
दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ असे नाव देण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी आता प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. या नामकरणाला राज्य सरकारने यापूर्वीच तत्त्वतः मान्यता दिली असून, केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार ठराव तसेच आवश्यक प्रक्रिया आगामी विधिमंडळ अधिवेशनात पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर स्थानकाच्या नामकरणाची कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात बैठक झाली. इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. मुख्य पुतळय़ाच्या कामासंदर्भात काही बाबी प्रलंबित आहेत. कामाच्या खर्चात वाढ झाली तरी शासन आवश्यक निधी उपलब्ध करून देईल. यासंदर्भात पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक घेऊन कामाला गती देण्यात येईल, असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.





























































