लेख : जलापत्ती

503

>> दिलीप जोशी ([email protected])

पाण्याला जीवन म्हणतात, परंतु ते मरणप्राय ठरलं तर काय घडतं याचा भीषण अनुभव सध्या महाराष्ट्र घेत आहे. पावसाचं काव्यमय कौतुक, महापुरांच्या रौद्ररूपात वाहून गेलं आहे. ‘सरसर येते क्षणात शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे’ असा श्रावणमासातला शहाणा पाऊस यंदा दिसला नाही. मुंबई आणि आसपासच्या परिसरात आणि कोकणात त्याने आधीच धुमाकूळ घातला होता. नंतर त्याची वक्रदृष्टी सांगली-कोल्हापूर आणि आजूबाजूच्या परिसराकडे वळली. सरासरीच्या कैकपट बदाबदा कोसळून त्याने दोन महानगरांसह सभोवतालच्या ग्रामीण भागाची दैना केली. पंचगंगा, कृष्णा आणि वारणा या नद्यांनी उग्ररूप धारण केलं. वाडय़ा, वस्त्या, बाजारपेठा वेगाने येणाऱ्या लोंढय़ाच्या सपाटय़ात सापडल्या. घरातून, दुकानातून, जिथे असेल तिथून बाहेर पडावं तर चहूदिशांना पाणीच पाणी. आठ-दहा फुटांच्या जलसाठय़ातून जाणार तरी कुठे? ज्यांना शक्य झालं त्यांनी तातडीने घरंदारं सोडली. अनेक जण होते तिथेच अडकले. मुक्या प्राण्यांचे हाल तर विचारायलाच नको.

पश्चिम महाराष्ट्रातल्या या दोन मोठय़ा शहरांत असं पाणी भरायला अफाट पर्जन्यवृष्टीबरोबरच कर्नाटकातलं अलमट्टी धरणही कारणीभूत ठरतं याचा अनुभव यापूर्वीही आला होता. यावेळची पूरपरिस्थिती मात्र अधिक भयावह होती. पुराचं पाणी निश्चित किती येईल याचा अंदाज येत नसल्याने सुरुवातीचा थोडा काळ अनिश्चित अवस्थेत गेला असेल. तोपर्यंत पाणी अक्राळविक्राळ रूप धारण करून शहरं, गावं गिळत सुटलं. या सगळ्याचे वृत्तांत पाहतानासुद्धा शहारा येत होता तर ज्यांना त्या दिव्यातून जावं लागलं त्यांची काय अवस्था झाली असेल!

सरकारी यंत्रणा काम करू लागेपर्यंत जलापत्ती पराकोटीला पोचलीच होती, पण मग लष्करापासून हवाई दल, नौदल आणि इतर संस्थांबरोबरच हजारो तरुण स्वयंसेवक होऊन पाण्यात उतरले. जवळपासच्या कोरडय़ा वस्त्यांत अनेकांना आश्रय मिळाला. वरच्या मजल्यावर अडकलेले परस्परांना धीर देऊ लागले. खाद्यान्नाची पाकिटं, निवारा देणाऱ्या जागा, पूरग्रस्तांसाठी जेवण आणि औषधांची सोय याला गती आली. संपूर्ण राज्यातून मदतीचा ओघ वाहू लागला. ओळखीपाळखीची नसलेली माणसं केवळ माणुसकीच्या नात्याने परस्परांना मदत करू लागली. तरी काही जणांना जीव गमवावा लागला याची वेदना आहेच.

‘धर्मेणेव प्रजा सर्वे रक्षन्ति सः परस्परम्’ असा एक संस्कृत वचनाचा भाग आहे. यातला ‘धर्म’ मानवतेचा! जेव्हा तातडीने कोणीही मदतीला येत नाही तेव्हा समूहातली माणसं परस्परांना कशी मदत करतात याचं दर्शन 26 जुलै 2005 च्या महापुरात मुंबईतही घडलं होतं. अनेक घरांमध्ये कसलाही परिचय नसलेली माणसं दोन-दोन दिवस राहिली. त्यांच्या अन्नपाण्याची सोय तिथेच झाली. आपलं सामाजिक दायित्व जनतेने उत्स्फूर्तपणे दाखवून दिलं. तसंच इथेही घडलं. त्याशिवाय विविध संस्था, राजकीय पक्ष, सरकारी यंत्रणा राबतच होती. परंतु ‘देणाऱयांचे हात हजारो’सुद्धा कमी पडावेत असं हे महासंकट. मुंबईजवळचं बदलापूर असो अथवा सांगली आणि कोल्हापूर, सर्वांचा जलापत्तीचा विदारक अनुभव सारखाच होता. त्यातून आता हा परिसर हळूहळू सावरतोय. जनजीवन आस्ते कदम पूर्वपदावर येतंय. आपत्तीग्रस्तांना मदत करायचे जे हात तातडीने पुढे सरसावले. त्या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. ज्या धैर्याने लोक या आकस्मिक संकटाला सामोरे गेले त्यांचंही कौतुक केलं पाहिजे.

आता पाणी ओसरलंय. त्यानंतरचं कामच खूप मोठं आहे. घरातला फूट, दोन फूट चिखल साफ करणं, बाजारपेठांमधल्या दुकानातल्या सामानाचं झालेलं नुकसान सोसणं, खराब झालेलं अन्नधान्य आणि वस्तू यांची वेगाने विल्हेवाट लावणं तसेच शेतीचं अपरिमित नुकसान भरून काढून मोडलेली घरं नि संसार पुन्हा उभे करणं हे सोपं नाहीच. ज्यांच्यापुढे हे आव्हान एका रात्रीत उभं ठाकलंय त्यांना मदत करायला दूरवरूनही माणसं येतायत ही दिलासा देणारी गोष्ट आहे. माझ्या परिचयाच्या तरुणांच्या एका गटाने आपल्या ‘पॉकेटमनी’मधून बऱ्यापैकी रक्कम गोळा करून मदतकार्य करणाऱयांना काही जीवनावश्यक वस्तू घेऊन दिल्या. असा खारीचा वाटा अनेकांनी उचलला असेल. ही समूहभावनाच माणसांच्या जगाचं वेगळेपण अधोरेखित करते.

आता केंद्र आणि राज्य सरकारांची मदत वेळेवर येईल आणि ती विनासायास गरजू व्यक्ती, कुटुंबांपर्यंत पोचेल याकडे लक्ष द्यायला हवं. अशी वेळ कोणी कोणावर दोषरोप करण्याची नव्हे तर सर्वांनी जागरुकतेने संकटाचा सामना करण्याची असते एवढं भान सुज्ञपणे सारेच दाखवतील ही अपेक्षा. आता चातुर्मास म्हणजे सणासुदीचा काळ. यावेळी सणवार साधेपणाने साजरे करून आपग्रस्तांकडे अधिकाधिक मदत वळवण्याचा निर्धार अनेक देवस्थानं, उत्सव मंडळंही करतायत. व्यक्तींनी समष्टीशी जोडलेलं हे नातंच पुन्हा नवी उभारी आणि उमेद देईल. भविष्यात असं संकट येऊच नये, पण आलं तर काय करायचं याचं नियोजन या क्षणापासून करावं लागेल. कारण निसर्ग ‘स्वभाव’ बदलतोय. साऱ्या जगालाच त्याचा फटका बसतोय. आपण सावध असायला हवं.

आपली प्रतिक्रिया द्या