
>> डॉ. सचिन अनिल पुणेकर, [email protected]
कुंडलिनी योग आणि पंढरीची वारी ही भारताची आध्यात्मिक आणि सांस्पृतिक ओळख आहे. या दोन्ही परंपरेचे मार्ग जरी वेगवेगळे असले तरी त्यांचा हेतू किंवा उद्दिष्ट हे मात्र सारखेच असावेत! या दोन्ही शास्त्र आणि परंपरेच्या माध्यमातून तुम्ही ईश्वर-भगवत प्राप्ती अर्थात मोक्षप्राप्ती निश्चित साधू शकता. अर्थात या गोष्टीसाठी तुमची वैयक्तिक सातत्यपूर्ण साधना, क्रिया, श्रद्धा आणि भक्ती फार महत्त्वाची आहे. सदर लेखात कुंडलिनी शक्ती आणि पंढरीची वारी कशी एकच आहे, त्यांच्यात काय साधर्म्य आहे याचा निसर्ग अर्थात ईश्वर प्रेरणेने वारी मार्गावरच स्फुरलेले तत्त्वज्ञान मांडण्याचा मी एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
देहू-आळंदी ते पंढरपूर पायी वारी ही पंढरीची वारी म्हणून सर्वांना ज्ञात आहे. पंढरीची वारी हे भारताचे, महाराष्ट्राचे एक सांस्पृतिक ऐश्वर्य मानले जाते. तमाम महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रातील आणि इतर क्षेत्रांतील विठ्ठलभक्तांचे हे श्रद्धास्थान. शेकडो वर्षांची देदीप्यमान, वैभवशाली परंपरा जपणाऱ्या वारकरी, शेतकरी, कष्टकरी या अनोख्या वारीत देहभान हरपून टाळ, मृदुंगाच्या गजरात विठू माऊलीच्या व संतांच्या नामस्मरणात तल्लीन होत लाखोंच्या संख्येत सहभागी होतात आणि सरतेशेवटी पांडुरंगाच्या-विठ्ठलाच्या चरणी लीन होतात. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज हे प्रमुख पालखी सोहळे इतर संतांच्या, सत्पुरुषांच्या आणि स्थानांच्या देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर क्षेत्रातून दरवर्षी परंपरेने पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी आषाढी-कार्तिकीला मार्गस्थ होतात. तुकोबा आणि ज्ञानोबा यांचे पालखी मार्ग देहू-आळंदीतून सुरू होत प्रथम पुण्यात भेटतात व पुढे पुण्यातील हडपसर ठिकाणी एकमेकांना छेदून वेगवेगळ्या मार्गाने नागमोडी मार्गिकेने विविध विसाव्याला मुक्काम करत करत पंढरपूरला मार्गस्थ होतात. वारी वारकऱ्याला अनेक गोष्टी देते, शिकवते. ती केवळ एक धार्मिक यात्रा नसून, ती मानवी मनाला शांती, आनंद आणि एकात्मतेची अनुभूती देणारी एक प्रक्रिया आहे. वारीमध्ये सहभागी होऊन वारकरी स्वतःमधील नकारात्मक गोष्टींवर जसे की राग, लोभ, मत्सर, अहंकार, भीती, निराशा, तिरस्कार, अविश्वास, आळस यावर मात करण्याचा प्रयत्न करतात आणि सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारतात. त्यामुळे वारीला ‘मानवी मनाला शुद्ध करण्याची यात्रा’ असेही म्हटले जाते.
वारी परंपरेसारखीच किंबहुना अनादी काळापासून चालत असलेली एक विशिष्ट परंपरा अर्थात कुंडलिनी योग. कुंडलिनी शक्ती ही एक भारतीय आध्यात्मिक संकल्पना आहे, जी पाठीच्या कण्याच्या तळाशी, मूलाधार चक्रात, सुप्त अवस्थेत असलेली एक दैवी ऊर्जा मानली जाते. ‘कुंडलिनी’ या शब्दाचा अर्थ ‘गुंडाळलेली’ किंवा ‘सर्पापृती’ असा होतो आणि ती जागृत झाल्यावर आत्म-जागरूकता येते. आध्यात्मिक वाढीसाठी ती महत्त्वाची मानली जाते. कुंडलिनी शक्ती शरीरात सुप्त अवस्थेत असते आणि ती ध्यान, योग, प्राणायाम आणि मंत्रांचा जप यांसारख्या साधनांद्वारे जागृत केली जाऊ शकते. कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यावर शरीरातील सात चक्रांमधून प्रवास करते, असे मानले जाते. जागृत झालेली शक्ती ब्रह्म, रुद्र व विष्णू या तीन ग्रंथींचा भेद करते. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र या षट्चक्रांचे भेदन करून सहस्रार चक्रात लीन होते. कुंडलिनी चक्रांचे शुद्धीकरण म्हणजे तुमच्या शरीरातील सात मुख्य ऊर्जा केंद्रे (चक्र) संतुलित आणि शुद्ध करणे. कुंडलिनी योग आणि ध्यान यांसारख्या तंत्रांद्वारे हे केले जाते, ज्यामुळे तुमच्या शरीरात ऊर्जा (प्राण) प्रवाहात सुधारणा होते आणि शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक आरोग्य सुधारते. कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यावर साधकाला अनेक आध्यात्मिक अनुभूती येऊ शकतात, जसे की उच्च चेतना, शांतता आणि आनंद. एपंदरीत, कुंडलिनी शक्ती ही एक गूढ आणि शक्तिशाली ऊर्जा आहे, जी योग्य साधना आणि मार्गदर्शनाने जागृत केल्यास आध्यात्मिक वाढ आणि आत्म-साक्षात्कार होऊ शकतो. थोडक्यात देहू-आळंदी ते पंढरपूर वारी ही परमहंस पदाची प्राप्ती अर्थात मोक्षाची प्राप्ती करून देणारी आहे… त्याचप्रमाणे चेतनेचा-शक्तीचा मूलाधार ते सहस्रार हा प्रवास मोक्ष प्राप्तीचाच आहे… विचार केला तर वारी ही एक प्रकारे योगक्रियाच आहे.
