कृष्णस्तु भगवान स्वयम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीमदभागवत महापुराणात म्हटले आहे की, कृष्णस्तु भगवान स्वयम. म्हणजे श्रीकृष्ण साक्षात देव आहेत. म्हणजेच योगेश्वर श्रीकृष्ण हे देवाचा अवतार नव्हेत, तर स्वयम देव आहेत. योगेश्वर श्रीकृष्णाच्या पदपथावरून चालण्याचा संकल्प आपण अर्जुनाप्रमाणे करायला हवा. तरच श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केल्याचे सार्थक होईल. योगेश्वर श्रीकृष्णाचे उपदेश आजच्या युगातही तेवढेच प्रासंगिक आहेत, जेवढे द्वापारयुगात होते. श्रीकृष्ण सदैव आपल्या सोबत आहेत आणि राहणार आहेत. कृष्ण जन्माष्टमीनिमित्त प्रख्यात बासरी वादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचा हा लेख…

श्री कृष्ण जन्माष्टमी हे माझ्यासाठी मोठे पर्व असते. गेल्या 28-29 वर्षांपासून जन्माष्टमीच्या दिवशी मी 24 तास पूजा करतो. त्या दिवशी मी अखंडितपणे बासरी वादन करीत राहतो. त्या दिवशी श्रीकृष्ण हेच माझे श्रोते असतात. फक्त श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्ण हेच माझे आराध्य दैवत. त्या बासरीवाल्याला मी माझ्या बासरीची सुरावट ऐकवतो. श्रीकृष्णाच्या जन्मादिवशी माझ्या मंदिरात केवळ मी आणि श्रीकृष्ण दोघेच असतो. त्या दिवशी दुसऱया कुणाचीही गरज नसते. मी आणि माझा गिरिधर! आत्म्याची भेट परमात्म्याशी होते. माझी दोन गुरुकुले आहेत. एक मुंबईत आणि दुसरे भुवनेश्वरमध्ये. दोन्ही ठिकाणी जन्माष्टमीच्या दिवशी 24 तास अखंड पूजा होते. न थांबता बासरी वादन केले जाते.

श्रीकृष्णाचा अवतार द्वापारयुगात झाला. कलियुगात आपण त्याची पूजा करतो. श्रीकृष्णाच्या मार्गाचे अनुसरण करण्याची गरज आहे. लोक मला विचारतात, कलियुगात विशेषतः 21 व्या शतकात श्रीकृष्णाची प्रासंगिकता किती आहे? मी इतरांचे न सांगता स्वतःबद्दल सांगतो. आजच्या काळातही प्रत्येक क्षणी श्रीकृष्ण माझ्या समवेत आहेत. नेहमी सोबत आहेत. श्रीकृष्णावाचून मी एक क्षणही राहत नाही. श्रीकृष्ण सतत माझ्यासोबत आहेत आणि अखेरच्या श्वासापर्यंत राहतील.

हिंदू देवी-देवतांमध्ये श्रीकृष्णच सर्व कलांमध्ये निपुण आहेत. चौसष्ट कलांचे स्वामी. प्रारंभापासून लीलावसानपर्यंत श्रीकृष्णाचे संपूर्ण चरित्र थक्क करणारे आहे. एक नवजात बालक वयाच्या सहाव्या दिवशीच एका राक्षसीचा अंत करतो. काही महिन्यांनंतरच तो शकटासुर, अघासुर, तृणावर्त आदी मोठमोठय़ा राक्षसांचा अंत करतो. हे केवळ श्रीकृष्णच करू शकतात. कारण ते ईश्वरांचे ईश्वर ‘परमब्रह्म परमात्मा’ आहेत. महाभारत युद्धाची कल्पना आणि निवारण श्रीकृष्णांशिवाय होणे असंभव होते. शांतिदूताच्या स्वरूपात असोत किंवा अर्जुनाच्या सारथ्याच्या रूपात असोत, श्रीकृष्णाच्या जीवनातील एकेका प्रसंगाबद्दल जेव्हा मी विचार करतो, मनन करतो, तेव्हा त्यांच्यासारखा दुसरा कुणीच आढळत नाही. आपल्या निळ्या अभेमुळे श्रीकृष्णांना त्यांचे भक्त ‘नीलमणी’ नावाने ओळखतात.

