर्यंत मार्गाचे दुपदरीकरण करून वाहतूकही सुरू केली. अनेक ठिकाणी नवीन स्थानके निर्माण केली. त्यामुळे क्रॉसिंगसाठी रेल्वे अधिक काळ थांबत नाही. परिणामी पर्यटकांची पसंतीची असलेल्या 10111 कोकण कन्या या गाडीचा प्रवासाचा एक तास कमी झाला. कोकण रेल्वेचे दुपदरीकरणाचे काम जेव्हा पूर्ण होईल तेव्हा सावंतवाडीपर्यंत पाच तासांत पोहोचता येईल आणि सिंधुदुर्गसहित दक्षिणेकडील राज्यांत देश आणि विदेशातील पर्यटकांचा प्रचंड ओघ असेल.

पर्यटकांच्या होणाऱया गर्दीची जाणीव शासनाला असल्याने शासनाने समुद्री महामार्गासही मंजुरी दिली. MSRDC च्या माध्यमातून ग्रीनफिल्ड कोकण एक्स्प्रेस वे तयार होत आहे. या नव्या मार्गामुळे मांडव्यापासून वेंगुर्ल्यापर्यंत सर्वच समुद्राजवळील गावांना झळाळी मिळेल. चिपीचे विमानतळ सुरू केलेच आहे, पण महाराष्ट्राच्या सीमेवर गोवा राज्यातील मोपा येथेही आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. पुढील दोन वर्षांत हेही विमानतळ पूर्ण होण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील संकेश्वर ते सिंधुदुर्ग जिह्यातील बांदा या 108 कि.मीच्या मार्गाला केंद्र सरकारने मंजुरी दिली असून या मार्गाच्या कामालाही लवकरच सुरुवात होईल. त्यामुळे सिंधुदुर्ग जिह्यातील बांदा याला वेगळेच महत्त्व प्राप्त होणार आहे. किंबहुना हे महत्त्वाचे जंक्शन असणार आहे.

 वेगवेगळ्या विभागात विकासकामांमध्ये सुरू झालेली स्पर्धा पर्यटकांना, पर्यायाने कोकणच्या स्थानिक जनतेला फायदेशीर ठरणार आहे. मोठय़ा प्रमाणात स्वयंरोजगार निर्माण होणार आहे. यासाठी विविध ठिकाणी स्थानिकांनी पर्यटन केंद्रे निर्माण करायला हवीत. गोवा आणि पुढील राज्यांत जाणाऱया पर्यटकांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात आकर्षित कसे करता येईल हे स्थानिक पर्यटक व्यावसायिकांनी पाहायला हवे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाने स्थानिक तरुणांना कृषी पर्यटन केंद्रे उभारण्यासाठी सर्वोत्तम पद्धतीने सहकार्य करण्याचे ठरविले आहे. कारण स्थानिकांना रोजगार कसा उपलब्ध होईल याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे. पर्यटन सर्वांनाच वाढवायचे आहे. पर्यटन संचालनालयाने यासाठी मोठी तयारीही केली आहे. सिंधुदुर्ग जिह्यातील निसर्गसंपदा पाहत लवकरच सिंधुदुर्ग हे देशातीलच नव्हे, तर जगातील एक महत्त्वाचे पर्यटन केंद्र होईल यात अजिबात शंका नाही. फक्त स्थानिक जनतेत सकारात्मक भावना हवी. एकदा पर्यटक स्थिरावू लागले की, या पर्यटकांबरोबर अनेक रोजगार आणि स्वयंरोजगार निर्माण होतील.