पंढरीच्या पांडुरंगाचा कपाळावरील टिळा हा शेषनागाचे प्रतीक आहे. अर्थात सर्पाचे प्रतीक आहे. कुंडलिनी ही सर्पाप्रमाणेच आहे. हा टिळा शिवलिंगाप्रमाणे आहे. शिवलिंग जर वरून बघितले तर ते पांडुरंगाच्या कपाळावरील टिळ्यासारखे दिसते. शिवाय पांडुरंगाचा कपाळावरील टिळा हा पालखी मार्ग आणि कुंडलिनी योगिक क्रियादेखील दर्शवतो. कुंडलिनी जागरणामध्ये जशी षट्चव्रे असतात त्याचप्रमाणे पंढरीच्या वारी मार्गावरील विविध प्रमुख विसावे एक प्रकारे षट्चक्रच आहेत. या षट्चक्रात शरीरातील नाडय़ांच्या जाळ्यांचे पेंद्र असते. मला स्फुरल्याप्रमाणे वारी मार्गावरील देहू-आळंदी हे मूलाधार चक्र आहे. इडा नाडी हा ज्ञानोबा पालखी मार्ग आहे. पिंगला नाडी हा तुकोबा पालखी मार्ग आहे आणि सुषुम्ना नाडी या दोन्ही पालखी मार्गांच्या मधून देहू-आळंदी ते पंढरपूरकडे प्रवाही होणारी समन्वयाची भूमिका बजावणारी, शक्तीचा शिवतत्त्वापर्यंतचा प्रवास घडवणारी मार्गिका आहे. पुणे हे स्वाधिष्ठान चक्र आहे जेथून इडा (ज्ञानोबा पालखी) आणि पिंगला नाडी (तुकोबा पालखी) दोन भिन्न मार्गाने मार्गस्थ होतात. पुढे ज्ञानोबा-तुकोबांचे व इतर पालखी सोहळे वाखरी या विसाव्याला एकवटतात ज्याप्रमाणे इडा, पिंगला आणि सुषुम्ना आज्ञाचक्रात एकमेकांना भेटतात. त्यामुळे वारी मार्गावरील वाखरी हा विसावा कुंडलिनी मार्गिकेतील आज्ञाचक्र आहे. वाखरीत अर्थात आज्ञाचक्रात एकवटलेल्या पालख्या म्हणजेच कुंडलिनी शक्ती पुढे सुषुम्ना नाडीतून पंढरपूर अर्थात सहस्त्रार चक्राकडे मार्गस्थ होते आणि याच सहस्त्रारचक्रात म्हणजेच पांडुरंगात कुंडलिनी शक्ती शिवतत्त्वात विलीन होते. इथे शक्ती म्हणजे वारकरी आणि पांडुरंग म्हणजे अंतिम शिवतत्त्व होय.
थोडक्यात काय पंढरीची वारी हा शक्तीचा विविध नाडय़ांतून षट्चक्रांना भेदून शिवतत्त्वापर्यंत असलेला मोक्ष प्राप्तीचा प्रवास आहे. शक्तीचा म्हणजे वारकऱ्यांचा शिवतत्त्वाकडे म्हणजे पांडुरंगाकडे होणारा हा प्रवास चित्ररूपी मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी ईश्वरी प्रेरणेतून इथे केला आहे.ही शब्द आणि चित्ररूपी सेवा या वर्षीच्या आषाढीच्या निमित्त माहितीपत्रक आणि बोधचिन्हाचे विमोचन करून पांडुरंगचरणी अर्पण करता आली. निसर्गात आणि आपल्याकडील सांस्पृतिक परंपरेत अशी अनेक गूढ रहस्ये दडली आहेत, त्याची उकल होणे आवश्यक आहे.
(लेखक पर्यावरण शास्त्रज्ञ आणि अध्यात्माचे अभ्यासक आहेत.)