भाषिक वेदना आणि भाषांचे भवितव्य

566

>> अरुण जाखडे

भाषेचा विकास होण्यासाठी ती ज्या भागात बोलली जाते तिथले सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय वर्चस्व महत्त्वाचे असते. याचा तोटा असा होतो की, यातूनच भाषाभेद होतो व ‘भाषिक सल’ तयार होतो. अशा गोष्टी हिंदुस्थानातील अनेक भाषांबद्दल सांगता येतील.

मराठीत भाषिक वेदना कमी
महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले, तर हिंदुस्थानी भाषांच्या लोक सर्वेक्षणात साठ भाषांची नोंद आहे अणि आता त्यापुढेही हे काम चालू असल्यामुळे दहा भाषांचा समावेश पुढील आवृत्तीत होणार आहे. भाषा आणि बोली यात वरचेपणा-खालचेपणा काही नसतो. बोलींना जेव्हा प्रतिष्ठा मिळते तेव्हा ती भाषा होते. मराठीत इतक्या भाषा असूनही ही भाषिक वेदना फक्त राज्याच्या, विशेषतः कर्नाटकच्या सीमा भागावर आहे. सीमा भागावर ती सर्वत्रच असते. पण महाराष्ट्रातील भाषा, उपभाषा किंवा रूपे आणि बोलींमध्ये ही भाषिक वेदना खूप कमी आहे. त्याचं कारण मराठीतील या उप किंवा मराठीची रूपे असलेल्या भाषा व इतर बोलीभाषा यात जे साहित्य लिहिले जाते, त्याचा समावेश मराठी साहित्यात केला जातो, त्याला प्रतिष्ठा दिली जाते, पुरस्कार दिले जातात व शालेय अभ्यासक्रमात त्याचा अल्प प्रमाणात का होईना, पण समावेश होतो. उदा. मालवणी, अहिराणी, खान्देशी, वऱ्हाडी आणि आजकाल आदिवासी साहित्याचीही दखल घेऊ जाऊ लागली आहे. भाषांना प्रतिष्ठा मिळाली, सामाजिक स्थान मिळाले तरच त्या टिकू शकतात. अर्थात महाराष्ट्रातील सर्वच बोली अथवा वेगवेगळ्या समाजाच्या भाषांबद्दल असे घडत नाही, याचे कारण त्या भाषा बोलणाऱया लोकांनी, सुशिक्षितांनी त्यांच्या भाषेत साहित्य निर्मिती करायला हवी. अशी साहित्यनिर्मिती घडली तरी भाषेचे अस्तित्त्व पुस्तकांप्रमाणेच माणसाच्या मुखात आहे. मुखातून ती बोलली गेली पाहिजे. बोलणाऱयांची संख्या अबाधित राहिली तरच त्या भाषांना बळ मिळू शकेल. साहित्य त्या-त्या भाषेतून आले नाही तरी ती भाषा ज्यांच्या फक्त जिभेवर आहे, त्यांच्याकडून त्या भाषेत असलेला मौखिक ठेवा कोणीतरी कागदावर आणायला हवा.

हिंदुस्थान हा केवळ बहुभाषिक देश नाही, तर भाषाशास्त्र किंवा ज्याला आता ‘भाषा विज्ञान’ म्हणतो त्याची एक मोठी प्रयोगशाळा आहे. इथे किती लोक आले, ते कोणकोणत्या मानववंशाचे होते, ते इथे समाज म्हणून कसे वावरले किंवा वावरत आहेत, या येणाऱया समाज प्रवाहातून कोणत्या भाषा घडत गेल्या, हे जाणून घेणे म्हणजे भाषा विज्ञानाबरोबर इथले समाजशास्त्रही जाणून घेणे आवश्यक असते. बहुभाषिक म्हणजे केवळ अनेक भाषा, एवढा मर्यादित अर्थ घेऊन चालणार नाही. त्यापलीकडे खूप काही आहे आणि ते काय आहे, हे पाहणेच महत्त्वाचे ठरते.
हे जाणून घेण्यासाठी पहिली प्रतिज्ञा असते, ती त्या भाषांची नोंद करणे, त्यांचे अस्तित्व जाणून घेणे, त्यांच्या स्थितीचा उैहापोह करणे. त्यासाठी आवश्यक असते ते भाषांचे सर्वेक्षण आणि हे सर्वेक्षण कसे असावे? तर त्याचे उत्तर अलीकडे डॉ. गणेश देवी यांनी साकारलेल्या ‘भारतीय भाषांचे लोक सर्वेक्षण’ या प्रकल्पातून मिळते.
डॉ. गणेश देवी हे जाणीवपूर्वक ‘भारतीय भाषांचे लोक सर्वेक्षण’ (पिपल्स लिंग्विस्टिक सर्व्हे) असं म्हणतात. यातील ‘लोक’ हा शब्द महत्त्वाचा आहे. शासनाच्या मदतीशिवाय, लोकांच्या सहभागातून आणि ‘लोक’ जी ‘भाषा’ वापरतात त्यातून हा प्रकल्प साकारला आहे.

