ठसा : नाटककार ला. कृ. आयरे

29


>> मनोहर धें. सावंत

कोकणच्या कुशीत अनेक नवरत्ने निर्माण झाली, त्यापैकी 21 मे 1918 रोजी रिंगणे (रत्नागिरी) येथे एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले लाडकोजी कृष्णाजी आयरे हे एक. लहानपणापासून त्यांना साहित्याची गोडी होती. ह. ना. आपटे, राम गणेश गडकरी, वि. स. खांडेकर, साने गुरुजी, आचार्य अत्रे, मामा वरेरकर इ. साहित्यकारांच्या वाङ्मयाचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. गावातील रामनवमीच्या जत्रेतील नाटके पाहून त्यांना या विषयाची गोडी वाटली व वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी ‘साष्टांग नमस्कार’मध्ये मीरा आणि ‘योगायोग’मध्ये जाई यांसारख्या स्त्र्ााr भूमिका केल्या. व्हर्नाकुलर फायनलपर्यंत शिक्षण पूर्ण करून आर्थिक स्थैर्यासाठी ते मुंबईला आले. निःस्वार्थी व मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांच्या अनेक ओळखी झाल्या व नोकरी धरली.

सुरुवातीला त्यांनी मेळय़ांचे संवाद लिहिले व नंतर आत्मविश्वास वाढल्यावर वयाच्या 18व्या वर्षी त्यांनी कोर्टकचेऱयांचे दुष्परिणाम दाखविणरे ‘फिर्याद’ हे नाटक लिहिले. नंतर इतर नाटकांचे खेडय़ापाडय़ांतून सातत्याने प्रयोग होत राहिले. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या जाणिवेतून शेतकरी व बहुजन समाज जागृतीसाठी त्यांनी आपले साहित्य खर्ची घातले. मनोरंजनाबरोबर प्रबोधनाचा दुहेरी उपयोग त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी ‘मायेचा संसार’ व 19व्या वर्षी ‘जुलूम’ हे नाटक रंगभूमीवर आणले. पुढे एकापेक्षा एक अशी 23 नाटके, 4 लोकनाटय़े, 6 एकांकिका व अंदाजे 300 श्रुतिका लिहिल्या, त्यापैकी सुमारे 200 आकाशवाणीच्या कामगार सभेतून सादर केल्या.

अनेक वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके यांमधून त्यांनी लेखन केले. केंद्र सरकार, महाराष्ट्र राज्य सरकार, अखिल भारतीय नाटय़ परिषद यांकडून त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. तसेच कामगार कल्याण मंडळाच्या नाटय़ लेखन स्पर्धेत त्यांच्या नाटकांना पारितोषिके मिळालेली आहेत. त्यांच्या पाच नाटकांची हिंदी, गुजराती व तेलुगू भाषेत भाषांतरे झालेली आहेत. कैद्यांच्या पुरवणी वाचनात त्यांच्या ‘फिर्याद’ या नाटकाचा समावेश झालेला आहे. नाटय़ महर्षी, थोर साहित्यिक, नामवंत नाटय़ व दिग्दर्शक, मोठमोठय़ा राजकीय व्यक्ती यांनी त्यांची नाटके वाचून व प्रयोग पाहून त्यांच्या नाटकांचा गौरव केलेला आहे.
आशिया खंडातून प्रसिद्ध होणारे ‘ट्रेडस्मॅन ऍण्ड मेन’ या पुस्तकातून त्यांची एक नामवंत नाटककार म्हणून मुलाखत प्रसिद्ध झाली होती. तसेच इंडो-युरोपियन ‘who’s who’ या व्हॉल्युममध्ये नाटय़ लेखक म्हणून त्यांच्या नाटकांचा खास उल्लेख केलेला आहे, जे सामान्य जनांसाठी उपलब्ध नसते. ‘ग्रामीण व शहरी दोन्ही समाजाच्या प्रबोधनाकरिता आपली लेखणी अखंड चालू ठेवणारी पहिली व्यक्ती’ असे उद्गार आचार्य अत्रे यांनी 32व्या मराठी नाटय़ परिषदेमध्ये त्यांच्याविषयी अध्यक्षपदावरून बोलताना काढले होते. मामा वरेरकर व चिंतामणराव कोल्हटकर त्यांना गुरूसमान होते. शेवटपर्यंत ते राजकारणापासून अलिप्त राहिले, परंतु सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी त्यांचा सलोख्याचा संबंध होता. सरकारच्या विकास कार्यक्रमांचा प्रचार त्यांनी आपल्या 20 नाटकांतून करून जनजागृती केली. नोकरी सांभाळून वयाच्या 18व्या वर्षापासून ते मोठय़ा निष्ठsने व तळमळीने समाजकार्य करीत होते. रत्नागिरी व मुंबईतील अनेक संस्थांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होत. निगर्वी, मनमिळाऊ स्वभाव व प्रत्येकाला मदत करण्याची वृत्ती यामुळे ते लोकप्रिय व सर्वांना हवेहवेसे वाटणारे होते.

जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले।
तोचि साधु ओळखावा। देव तेथेचि जाणावा।।

या उक्तीप्रमाणे त्यांनी आपले सारे आयुष्य व्यतीत केले. स्वतःच्या रिंगणे गावाला त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. मा. दत्ताराम, शंकर घाणेकर, राजा गोसावी, जयश्री शेजवाडकर, सरस्वती बोडस, मधुसूदन आंगणे आदींनी त्यांच्या नाटकांत भूमिका केल्या होत्या. ‘मराठा सेवक’ या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता. तसेच ललित, रसरंग, किर्लोस्कर, मनोहर, दीपलक्ष्मी, कोकण दर्शन इत्यादी मासिकांत त्यांनी वेगवेगळय़ा प्रकारचे लेखन केले होते.

15 नोव्हेंबर 1984 रोजी वयाच्या 66व्या वर्षी हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. अगदी शेवटपर्यंत ते ताजेतवाने व उत्साही होते. आज 34 वर्षे होऊनही नाटय़रूपाने व अंगच्या गुणांमुळे ते आपल्यातून गेले असे अजिबात वाटत नाही. त्यांचा जन्मशताब्दी सांगता सोहळा गेल्या महिन्यातच झाला.

आपली प्रतिक्रिया द्या