लेख : कोकणच्या चौपदरी मार्गाची ओरड कशासाठी?

सुरेंद्र मुळीक ([email protected])

366 कि.मी. च्या या मार्गात एकूण 367 जंक्शन, 79 अंडरपास, नदीवरील लहानमोठे 86 पूल, रेल्वेमार्गिकेवरून 4 पूल तर 10 ठिकाणी उड्डाणपूल असा प्रचंड व्याप या चौपदरी महामार्गाच्या उभारणीत आहे. सात मजल्यांची एक इमारत बांधावयाची झाल्यास तीनचार वर्षांचा कालावधी जातो, मग एवढय़ा महामार्गासाठी थोडा धीर धरायला हवाच. महामार्ग कधी होणार याची केवळ ओरड करण्यापेक्षा पुढील काळात महामार्गामुळे कोकणात खुल्या होणाऱ्या विकासाच्या मार्गातून आपण व्यवसाय आणि आपला विकास कसा होईल याकडे येथील तरुणांनी अधिक लक्ष द्यावयास हवे, तरच या महामार्गाला अर्थ प्राप्त होईल.

गणेशोत्सव जवळ आला की कोकणवासीयांना मुंबई-गोवा महामार्गाची आठवण होते आणि कोकणवरील अन्यायाच्या कहाण्यांना भाले फुटतात. एकमेकांवर चिखलफेक केली जाते. हे सारे नेहमीचेच झाले आहे. पण मागील दोन-चार वर्षांत विशेषतः 19 जुलै 2017 रोजी इंदापूर-झाराप महामार्गाच्या भूमिपूजन सोहळय़ानंतर चौपदरीकरणाबाबत होणाऱ्या ओरडय़ामध्ये वाढ झालेली दिसून आली. कदाचित सोशल मीडियाचा प्रभाव असावा अथवा कोंकणवासीयांच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या असाव्यात. काहीही असो, पण ओरड कशासाठी आणि कोणत्या गोष्टीसाठी करावी याचे तारतम्य  बाळगायला हवे असे म्हणण्याची वेळ आली आहे. किंबहुना दहा वर्षांपूर्वी चौपदरी मार्गासाठी ओरड केली असती तर ते अधिक फायदेशीर झाले असते आणि कोकणचे चित्र वेगळे दिसले असते. पण तसे झाले नाही. मग आता कुठे महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे तर ओरड कशासाठी, असा प्रश्न निर्माण होत आहे.