मला या प्रकल्पात सहभागी होता आले. डॉ. देवी यांनी अनेक कार्यशाळा हिंदुस्थानातील अनेक ठिकाणी आयोजित केल्या. या कार्यशाळांत माझ्यासारखे प्रत्येक राज्यातले संपादक हजर तर असायचेच, परंतु अनेक भाषाशास्त्रज्ञही निमंत्रित केलेले असायचे. त्यावेळी ज्या चर्चा घडत, त्यात इतर भाषा वैज्ञानिकांपेक्षा डॉ. देवी यांची समाजशास्त्राrय भूमिका यावेळी अधिक स्पष्ट होत असे. त्यांनी पूर्वी केलेल्या ‘आदिवासी भाषा-कला-संस्कृती’ च्या अभ्यासाचाच हा पुढचा टप्पा किंवा त्याचे विस्तृत स्वरूप ठरावे असे हे सर्वेक्षण आहे. अर्थात हे माझे मत आहे. समाजाची भाषा आणि भाषेचे समाजशास्त्र केंद्रस्थानी ठेवूनच हे सर्वेक्षण झाले. ब्रिटिश संस्कारातून भाषा विज्ञानाचा अभ्यास करणाऱयांना डॉ. देवी यांची ही भूमिका पटणे अवघड आहे. डॉ. देवी यांनी यापूर्वी मांडलेल्या ‘देशी’वादाचे हे प्रात्यक्षिक आणि विस्तृत स्वरूप आहे. तो भाषांचा अभ्यास नव्हे, तर भाषांचे सर्वेक्षण आहे. सर्वेक्षणाचे एकूण एक्याण्णव खंड झाले, त्यापैकी पन्नास खंड इंग्रजीतून, बत्तीस खंड हिंदीतून आणि काही त्या-त्या प्रादेशिक भाषांतूनही झाले. हा सगळा प्रकल्प एकूण तीन हजार पाचशे पृष्ठांचा झाला आहे. डॉ. देवींचे हे काम अभूतपूर्व व थक्क करणारे आहे. आठशेच्या आसपास भाषा हिंदुस्थानात बोलल्या जातात, त्या भाषांचे समाजशास्त्राrय स्थान काय आहे? सांस्कृतिक वैविध्य टिकवण्यासाठी त्यांचे महत्त्व काय? याकडे गांभीर्याने पाहिले जाईल का? आपले राज्यकर्ते संपूर्ण देशासाठी भाषांचे नियोजन अथवा व्यवस्थापन ठरवणार आहेत का? असे काही घडले तर या सर्वेक्षणाचे योगदान अधिक अर्थपूर्ण ठरेल.

या सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर लोक अनेक प्रश्न औत्सुक्याने विचारत असतात. त्यातला एक प्रश्न असतो, बहुभाषिकता ही देशाच्या एकात्मतेला पूरक आहे का? देशाचे अखंडत्व बहुभाषांमुळे संकटात येऊ शकते का? याचे स्पष्ट उत्तर आहे – मुळीच नाही. उलट आपले आंतरिक ऐक्य ठेवण्यास त्या सहाय्यभूत झाल्या आहेत. इतर देशांच्या तुलनेने हिंदुस्थानात भिन्न प्रकारचे धर्म, भौगोलिक परिस्थिती, समाजगट, जाती-जमाती व प्राचीनता असल्यामुळे इतर देशांपेक्षा जास्त भाषा आहेत. पण इतर देशांतही बहुभाषिकतेमुळे कुठे एकात्मता अथवा देशाचे अखंडत्व धोक्यात आलेले दिसत नाही. जगात सहा हजारांच्या आसपास भाषा बोलल्या जातात. अपवाद फक्त जपानचा ठरेल. ‘एक भाषा एक देश’ हे सूत्र फक्त जपानमध्ये आहे. पण इतरत्र तसे आढळणार नाही. आता हेच पहा ना, इंग्रजी आणि फ्रेंच भाषेलाही कितीतरी बोली आहेत.