गोकुळाचे संपूर्ण वर्णन करणे मोठमोठय़ा विद्वानांना शक्य झाले नाही. परंतु श्रद्धा, भक्ती आणि प्रेमाच्या त्रिवेणी संगमाद्वारे ते समजून घेणे आणि मनातील कल्पनांच्या आधारे त्या विश्वात प्रवेश करणे शक्य आहे. अन्यथा अनंत सौंदर्य, अनंत ऐश्वर्य आणि अनंत माधुर्याचे वर्णन शब्दांद्वारे व्यक्त करण्याची क्षमता कोणाकडे आहे? श्रीकृष्णांच्या लीला अनेकांना समजूच न शकणे, काहींनी त्यांच्याविषयी प्रतिकूल बोलणे शक्य आहे; परंतु प्रेमाची अखंडधारा त्यांनी ज्या प्रकारे आपल्या जीवनात उतरविली, ते अप्रतिम आहे. या प्रेमाच्या उत्कर्षबिंदूमुळेच आपण आज राधा-कृष्णाची पूजा करतो. आजची युवा पिढी प्रेम करते; पण क्षणिक. प्रेम हे तर त्यागाचे नाव आहे. प्रेमात समोरच्याला देण्याची उत्कंठा असते. त्याच्याकडून घेण्याची लालसा नसते. राधा-कृष्णाच्या प्रेमाविषयी ज्या-ज्यावेळी बोलले जाईल, त्या-त्यावेळी त्यांच्यातील प्रत्येक क्षण जाणून घेणे आवश्यक आहे. तसे प्रेम संपूर्ण जगात कुठेही आढळणार नाही. अर्थात, राधा-कृष्ण यांनी लहानपणीची काही वर्षेच एकत्रितपणे व्यतीत केली, परंतु आज हजारो वर्षांनंतरही आपण त्या दोघांकडे वेगवेगळे करून पाहू शकत नाही. अशी कोणती जादू आहे त्या नात्यात?

श्रीकृष्ण त्यांच्या संपूर्ण जीवनात कुठेही गुंतलेले दिसत नाहीत. ते खूप मोठे राजनीतिज्ञ होते. त्यांची राजनीती कुठे कुणाला समजली? पांडवांना त्यांचे राज्य मिळवून देण्यासाठी श्रीकृष्णांनी केवढे राजकारण केले! द्वारकेतून हस्तिनापुरात आले आणि कुरुक्षेत्रात महाभारतीय युद्धाचे सूत्रधार बनले. प्रेम आणि युद्धात जिंकायचे असेल, तर प्रत्येक गोष्ट स्वीकारार्ह आहे हे त्यांनीच तर आपल्याला शिकवले. हीच तर राजनीती आहे.

कला, संगीत असो वा चित्रकला, सर्व ठिकाणी आपल्याला श्रीकृष्णाचेच रूप दिसते. अन्य कोणत्याही देवतेचे रूप दिसत नाही. श्रीकृष्णांचे वेड संपूर्ण जगाला लागले आहे. श्रीमद्भागवत महापुराणात म्हटले आहे की, कृष्णस्तु भगवान स्वयम. म्हणजे श्रीकृष्ण साक्षात देव आहेत. म्हणजेच योगेश्वर श्रीकृष्ण हे देवाचा अवतार नव्हेत तर स्वयम देव आहेत. योगेश्वर श्रीकृष्णाच्या पदपथावरून चालण्याचा संकल्प आपण अर्जुनाप्रमाणे करायला हवा. तरच श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केल्याचे सार्थक होईल. योगेश्वर श्रीकृष्णाचे उपदेश आजच्या युगातही तेवढेच प्रासंगिक आहेत, जेवढे द्वापारयुगात होते. श्रीकृष्ण सदैव आपल्या सोबत आहेत आणि राहणार आहेत.

इतर देवतांविषयी जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा श्रीकृष्णासारखा जीवनपट इतर कुणाचाच दिसत नाही. ते राजनीतिज्ञ होते आणि महान कलाकारही होते. हे दोन्ही गुण अन्य कोणत्याही दैवताच्या अंगी एकत्रितपणे दिसत नाहीत. माझे गुरू, माझे देव सबकुछ श्रीकृष्णच आहेत. श्रीकृष्णाचे केवळ एक देवता म्हणून मी पूजन करत नाही. त्यांची शिकवण अंगीकारण्याचा प्रयत्न करतो. आपण मोक्षाची कामना करण्याऐवजी अमरत्वाची कामना करतो. श्रीकृष्णाची आपण पूजा करतो; परंतु त्यांचे गुण आत्मसात करण्यासाठी नव्हे, तर त्यांच्याकडून आपल्या इच्छांच्या पूर्ततेची अपेक्षा ठेवून करतो. वस्तुस्थिती अशी की, ना श्रीकृष्ण आपल्याला समजले ना त्यांचा कर्मयोग समजला. त्यामुळे जीवनभर आपण मोहाच्या बंधनात गुंतून पडतो आणि दुःखाने वेढले जातो. श्रीकृष्णाचे टीकाकार आणि विरोधकसुद्धा त्यांना समजून घेऊ शकलेले नाहीत. श्रीकृष्णाचा विषय निघताच ते कंसाच्या वधाचा उल्लेख करत नाहीत आणि महाभारतीय युद्धापूर्वी श्रीकृष्णांनी केलेल्या कूटनीतीबद्दलही बोलत नाहीत. गीतेतल्या महान उपदेशाबद्दलही ते बोलत नाहीत. त्यांची बुद्धी केवळ लोण्याची चोरी, राधा आणि गोपिका, तसेच 16008 पत्नी इथपर्यंतच जाऊन पोहोचते. ‘जिनकी रही भावना जैसी, प्रभू मूरत देखी तिन तैसी’ या उक्तीप्रमाणे ज्यांचे मन वासनांमध्येच गुंतून पडले आहे, त्यांना श्रीकृष्णाच्या जीवनपटातील तेवढाच अंश दिसतो. त्यात श्रीकृष्णांचा दोष नाही, दोष श्रीकृष्णाच्या टीकाकारांच्या बुद्धीचा आहे.