अमेरिका श्रीमंत असल्यामुळे अमेरिकेतील रस्ते उत्तम आहेत असे नाही, तर अमेरिकेतील रस्ते उत्तम असल्याने अमेरिका श्रीमंत आहे असे अमेरिकेचे अध्यक्ष जॉन केनेडी यांचे म्हणणे होते. पण हिंदुस्थानवर 65 वर्षांहून अधिक काळ राज्य करणाऱ्या काँग्रेस सरकारला हे कळलेच नाही आणि ज्यावेळी कळले त्यावेळी फार उशीर झाला होता. कारण नियोजित ठिकाणी रस्त्यासाठी जागा शिल्लकच राहिली नव्हती. सर्वच महत्त्वाच्या रस्त्याच्या ठिकाणी अतिक्रमणाने विळखा घातला होता. यामुळे रस्ता उभारणीची कोणतीही योजना असो, 5-10 किमी.च्या मार्गाला 15-20 वर्षांचा कालावधी सहजच लागत होता. याचा अनुभव उतारवयाकडे झुकलेल्या मुंबईकर पिढीने घेतला आहे. 1985 साली बांधकामास सुरुवात झालेल्या जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्त्याचे काम पूर्ण होण्यास तब्बल 25 वर्षांचा कालावधी लागला. आजही अनेक ठिकाणी ‘बॉटल नेक’ असल्याने वाहतुकीची कोंडी होतच असते. तर 2002 साली मंजूर झालेल्या सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्याचे काम आजही सुरू आहे. तरीही मुंबईकरांनी कधी ओरड केली नाही. पण आता परिस्थितीत बदल झाला आहे. मागील पाच वर्षांत केवळ मुंबईतच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात जागोजागी रस्त्याच्याच नाही तर मेट्रो रेलच्या कामालाही मोठय़ा प्रमाणात सुरुवात झाली आहे. ही सारी कामे वेगाने प्रगतिपथावर आहेत. फक्त पनवेल-गोवा महामार्गाचे चौपदराकरणाचे काम नाही, तर 701 किमी लांबीचा नागपूर – मुंबई समृद्धी मार्ग,  80 किमीचा पालघर, मनोर विक्रमगड-जव्हार – मोखाडा-नाशिक महामार्ग, 80 किमीचा पुणे-पौंड-मुळशी -म्हसळा ते दिघी (बंदर) महामार्ग, 120 किमीचा रत्नागिरी – कोल्हापूर चौपदरीकरण, 80 किमीचा गुहागर-सातारा जिल्हा जोडणारा महामार्ग, 560 किमीचा कारंज ते रेवस बंदर ते गोवा हद्दीच्या आरोंदा किरणपाणीपर्यंत सागरी महामार्ग. कोकणच्या अशा सुमारे 2 हजार 194 किमी लांबीच्या रस्त्याच्या कामाला केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वीच मंजुरी दिल्याने या कामाला सुरुवात झाली आहे. यासाठी तब्बल 39 हजार 500 कोटी रुपये खर्च येणार आहे. या सर्व रस्त्यांची कामे जेव्हा पूर्ण होतील त्यावेळी कोंकणच्या विकासाची कवाडे पूर्णपणे उघडलेली असतील. पनवेल-गोवा चौपदरी महामार्ग ही या विकासाची सुरुवात आहे. म्हणूनच याबाबत ओरड न करता कोंकणच्या इतर समस्यांबाबत लक्ष घालावयास हवे.

कोकणच्या विकासाचे दरवाजे उघडू लागल्याने येथील तरुणांना कोकणातच संधी कशी मिळेल हे राजकीय नेत्यांनी पाहावयास हवे. येथील सुशिक्षित तरुण रोजगारासाठी आजही मुंबई-पुण्याकडे धाव घेतो, तर अशिक्षित तरुण गोव्याच्या दिशेने वाटचाल करतो. अनेकांनी छोटे-मोठे व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला, पण शासकीय यंत्रणेने त्यांना टिकूच दिले नाही. म्हणूनच केवळ चौपदरी महामार्गाची ओरड न करता कधीतरी तरुणांच्या रोजगारासाठी, व्यवसायासाठी ओरड करूया. विजेच्या कमतरतेमुळे पनवेल ते सावंतवाडीच्या पट्टय़ात होऊ न शकणाऱ्या ऑनलाइन स्पर्धात्मक परीक्षांसाठी ओरड करूया, कोकण रेल्वेच्या मार्गासाठी 22 टक्के रक्कम देणाऱ्या महाराष्ट्राला केवळ दोन गाडय़ांवर बोळवण आणि 6 टक्के हिस्सा देणाऱ्या गोवा, केरळ राज्यांसाठी 25 हून अधिक गाडय़ा यासाठी ओरड करूया. गेली 20 वर्षे 40 टक्के अतिरिक्त भाडे घेणाऱ्या कोकण रेल्वे प्रशासनाविरोधात ओरड करूया. मागील 5 वर्षे अर्धवट स्थितीत राहिलेल्या सावंतवाडी टर्मिनलसाठी ओरड करूया. 20 वर्षे कागदावरच राहिलेल्या पर्यटनासाठी ओरड करूया. चिपीचे विमानतळ सुरू करण्यासाठी ओरड करूया, थांबलेल्या ‘सी वर्ल्ड’च्या कामासाठी ओरड करूया, मुंबईतून कोकणच्या शेवटच्या तालुक्यापर्यंत न सुटणाऱ्या अथवा न सोडणाऱ्या एसटी महामंडळाविरोधात ओरड करूया, तलाठी कार्यालयात 7/12सह अनेक कागदपत्रे वेळेवर न देणाऱ्या तलाठय़ांविरोधात ओरड करूया. आणि सरतेशेवटी अनेक योजनांचा बट्टय़ाबोळ करणाऱ्या अधिकाऱयांच्या विरोधात ओरड करूया. अशी असंख्य कामे कोकणच्या स्वयंघोषित पुढाऱयांसमोर आहेत. तरीही सुरू असलेल्या आणि वेगाने पूर्णत्वाच्या दिशेने सरकत असलेल्या चौपदरी मार्गाबाबत ओरड सुरू आहे, किंबहुना ती केली जात आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे.