पुण्याची मराठी महाराष्ट्रातील इतर भागांतील मराठीपेक्षा अधिक प्रमाणित समजली जाते. तसेच पॅरिसची फ्रेंच ही फ्रान्समध्ये इतरत्र बोलल्या जाणाऱया फ्रेंचपेक्षा अधिक श्रेष्ठ व प्रमाणित मानली जाते. कारण पॅरिसचा एक सांस्कृतिक दबदबा, तिथं घडलेले जागतिक दर्जाचे लेखक हे त्याचे कारण आहे. जसे मराठीसाठी पुणे हे सांस्कृतिक केंद्र असल्यामुळे पुण्याची मराठी वेगळी ठरली किंवा ठरते.

भाषेचा विकास होण्यासाठी ती ज्या भागात बोलली जाते तिथले सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय वर्चस्व महत्त्वाचे असते. याचा तोटा असा होतो की, यातूनच भाषाभेद होतो व ‘भाषिक सल’ तयार होतो. ही भाषिक वेदना कशी तयार होते ते पहा. मोगल येण्यापूर्वी दिल्लीत जे सत्ताधीश होते त्यांच्या क्रज, खडी या भाषा महत्त्वाच्या होत्या. मोगल काळात खडी फारशी यांच्या मिश्रणातून उर्दू आली. उर्दू याचा कोशातला अर्थ छावणी. सैन्याच्या छावणीत बोलली जाणारी उर्दू व पुढे ब्रिटिश राजवटीनंतर हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यावर दिल्लीत उर्दू जाऊन संस्कृतमिश्रित हिंदी आली. दिल्लीतल्या सत्ता व सांस्कृतिक स्थित्यंतराचा हा परिणाम आहे. उर्दू ला आता विशिष्ट समाजाची भाषा मानू लागलो आणि एक भाषिक वेदना तयार झाली. हे चूक असले तरीही भाषिक वेदना कशा तयार होतात याचे हे उदाहरण आहे. अशा गोष्टी हिंदुस्थानातील अनेक भाषांबद्दल सांगता येतील. पूर्वी आसामी, उडिया बंगालीच्या उपभाषा मानल्या जायच्या व त्यातून भेद निर्माण होऊ लागला. पुढे त्या भाषांना स्वतंत्र राज्ये मिळाली तरीही भाषिक सल काही सैल होत नसतो.

या सर्वेक्षणातून हेही लक्षात येते की, काही भाषांच्या मर्यादाही आहेत. अशा भाषांचा विकास आणि विस्तार अधिक आव्हानात्मक आहे. सर्वच बोलल्या जाणाऱया भाषांतून मोठय़ा अपेक्षा ठेवणे चूक आहे. या सर्वेक्षणातून बोध घेऊन हिंदुस्थानी भाषांतील शब्दांचा, म्हणींचा, जीवन पद्धतींचा, मौखिक साहित्याचा काही तुलनात्मक अभ्यास जाणकार अभ्यासकांनी केला, तर या दस्तऐवजातून अनेक दस्तऐवज तयार होतील.

सर्वेक्षणातील भाषांच्या अस्तित्वाबद्दल लोक विचारत असतात, तेव्हा एवढेच सांगावेसे वाटते की, आज त्या वर्तमानात अस्तित्वासाठी झगडत आहेत. भविष्यकाळ अस्पष्ट आहे. कितीतरी भाषांना फक्त भूतकाळच आहे. यातून मार्ग एकच आहे, आपण बहुभाषिक होणे. आपल्याला तीनचार भाषा तरी यायला हव्यात. मग त्यातली एक इंग्रजी असली तरी चालेल, पण फक्त इंग्रजीलाच महत्त्व द्याल तर कधीकाळी असलेली आपली खरी ओळख भूतकाळात जमा होऊन आपल्याला ‘इंग्रजांच्या सांस्कृतिक वसाहतीतील एक’ असे समजले जाईल आणि हा धोका गंभीर आहे.

(लेखक मराठीतील बोलीभाषांचे अभ्यासक आहेत.)

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या