वास्तविक, केंद्रात सत्ताबदल झाला नसता तर कोकणला दुपदरीही रस्ता मिळाला नसता. कारण राष्ट्रीय महामार्गाच्या नियमात कोकणातील मार्ग बसलाच नसता. नियमानुसार ज्या मार्गावरून दिवसाला किमान एक लाख गाडय़ा मार्गक्रमण करतात अशाच मार्गाचे चौपदरीकरण केले जात होते, परंतु या सर्व नियमाला बाजूला सारून कोकणला चौपदरी मार्गाचा प्रस्ताव मंजूर झाला. इंदापूर ते झाराप हा 366 कि.मी.चा मार्ग दिलेल्या वेळेत झपाटय़ाने पूर्ण व्हायला हवा यासाठी तब्बल दहा भागांत विभागून दहा ठेकेदार कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इतकेच नाही, तर या महामार्गाला भविष्यात खड्डे पडावयास नको म्हणून संपूर्ण मार्गाचे काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, सहापदरी मार्गासाठी जागाही संपादित करून ठेवली. म्हणूनच भविष्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी कोकणातील प्रसिद्ध अशा कशेडी घाटात 1.72कि.मी. लांबीचा सहापदरी भुयारी रस्ता केला जात आहे. तरीही ओरड कशासाठी? गणपती जवळ आला की चाकरमान्यांना ओरड करायची सवयच झाली आहे. एक ओरडला की दुसरा ओरडते. यांना कसे कळत नाही की, कामाला सुरुवात होऊन अवघी दोन वर्षे झालीत आणि कोकणात पडणारा मुसळधार पाऊस पाहता या दोन वर्षांतील 7-8 महिने वाया गेले. तरीही चौपदरीकरणाचा वेग थांबलेला नाही. रस्त्यावरील सिमेंट सुकायला तरी वेळ हवा, रस्त्यावरील वेडीवाकडी वळणे सरळ करण्यासाठी वेळ हवा ना, महामार्गावरील जगबुडी, वशिष्ठाr, शास्त्राr, कोळंबे, सप्तलिंगी, अंजणारी अशा नद्यांवर पूल बांधावयाचे आहेत. 366 कि.मी. च्या या मार्गात एकूण 367 जंक्शन, 79 अंडरपास, नदीवरील लहान-मोठे 86 पूल, रेल्वेमार्गिकेवरून 4 पूल तर 10 ठिकाणी उड्डाणपूल असा प्रचंड व्याप या चौपदरी महामार्गाच्या उभारणीत आहे. सात मजल्यांची एक इमारत बांधावयाची झाल्यास तीन-चार वर्षांचा कालावधी जातो. मग एवढय़ा महामार्गासाठी धीर धरायला हवाच. महामार्ग कधी होणार याची केवळ ओरड करण्यापेक्षा पुढील काळात महामार्गामुळे कोकणात खुल्या होणाऱ्या विकासाच्या मार्गातून आपण व्यवसाय आणि आपला विकास कसा होईल याकडे येथील तरुणांनी अधिक लक्ष द्यावयास हवे तरच, या महामार्गाला अर्थ प्राप्त होईल.

 

आपली प्रतिक्रिया द्या